Satish Taur Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology: बत्तीस हार्वेस्टरने शेतकऱ्यांसाठी क्रांती: सतीश तौर यांची यशोगाथा!

Harvester Business: एका अपमानास्पद वाक्याने पेटलेल्या जिद्दीने सुरू झालेला प्रवास आता हजारो शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात बनला आहे! सतीश तौर यांनी केवळ १६ वर्षांत ३२ हार्वेस्टरच्या जोरावर चार राज्यांतील शेतकऱ्यांना खात्रीशीर सेवा पुरवण्याचा व्यवसाय उभा केला आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Farming Success Story: पीक काढणीवेळी एका घटनेत एका हार्वेस्टर मालकाचे मानहानिकारक उद्‍गार सतीश तौर यांच्या मनाला लागले. आणि तिथेच स्वतःच व्यावसायिक होण्याची जिद्द निर्माण झाली. सोळा वर्षांच्या या कालखंडात तब्बल ३२ हार्वेस्टरचे मालक होऊन चार राज्यांतील शेतकऱ्यांना सेवा देत सतीश यांनी स्वतःचे खात्रीशीर नाव तयार केले आहे. साठ जणांसाठी रोजगार निर्मितीही केली आहे.

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात सुमारे १३०० च्या आसपास लोकसंख्या असलेले लिंबी गाव आहे. येथील सतीश तौर यांचे वडील जिजासाहेब यांची वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती होती. ते आपली शेती सांभाळून परिसरातील गावांतील शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदी करीत व तीर्थपुरी, आष्टी, घनसावंगी आदी बाजारांत विक्री करीत. पै पै जोडत त्यांनी २००४ पर्यंत शेती १८ एकरांपर्यंत नेली. सतीश लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. पण आपल्या मुलाने शेतीतच उतरून त्यात भरीव काही करावं अशी वडिलांची इच्छा होती. त्यानुसार बारावी झाल्यानंतर सतीश शेती व वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागले. आठवडी बाजारात विक्री करताना त्यांना व्यापार काय असतो ते कळू लागले. ग्राहकांना आपलेसे कसे करायचे याचीही कला त्यांना शिकायला मिळाली.

स्वत:ला मालक समजता काय?

सन २००७ च्या सुमारास सतीश यांनी बैलचलित मळणी यंत्र घेतले होते. सन २००८ च्या सुमारास त्यांच्या गाव परिसरात गव्हासाठी कंबाईन हार्वेस्टर करून भाडेतत्त्वावर त्याचा व्यवसाय करणारे येऊ लागले होते. सतीश यांच्याकडेही दहा एकर गहू होता. मात्र संबंधित हार्वेस्टर व्यावसायिकाकडे अनेक विनंत्या करूनही सतीश यांच्याकडे तो येण्यास तयार नव्हता. तुमच्या मनाप्रमाणे यायला तुम्ही काय हार्वेस्टरचे मालक समजता काय असे अपमानास्पद शब्द त्या व्यावसायिकाने सतीश यांना ऐकवले. हे शब्द त्यांच्या जिव्हारी लागले. ते मनात खोलवर रुजले. एक दिवस मी देखील हार्वेस्टर मालक होऊन दाखवेन असा निश्‍चयच त्यांनी केला. त्याच जिद्दीने, तडफेने २००९ मध्ये सतीश यांनी कंबाईन हार्वेस्टर घेतला देखील.

सोळा वर्षांत ३२ हार्वेस्टर

अलीकडे शेतीत सर्वत्र मजुरांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हार्वेस्टरची खूप गरज असल्याचे सतीश यांनी ओळखले होते. परंतु हार्वेस्टर घेणे प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारे नव्हते. अशावेळी स्वतःच ही सेवा देण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवून सतीश यांनी कामास धडाडीने सुरुवातही केली. सन २००९ ते अलीकडील काळापर्यंत म्हणजे १६ वर्षांच्या काळात त्यांनी तब्बल ३२ हार्वेस्टर घेतले आहेत. एका जर्मन कंपनीचीच ही यंत्रे आहेत. या कंपनीकडे प्रात्यक्षिकांसाठी काही यंत्रे उपलब्ध होती. तसेच तेलंगण किंवा अन्य भागातील काहींनी ही यंत्रे घेतली होती. मात्र त्यांना आर्थिकदृष्ट्या यंत्र चालवणे त्यांना शक्य होत नव्हते. अशावेळी ही यंत्रे सतीश यांनी खरेदी केली. त्याचबरोबर मिळकतीतील उत्पन्नातून व कॅनरा बॅंकेकडून कर्ज घेऊन नवी यंत्रेही खरेदी केली.

६० पेक्षा अधिकांना रोजगार

सतीश यांनी या व्यवसायातून सुमारे ६० जणांना आठ महिने रोजगार दिला आहे. यात पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश आणि उर्वरित सतीश यांच्या परिसरातीलच कर्मचारी आहेत. एका यंत्रामागे एक चालक (ऑपरेटर) व एक किंवा दोन मदतनीस असतात. सतीश स्वतः देखील उत्तम यंत्र चालवतात. ‘ऑपरेटर’ होऊ इच्छिणाऱ्याला ते तसे प्रशिक्षणात तरबेजही करतात. अशा प्रकारे २५ जणांनी प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय स्वतंत्रपणे सुरू केला आहे. हरियानातील रमेश सैनी व कुरुक्षेत्र येथील मोहित कुमार तब्बल सोळा वर्षापासून सतीश यांच्याकडे कार्यरत आहेत. ती त्यांच्या कुटुंबाचा भागच झाली आहेत.

...असे आहे व्यवसायाचे स्वरूप

सध्या ३२ पैकी सुमारे २५ हार्वेस्टर चालू अवस्थेत किंवा कार्यरत.

सोयाबीन, हरभरा, करडई, गहू, तूर, मूग अशा विविध पिकांची काढणी- मळणी असे काम हा कंबाईन हार्वेस्टर करतो.

मका पिकासाठी असे पाच आधुनिक हार्वेस्टर.

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, बुलडाणा, वाशीम, अमरावतीसह कर्नाटक (तूर, मूग मका), तेलंगण ( मका), मध्यप्रदेश (हरभरा, मका) आदी राज्यांपर्यंत व्यवसायाचा विस्तार.

प्रत्येक भागातील हंगाम व शेतकऱ्यांचे सर्वक्षण करून त्या संपूर्ण भागासाठी दरवर्षी आठ ते दहा हार्वेस्टर पाठविण्यात येतात.

वर्षाला एकूण सरासरी तीन हजारांपासून ते सहा हजार एकरांवर यंत्रे काढणी- मळणी करतात.

त्यासाठी सरासरी २५०० रुपये प्रति एकर असे शुल्क आकारले जाते. दरवर्षी पाऊस, निसर्ग यांच्या

स्थितीनुसार क्षेत्र बदलत राहते.

सुमारे पाच हजार शेतकऱ्यांचे नेटवर्क उभारले आहे.

कोणतेही यंत्र खरेदी करण्यापूर्वी ते विविध ठिकाणी जाऊन त्याच्या कार्यक्षमतेची माहिती घेतात.

यंत्राची दुरुस्ती वा देखभालीसाठी सतीश यांची गावी कार्यशाळाही (वर्कशॉप) आहे.

शेतीचा विकास

एकेकाळी वडिलोपार्जित साडेतीन एक शेती, वडिलांनी भर घालून ती १८ एकरपर्यंत नेलेली व त्यात पुन्हा बंधू ज्ञानेश्‍वर यांच्या साथीने २०१९ पर्यंत ३५ एकरांपर्यंत शेती नेण्यात सतीश यशस्वी झाले आहेत. आर्थिक स्थिती आता भक्कम असली तरी वडिलांचा एकेकाळचा भाजीपाला खरेदीचा व्यवसाय आजही घरी सुरू आहे. सन २०१९ मध्ये गादीवाफा व इंडो इस्राईल पद्धतीने मोसंबी लागवड केली आहे. साई सरबती लिंबू वाणाची साडेतीन एकरांत लागवड आहे. याशिवाय सोयाबीन, हरभरा, करडई आदी पिकेही आहेत. सतीश यांना आई कौसल्याबाई,

आजोबा विश्वनाथ तौर यांचे मार्गदर्शन तर पत्नी संध्या व भावजय जागृती यांची मदत होते. बंधू ज्ञानेश्‍वर यांनी एम.फार्म. पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले आहे. बारामती येथे अकरा वर्षे नोकरी केल्यानंतर ते आज गावी संबंधित यंत्राच्या वितरणाची जबाबदारी सांभाळत आहेत. सतीश यांचा एक मुलगा अजिंक्य ‘केमिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असून, दुसरा मुलगा सयाजी हार्वेस्टर व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतो आहे. सतीश यांनी आता समविचारी मंडळींना सोबत घेऊन शेतकरी कंपनीही स्थापन केली आहे.

शेतकऱ्यांना केवळ यंत्राद्वारे काम करून देण्यापुरते वा व्यवहारापुरते संबंध न ठेवता त्यांना शेतीतील तंत्रज्ञानावर मार्गदर्शन, मदतही करण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणूनच माझ्याकडून यंत्रांची सेवा घेण्यासाठी काही दिवस आधी शेतकरी आगाऊ नोंदणी करतात. हार्वेस्टर एकट्यादुकट्या शेतकऱ्यांसाठी नव्हे तर संपूर्ण गावासाठी अशी माझी संकल्पना आहे. येत्या काळात एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना विविध सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

सतीश तौर

८६६९३४११६७, ९४२१६४२६४३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT