
Rural Business Story: पती निधनाचे डोंगराएवढे दुःख बाजूला ठेवून ‘त्या’ हिमतीने पुढे सरसावल्या. त्यांचा जिद्दीपणा पाहून कुटुंबासह मित्रमंडळींनी त्यांना बळ दिले. या प्रोत्साहनाच्या जोरावर त्यांनी ऊस रोपवाटिका व्यवसाय टिकवला. आज वर्षाला लाखो ऊस रोपांची विक्री त्या महाराष्ट्र राज्यासह बाहेरील राज्यांनाही करीत आहेत. नांदणी (ता. शिरोळ) येथील सारिका लठ्ठे यांची ही कहाणी. लढण्याला जिद्दीचे बळ देणारी, अन्य महिलांना आदर्श ठरणारी अशीच आहे.
नांदणी हे शिरोळ तालुक्यातील भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध गाव. बागायती पट्ट्यामुळे गाव राज्यात प्रसिद्ध. येथील सारिका बाहुबली लठ्ठे यांनी ऊस रोपवाटिका व्यवसाय पतीच्या निधनानंतरही समर्थपणे सांभाळला. अनेक आव्हानांना, संकटांना आर्थिक अडचणींना तोंड देत त्यांनी या व्यवसायात भरारी मारली.
त्यांची नांदणी हरोली परिसरात अडीच एकर शेती आहे. यामध्ये त्या भाजीपाला, झेंडू आदी पिके घेतात. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्या पती बाहुबली यांच्याबरोबरच सर्व शेती कामे करायच्या. २०११ ला बाहुबली यांनी ऊस रोपवाटिका सुरू केली. बाहुबली हे प्रामुख्याने मार्केटिंग बियाणे उपलब्धता या बाबी बघायचे, तर सारिकाताई या महिला मजुरांचे व्यवस्थापन व अन्य कामे बघायच्या.
२०२१ पर्यंत हा व्यवसाय भरारी घेत असतानाच ‘आक्रीत घडावं’ तसे संकट या कुटुंबावर आले. कोरोनाच्या लाटेत बाहुबली यांचे निधन झाले. आधारच गेल्याने सारिका यांच्या पुढे आयुष्य अंधकारमय बनण्याचा धोका होता. त्यातून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान होते. पदरात रोहित व श्रद्धा ही दोन मुले होती.
अचानक आलेल्या या संकटाने करायचे तरी काय हा प्रश्न निर्माण झाला. पण कुठेतरी आशेचा किरण नक्कीच असतो. अगदी असेच घडले. त्यांच्या पाठी कुटुंब उभे राहिले. सासरे नेमिनाथ, सासूबाई चंपाबाई, चुलत दीर शीतल, भाऊ राहुल मगदूम, मित्र सचिन पाटील यांच्या सहकार्याने हा व्यवसाय पुन्हा सुरू झाला.
अन्य महिलांनाही कायमचा आर्थिक आधार
२८ गुंठे क्षेत्रात साकारलेल्या रोपवाटिकेचा आज वृक्ष बनला आहे. त्यांच्या रोपवाटिकेत दररोज सुमारे अकरा महिला काम करतात. कामानुसार ही संख्या पंधरा महिलांपर्यंतही जाते. ८६०३२, २६५ १०००१, ८००५ आदी उसाची रोपे त्यांच्याकडे उपलब्ध होतात.
रोपांच्या मागणीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क साधून बेणे मागवणे, ग्राहकांना रोपे करून ती वेळेत देणे हे कसब सारिकाताईंनी लीलया हाताळले आहे. नांदणी हरोली परिसरातील महिला कामगारांनाही त्यांच्या रोपवाटिकेचा मोठा कायमचा आर्थिक आधार तयार झाला आहे.
नकारात्मकतेतून सकारात्मक धडे
व्यवसायामध्ये लक्ष घातल्यानंतर येणारा प्रत्येक अनुभव हा त्यांना वेगळेपणाची जाणीव करून देणारा ठरला. बऱ्याच वेळेला नकारात्मकतेचे अनेक धडे त्यांना मिळाले, पण त्या मागे हटल्या नाहीत. स्थानिक बाजारपेठेबरोबरच गुजरात, कर्नाटकसह अन्य राज्यांतील व्यापाऱ्यांबरोबरही त्यांनी आपल्या व्यावहारिक चातुर्याने रोपांची विक्री केली.
ऊस रोपांचे दर, वाहतूक व्यवस्थेबाबत सातत्याने त्या अपडेट घेत असतात. व्यवसायातील तोटेही त्यांनी सहजपणे पचवले. सातत्याने बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऊस रोपांची विक्री बाहेरील बाजारपेठांमध्येही केली. त्यांची धडपड पाहून कच्चा माल पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांनाही त्यांना सवलत दिली.
सारिका लठ्ठे ९४०४९७४४४०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.