Fodder Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Model: सकस चाऱ्यासाठी सुबाभूळ, मारवेल

Fodder Management: चारा उत्पादनासाठी स्वतंत्र जमीन नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत असतात. मात्र, शेतीच्या बांधावर आणि सड्यांवर सुबाभूळ, दशरथ, मेथी घास व मारवेल गवत यांची लागवड करून शाश्वत हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करता येते.

Team Agrowon

संग्राम चव्हाण, विक्रम गावडे, अमृत मोरडे

Rural Farming:

शेती बांधावर चारा लागवड

सुबाभूळ + दशरथ

बरेच शेतकरी चाऱ्याच्या लागवडीला फारसे महत्त्व देत नाहीत, कारण ते आपली जमीन नगदी किंवा धान्य पीक घेण्यासाठी वापरतात. त्यामुळे चाऱ्यासाठी स्वतंत्र जमीन उपलब्ध होत नाही, विशेषतः बागायती भागात. या समस्येवर उपाय म्हणून शेताच्या कडेला असलेल्या बांधांवर, सड्यांवर किंवा रस्त्यालगत असलेल्या वापरात नसलेल्या जागांवर पाणी ताण सहन करणाऱ्या चाऱ्याच्या वृक्षांची लागवड करता येते. या मॉडेलमध्ये सुबाभूळ व दशरथ यांची लागवड शेताच्या बांधांवर केली जाते. ही झाडे कमी पाण्यावर टिकतात, कमी देखभालीतही चांगली वाढतात आणि वर्षभर हिरव्या चाऱ्याचा सातत्यपूर्ण पुरवठा करतात.

लागवड तंत्र

सुबाभूळ आणि दशरथ यांची लागवड जून ते सप्टेंबर या कालावधीत शेताच्या बांधावरती करावी. मात्र, योग्य सिंचन उपलब्ध असल्यास जानेवारीपर्यंत लागवड शक्य आहे. सुमारे १० गुंठे क्षेत्रात हे मॉडेल उभारण्यासाठी २ ते ४ मीटर रुंद आणि ३०० ते ५०० मीटर लांबीच्या बांधांचा किंवा रस्त्यालगत असलेल्या पट्ट्यांचा उपयोग करता येतो.

सुबाभूळ: याची लागवड बांधाच्या किंवा पट्ट्याच्या मधोमध एका ओळीत करावी. दोन रोपांमधील अंतर सुमारे १० फूट ठेवावे. लागवड थेट बी पेरणीद्वारे किंवा रूट ट्रेनर/पॉलीबॅगमध्ये तयार केलेल्या रोपांद्वारे करावी.बीयाने लावण्यापूर्वी ६० अंश सेल्सिअस गरम पाण्यात १ ते २ तास भिजवावे व नंतर थंड पाण्यात रात्रीभर भिजवून ठेवावे. ३०० ते ५०० मीटर लांबीच्या पट्ट्यात सुमारे ९० ते १५० झाडे लावता येतात.

दशरथ: याचे बियाणे ८० अंश सेल्सिअस गरम पाण्यात ५ मिनिटे बुडवून, त्यानंतर रात्रभर थंड पाण्यात भिजत ठेवावे. पेरणी ६० सें.मी. × ४५ सें.मी. अंतरावर ओळीत करावी. पेरणीचा योग्य कालावधी जून ते ऑगस्ट असून, सिंचन असल्यास डिसेंबरपर्यंत पेरणी करता येते. दहा गुंठे क्षेत्रासाठी सुमारे २ किलो बियाण्याची आवश्यकता असते. दशरथ लागवड सुबाभूळ झाडांच्या जवळ केली जाते, जेणेकरून सीमारेषांवर चाऱ्याचे दुहेरी उत्पादन घेता येते.

खत , पाणी नियोजन

पेरणीपूर्वी दहा गुंठे क्षेत्रामध्ये सुमारे १.५ ते २ टन शेणखत मिसळावे. पेरणीवेळी दरवर्षी ५ किलो नत्र, १५ किलो स्फुरद आणि ७.५ किलो पालाश वापरावे. ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून ४ लिटर प्रति तास प्रवाह असलेल्या ठिबक लाईनने दर १५ दिवसांनी ८ तास सिंचन करावे. कमी पाण्याच्या परिस्थितीत महिन्यातून एकदा सिंचन केल्यासही चांगली वाढ होऊ शकते.

कापणी

दशरथची पहिली कापणी पेरणीनंतर ७० ते ८० दिवसांनी करावी, जमिनीपासून ७ ते १० सेंमी उंचीवर धारदार विळ्याने कापणी करावी. त्यानंतर, सिंचित क्षेत्रात दर ५० ते ६० दिवसांनी कापणी करता येते. कोरडवाहू भागात सप्टेंबर व नोव्हेंबरमध्ये दोन वेळा कापणी करता येते. सुबाभूळची पहिली कापणी लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांनी करावी, जमिनीपासून १०० सेंमी उंची ठेवून छाटणी करावी. नंतर, प्रत्येक ६० दिवसांनी सीकेटरने छाटणी करावी. मर्यादित सिंचनात वर्षाकाठी ३ ते ४ कापण्या करता येतात. ठिबक सिंचन असेल तर ६ ते ७ वेळा कापणी शक्य होते. पीक स्पर्धा कमी असल्यामुळे सुबाभूळ आणि दशरथ पिकाची वाढ जोमात होते, उत्पादन जास्त मिळते.

व्यवस्थापन

सुबाभूळ छाटल्यानंतर रोपे सुकू नयेत आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घ्यावी. पेरणीनंतर ३० ते ४५ आणि त्यानंतर ८० ते ९० दिवसांनी खुरपणी करावी.

उत्पादन

सुरुवातीच्या वर्षांमध्ये सुबाभूळ वृक्षापासून दर कापणीत ३ ते ४ किलो हिरवा चारा मिळतो. दहा गुंठे क्षेत्रातील दशरथ पिकापासून ५ते ६ टन चारा मिळतो. या पीक पद्धतीमधून दरवर्षी ७ ते ८ टन हिरवा चारा मिळतो. चांगली जमीन, वेळेवर सिंचन व योग्य प्रमाणात खत वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते.

वनचारा पीक पद्धती

सुबाभूळ + मेथी गवत + मारवेल

पीक पद्धतीमध्ये सुबाभूळ, मेथी घास आणि मारवेल गवताचा समावेश करून वर्षभर पोषणमूल्यांनीयुक्त हिरवा चारा मिळतो.मेथी घास आणि मारवेल हे कमी देखभालीत ३ ते ५ वर्षे टिकणारे, प्रथिनयुक्त पोषणमूल्य असलेला चारा असून शेळीपालन व दुग्धव्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. सुबाभळीमुळे नत्र स्थिरीकरण होते. जमिनीची सुपीकता सुधारते.

लागवड तंत्र

जून ते ऑगस्ट हा कालावधी योग्य असला तरी, खात्रीशीर सिंचन असेल तर डिसेंबरपर्यंत लागवड करता येते. ही पीक पद्धती दहा गुंठे क्षेत्रात विकसित करावी.

सुबाभूळ

लागवड १० x ७ फूट अंतरावर केली जाते. त्यामुळे दहा गुंठे क्षेत्रात सुमारे १५० ते १९० रोपे लागतात. थेट बियाणे पेरून किंवा रुजवून तयार केलेल्या रोपांद्वारे लागवड करता येते. बीज लागवडीपूर्वी ६० अंश सेल्सिअस गरम पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. के-३४१, के-६३६, के-८, वंडरग्रेज, तारांबा, निर्बिजा या सुधारित जातींचा वापर करावा.

मेथी घास

प्रामुख्याने हिवाळ्यात लागवड केली जाते; जुलै–ऑगस्ट मध्ये सुद्धा शक्य असते. लागवडीसाठी ३० x १० सें.मी. अंतर योग्य आहे. सिरसा -९, आनंद, सीओ-१, आयजीएफआरआय-एस-२४४ या उत्तम जाती आहेत, तर टी-१ आणि आरएल-८८ या क्षारपड जमिनीसाठी शिफारस केलेल्या प्रजाती आहेत. ५०० चौ.मी. क्षेत्रासाठी सुमारे ५०० ते ६०० ग्रॅम बी लागते.

मारवेल

गवत बीज १:५ या प्रमाणात बारीक वाळूसोबत मिसळून पेरणी अथवा खड्ड्यांमध्ये टोकण करावी.

छाटणीद्वारे लागवड करताना २ ते ३ डोळे असलेली मजबूत काडी घेऊन आयबीए मध्ये बुडवावी. पर्यायाने ४०ते ४५ दिवसांचे रोपे किंवा मूळ खोडांचे टोक वापरता येतात. लागवडीसाठी६० x ४० सेंमी, ५० x ३० सेंमी किंवा ९० x ४५ सेंमी अंतर ठेवावे. ५०० चौ.मी.साठी सुमारे ३०० ते ४०० ग्रॅम बियाणे लागते. जून,जुलैमध्ये ओळीने पेरणी करावी. साधारणतः १८०० ते २००० मूळ खोडांचे तुकडे लागतात. - लागवडीसाठी जेएचडी२०१३-२, फुले मारवेल ०६-४०, फुले मारवेल-१ या जातींची निवड करावी.

दहा गुंठे क्षेत्रासाठी पेरणीपूर्वी २ टन शेणखत, तसेच पेरणीवेळी ५ किलो नत्र, १५ किलो स्फुरद व ७.५ किलो पालाश द्यावे. कोरडवाहू भागात जून अखेरपर्यंत पेरणी पूर्ण करावी.

पाणी व्यवस्थापन

मारवेल गवताला प्रत्येक १५ दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे ८ तास सिंचन करावे.उन्हाळ्यामध्ये मेथी गवतासाठी आठवड्यातून एकदा तरी सिंचन आवश्यक असते. सुबाभूळ, मारवेल गवत कमी पाण्यामध्ये देखील तग काढू शकते. अत्यल्प पाणीसाठा असलेल्या भागात महिन्यातून एकदा तरी सिंचन करावे.

कापणी

मारवेल गवत: लागवडीनंतर ६० दिवसांनी १० सेंमीवर कापणी करावी. पावसावर आधारित भागात सप्टेंबर व नोव्हेंबरमध्ये दोनदा कापणी करून २० ते २५ टन/हे. हिरवा चारा मिळतो.

मेथी घास : पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी १० सेंमीवर कापणी करावी, नंतर ४० दिवसांनी पुन्हा कापणी करावी. एका हंगामात ६ते ८ वेळा कापणी शक्य.

सुबाभूळ: लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यानंतर प्रथम जमिनीपासून १०० सेंमी उंचीवर तिरपा काप देवून छाटणी करावी. त्यानंतर दर ५० ते ६० दिवसांनी छाटणी करावी. कमी पावसाच्या भागात वर्षात तीन वेळा, ९० ते १०० दिवसांच्या अंतराने छाटणी करावी.

व्यवस्थापन

सुरवातीच्या ३० ते ४५ दिवसांनी आणि ८०ते ९० दिवसांनी तण नियंत्रण करावे. गरज भासल्यास अधिक वेळा तण काढणी करावी.

ताज्या सुबाभूळ पानांमध्ये मायमोसीन हे विषारी द्रव्य असते, जे जनावरांमध्ये अतिसार व केसगळती निर्माण करते. याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी हिरवा चारा किमान ३०ते ६० मिनिटे सावलीत ठेवावा आणि मग जनावरांना खाऊ घालावा.

उत्पादन

दहा गुंठ्यांच्या या चारा उत्पादन पद्धतीमधून विविध घटकांद्वारे एकूण सुमारे ८ ते ९ टन प्रति वर्ष हिरवा चारा मिळतो. सुबाभूळ या घटकातून पहिल्या काही वर्षांत अंदाजे १.५ ते २.० टन प्रति वर्ष हिरवा चारा उत्पादन देते. मेथीघास सुमारे ५०० चौ.मी. क्षेत्रावर लागवड केल्यास ६ ते ८ कापणीतून ३.५ ते ४ टन प्रति वर्ष उत्पादन मिळते. मारवेल गवतापासून ५०० चौ.मी. क्षेत्रावर सिंचनाच्या उपलब्धतेनुसार २ ते २.५ टन प्रति वर्ष हिरवा चारा उत्पादन मिळते.

- संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७

(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती,जि.पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Sulabh Seva Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT