Jowar Fodder : चाऱ्यासाठी ज्वारीची सुधारित लागवड

Green Fodder For Animal : मराठवाड्यात खरीप हंगामात चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी मुख्यत्वे मका, ज्वारी, बाजरी व काही प्रमाणात संकरित चारा पिके उदा. नेपियर, मारवेल इ. चारा पिकांची लागवड करतात.
Jowar Fodder
Jowar Fodder Agrowon
Published on
Updated on

प्रीतम भुतडा, डॉ. एल. एन. जावळे

दुग्ध व्यवसायात एकूण खर्चाच्या ७० ते ७५ टक्के खर्च चारा व पशुखाद्यावर होतो. पशू आहारात ७० टक्के भाग हिरव्या व सुक्या चाऱ्यांचा असतो आणि ३० टक्के भाग हा पशू खाद्याचा असतो. मराठवाड्यात खरीप हंगामात चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी मुख्यत्वे मका, ज्वारी, बाजरी व काही प्रमाणात संकरित चारा पिके उदा. नेपियर, मारवेल इ. चारा पिकांची लागवड करतात.

खरीप हंगामात बहुतांश क्षेत्रावर घेण्यात येणाऱ्या संकरित धान्य वाणांचीच लागवड करतात. त्यातून धान्यासोबतहीच कडबाही उपलब्ध होतो. अलीकडे काही शेतकरी धान्यांसोबत स्थानिक किंवा सुधारित उंच वाढणाऱ्या धांड असलेल्या वाणाला प्राधान्य देतात. अशा संकरित आणि सुधारित वाणातून कडब्याचेही उत्पादन मिळत असले, तरी कडब्याची गुणवत्ता व उत्पादन क्षमता ही प्रामुख्याने कमी असते. ज्यांना चाऱ्यासाठीच ज्वारी हे पीक लावायचे आहे, त्यांनी हिरव्या आणि वाळलेल्या कडब्याची उत्तम गुणवत्ता व सकसपणा देऊ शकणाऱ्या वाणांची निवड केली पाहिजे.

Jowar Fodder
Green Fodder : जनावराला हिरवा चारा देताना काय काळजी घ्याल?

जमीन :

चारा ज्वारीसाठी मध्यम ते खोल उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करून, पाण्याचा निचरा होण्यासाठी दांड पाडून घ्यावेत.

लागवडीचे अंतर : २५ सें.मी. बाय १५ सें.मी.

बियाणे : हेक्टरी ३५-४० किलो

खोली : ३ ते ४ सें. मी.

विरळणी : पेरणीपासून १२ ते १५ दिवसांनी

सुधारित वाण : फुले गोधन, फुले रुचिरा, फुले अमृता, पुसावरी, सी. एस. व्ही. ४० एफ

बीजप्रक्रिया : पेरणीनंतर मातीमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्यासाठी कार्बोक्सिन (३७.५ टक्के) अधिक थायरम (३७.५ टक्के डीएस) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे प्रक्रिया करावी.

खोडमाशीच्या नियंत्रणासाठी, इमिडाक्लोप्रीड (४८ टक्के एफएस) १४ मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणू संवर्धक ॲझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक, स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे चोळावे.

पेरणीचा कालावधी : खरीप ज्वारी पिकाप्रमाणेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान पेरणी करावी. पेरणी उशिरा झाल्यास खोड माशीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे संशोधनात आढळले आहे.

खत व्यवस्थापन

ज्वारीचे चारा पीक हे नत्र व स्फुरदयुक्त खतांना सकारात्मक प्रतिसाद देते. त्यामुळे वाढीच्या योग्य अवस्थेत व योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खतांचा वापर केल्यास हिरवा आणि वाळलेल्या चाऱ्याच्या उत्पादनात भरघोस वाढ होते. प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा.

ही खतांची मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत दोनदा विभागून द्यावे. पेरणी करताना नत्राची अर्धी मात्रा (५० किलो / हेक्टर), स्फुरद व पालाश यांची संपूर्ण मात्रा (५० किलो / हेक्टर) द्यावी. उरलेली अर्धी नत्र मात्रा (५० किलो / हेक्टर) पिकाच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर सुमारे ३० ते ४० दिवसांनी द्यावी.

Jowar Fodder
Jowar Fodder : दादर ज्वारीचा कडबा लवकरच उपलब्ध होणार

आंतरमशागत ः चारा ज्वारीची लागवड धान्य ज्वारीच्या तुलनेत फार दाट केली जाते. दोन ताटांतील व दोन धांडांतील अंतर तुलनेत कमी असते. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत आंतरमशागत करणे शक्य होत नाही. अशा वेळी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी उगवणीपूर्वी रासायनिक तणनाशकांचा वापर करणे सोयीचे ठरते. तणांच्या नियंत्रणासाठी ॲट्राझीन हे उगवणपूर्व तणनाशक १ किलो प्रति ७५० ते १००० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर क्षेत्रावर फवारावे.

उत्पादन : सुधारित वाण व सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास साधारणपणे ३० ते ४६ टन हिरव्या चाऱ्याचे व १४ ते १५ टन वाळलेल्या कडब्याचे उत्पादन मिळू शकते.

सी. एस. व्ही. ४० एफ वाणाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्रातील वातावरण आणि परिस्थिती यांचा विचार करून ज्वारीच्या निव्वळ चारा पिकाचे सी एस व्ही ४० एफ हे वाण ज्वारी संशोधन केंद्र, परभणी येथील पैदासकारांनी विकसित केले आहे. या वाणाची उत्पादन क्षमता हिरवा चारा हेक्टरी ४५ ते ४६ टन आणि वाळलेला चारा हेक्टरी १४ ते १५ टन इतकी आहे.

यापासून उत्पादित होणाऱ्या कडब्याची प्रत उत्तम आहे. त्याची पाचन क्षमता ५४.४८ टक्के प्रथिने, सरासरी उंचीपेक्षा (२४० – २५० सेंमीपेक्षा) ७.७ टक्के अधिक उंच वाढतो. हिरवीगार, लांब रुंद पाने, मध्यम गोड रसाळ धांडा असल्याने जनावरे आवडीने खातात. तसेच हे वाण खोडमाशी, खोडकीड या किडींना आणि पानावरील ठिपके या रोगासाठी मध्यम सहनशील आहे.

- प्रीतम भुतडा (सहायक प्राध्यापक), ९४२१८२२०६६

- डॉ. एल. एन. जावळे (ज्वारी पैदासकार), ७५८८०८२१५७

(ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवन टीप - बाजारातून बियाणे घेताना त्यास कोणकोणत्या रसायनांची प्रक्रिया केली आहे ते तपासून मगच तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत रसायनांचा वापर करणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com