
संग्राम चव्हाण, विक्रम गावडे, अमृत मोरडे
Protein Rich Fodder: आपल्याकडे पोषक आणि दर्जेदार चाऱ्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्याचा दुग्धोत्पादनावर परिणाम होतो. चाराटंचाईवर मात करण्यासाठी शास्त्रीय, शाश्वत आणि स्थानिक अनुकूलतेनुसार प्रणाली विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वर्षभर उपलब्ध होणाऱ्या प्रथिनसमृद्ध चारा प्रणाली (चारा बँक) हा प्रभावी पर्याय आहे. या अंतर्गत, कमी सिंचन क्षेत्र, अनियमित पर्जन्यमान, नापीक किंवा पडीक जमीन यांचा प्रभावी वापर करून, शेती बांध, तळ्याचे काठ आणि पडीक जमिनीवर चारा पिकांची लागवड करावी.
यामध्ये मेथी घास, दशरथ, मारवेल, अंजन, या चारा पिकांबरोबर सुबाभूळ, हादगा या चारा वृक्ष प्रजातींची लागवड करून वर्षभर चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करता येते. प्रथिनांनी समृद्ध चारा बँक ही परिवर्तनाची सुरुवात आहे. यामुळे दूध उत्पादन वाढवते, मातीचे आरोग्य सुधारते आणि ग्रामीण विकासामध्ये हातभार लागतो. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद-राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामतीने पुढाकार घेऊन ‘हवामान सहिष्णू चारा बँक प्रणाली’ विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
अ) वनचारा मॉडेल: सुबाभूळ + मेथी घास+ मारवेल
ब) बहूस्तरीय चारा मॉडेल : सुबाभूळ + दशरथ + अंजन + हादगा
क) शेतबांधावरील चारा मॉडेल: सुबाभूळ+ दशरथ
चारा बॅंकेची गरज
शेतकऱ्यांची गरज, जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन ही चारा लागवडीची पीक पद्धती १० गुंठे क्षेत्रावर विकसित करण्यात आली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये हिरवा चारा म्हणून ऊस वाढे, मका, नेपियर घास आणि इतर शेती अवशेष या व्यतिरिक्त काही उपलब्ध होत नाही. बहुतांश शेतकरी दररोज ४ ते ८ किलोपर्यंत सोयाबीन पेंड, भुस्सा, सरकी, भुईमूग पेंड आणि खनिज मिश्रणांसारखे महागडे खाद्य पशूंना देतात. यामुळे उत्पादन खर्च वाढतो, नफा कमी होतो.
पशूंच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. जनावरातील आम्लपित्ताची समस्या सोडविण्यासाठी या चारा पीक पद्धतीमध्ये प्रथिने, खनिजयुक्त हिरवा चारा (दररोज ३ ते ५ किलो) वर्षभर उपलब्ध होतो. यामुळे खनिज मिश्रणांवरील अवलंब २५ ते ५० टक्क्यांपर्यंत कमी होते, खर्च कमी होतो, दूध वाढते आणि पशूंचे आरोग्य सुधारते. ही पद्धत शेती बांध किंवा लहान क्षेत्रात सहज उभी करता येते. त्यामुळे वर्षभर हिरवा चारा मिळतो, दूध उत्पादन वाढते. शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक फायदा मिळतो.
महत्त्वाची चारा पिके
मेथी घास :
चाऱ्यामध्ये उच्च पौष्टिक मूल्य आहेत. हे पीक मर्यादित सिंचन आणि वालुकामय जमिनीत चांगले वाढते. एकवर्षीय किंवा बहुवर्षायू (३ ते ४ वर्षे) पद्धतीने घेतले जाते. यामध्ये प्रथिने (१६ ते १८ टक्के), तंतू (२० ते ३५ टक्के), खनिजे आणि कॅल्शिअम चांगल्या प्रमाणात आहे.
चांगली पचनक्षमता असलेला हा चारा सतत आणि वर्षभर पुरतो. वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीची सुपीकता वाढते, त्यामुळे कमी पाण्याच्या भागात टिकाऊ चारा उत्पादनासाठी उपयुक्त आहे.
मारवेल :
गवताची उंची ६० ते १०० सेंमी असते. मुळे एक मीटर खोल जातात. हे गवत सर्व प्रकारच्या जनावरांसाठी कुरण, कापून खुराक देणे, गवताचे वाळवण आणि सायलेज या माध्यमातून उत्कृष्ट चारा आहे.
हे गवत ५०० ते १४०० मिमी पावसाच्या भागात उत्तम वाढते. ३०० ते २६०० मिमीपर्यंतचा पाऊस सहन करू शकते. काळ्या चिकण मातीच्या जमिनीत आणि सौम्य ते क्षारीय सामू असलेल्या जमिनीतही चांगले वाढते. दुष्काळ, पाणथळ, क्षारपड, चोपण जमिनीमध्ये तग धरते. त्यामुळे नापीक कुरण नव्याने विकसित करण्यासाठी उत्तम आहे.
दशरथ :
चारा पिकाची उंची १.५ ते २ मीटर असून, ५ वर्षांपर्यंत उत्पादनक्षम राहते. यामध्ये २० ते २२ टक्के प्रथिने आहेत. ५७.७ टक्के पचनक्षमतेमुळे शेळ्या, गायी, मेंढ्या आणि कुक्कुटपालनासाठी उत्कृष्ट हिरवा चारा आहे.
जीवनसत्त्वे, खनिजांनी समृद्ध पीक आहे. वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीची सुपीकता वाढवते. अत्यंत अनुकूलनक्षम, दुष्काळसहिष्णू पीक आहे. २५० ते २००० मिमी पावसाच्या भागात चांगले वाढते. आम्लीय, क्षारीय व पडीक जमिनीत तग धरते. वर्षातून ४ ते ६ वेळा कापणी शक्य आहे. कापल्यानंतर लवकर पुन्हा वाढते.
प्रथिने समृद्ध चारा प्रणालींचे फायदे
दूध उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ.
मिथेन वायूचे उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण रक्षण.
चारा वर्षभर उपलब्ध होऊन पशुखाद्यावरचा खर्च कमी.
खराब, पडीक जमिनीचा उपयोग होऊन मातीची
धूप कमी, गुणवत्ता वाढ.
कमी पर्जन्य असलेल्या भागातही यशस्वी उत्पादन.
विविध वनस्पतींचे मिश्रणामुळे पोषणतत्त्वांची समृद्धी आणि रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ.
हवामान बदलांच्या परिणामांना तोंड देण्यासाठी चांगला पर्याय.
हादगा
हे जलद वाढणारे, नत्र स्थिर करणारे शेंगपाकळीवर्गीय झाड आहे. हे झाड १० ते १५ मीटर उंच वाढते. पानांमध्ये २५ ते ३० टक्के क्रूड प्रथिने आहेत. ६० ते ६५ टक्के पचनक्षमता आहे. शेळ्या, मेंढ्यांसाठी अत्यंत पौष्टिक आहे.
चिकण, क्षारपड, मुरमाड आणि आम्लीय जमिनीतसुद्धा चांगले वाढते. हे सुमारे ८०० ते ४००० मिमी वार्षिक पर्जन्यमानामध्ये तग धरते.
जलद वाढ, खोलवर मुळे आणि जमीन विविधतेशी जुळवून घेण्याची क्षमता असल्यामुळे हे पीक मृदा संधारण नियंत्रण, जमिनीचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच वनशेतीमध्ये उपयुक्त आहेत.
लागवडीनंतर ६ ते ८ महिन्यांत हिरवा चारा उत्पादन मिळते. कापल्यानंतर पुन्हा लवकर वाढते.
मर्यादित सिंचनामध्ये चांगले वाढते. नियमित सिंचन उपलब्ध झाल्यास उत्पादनक्षमता वाढते.
सुबाभूळ
लाकूड जळण, कागद निर्मिती, फर्निचर आणि जैवऊर्जेसाठी उपयोगी आहे. पाने, शेंगा उत्तम चारा व औषधी उपयोगासाठी प्रसिद्ध आहेत. हे झाड चांगल्या प्रमाणात नत्र स्थिरीकरण (प्रति वर्ष ५०० किलोपर्यंत प्रति हेक्टरी) करत असल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
काटेविरहित, बहुवर्षायू शेंगपाकळीवर्गीय झाड (उंची ५ ते २० मीटर) आहे. खोल मुळे आणि दुष्काळ सहिष्णुतेमुळे अर्धशुष्क भागांत चांगले वाढते. पाने प्रथिन समृद्ध (२२ ते २५ टक्के) आणि अत्यंत पाचक (५५ ते ७० टक्के) असल्यामुळे गाय, म्हशी, शेळ्यांसाठी उपयुक्त आहेत. सुबाभूळ हे चारा व्यवस्थापन, सजीव कुंपण आणि शाश्वत वनचारा पद्धतीमध्ये (झाडे+चराई) उपयोगी ठरते.
अंजन गवत :
बहुवर्षायू, गाठदार, दुष्काळसहिष्णू आहे. उंची ०.३ ते १.२ मीटर आहे. खोलवर मूळ जात असल्यामुळे जमिनीची धूप थांबते, जलसंधारण होते.
गवत अर्धशुष्क व कोरड्या भागांत तसेच वालुकामय, खडकाळ व उथळ जमिनीत चांगले वाढते. पाने भरदार, रसपूर्ण असून ६ ते १६ टक्के प्रथिने आणि ५० ते ६० टक्के पचनक्षमता असते. उष्णतेमध्ये अंजन गवत निष्क्रिय होते, पण पावसाळ्यात भूमिगत कोंबांपासून पुन्हा वाढते. ते पावसावर आधारित कुरण, कायमस्वरूपी चराईच्या क्षेत्रात उपयुक्त आहे.
संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७
(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.