A Story of Stubbornness : रायगडासमोर पसरलेल्या डोंगररांगेत बेलाग कातळधारेत उभा असलेला सरळसोट लिंगाणा दुर्ग कोणत्याही साधनाविना हा मावळा अवघ्या ११ मिनिटांत अक्षरशः घोरपडीसारखा पळत सर करतो. अलंग-मदन-कुलंग हे अतिअवघड गिरिदुर्ग तो अवघ्या तीन तासांत सर करतो. तर कधी मावळा कळसूबाई शिखरावर केवळ ३८ मिनिटांत पोहोचतो. सह्याद्रीतील सर्वांत अवघड ‘बाण सुळका’ अवघ्या नऊ तासांत सर करणारा असा हा मावळा म्हणजे शेतकरीपुत्र तानाजी. या जिगरबाज मावळ्याच्या आईवडिलांचा शोध घेता मी पोहोचलो ते शेतकरी मोतीराम साळू केकरे आणि सौ. विठाबाई मोतीराम केकरे यांच्या झोपडीत.
कळसूबाईच्या डोंगररांगेत असलेल्या आंबेवाडीतील एका झोपडीत अनेकदा उपाशी राहून कष्टाच्या संसारात पडेल ते काम करीत या दोघांनी हा सह्यझुंजार तानाजी तयार केला. आई अशिक्षित असली तरी तिने तानाजीला पदवीपर्यंत शिकवले. पदवीधर तानाजी आता शेतीत राबतो व दऱ्याडोंगरात ‘गाइड’चेही काम करीत आईवडिलांना संसारात मदत करीत असतो. मोतीराम केकरे म्हणाले, ‘‘शाळकरी तानाजी गाइड म्हणून पर्यटकांना फिरायला घेऊन गेला. घरी परतल्यावर त्याने माझ्या हातावर कमाईच्या नोटा ठेवल्या. दुःखीकष्टी संसारातून मोठा झालेल्या आमच्या मुलाची ती पहिली कमाई बघताना मला आनंदाश्रू आले.’’
मोतीराम आपल्या संसाराची कहाणी सांगू लागतात. ‘‘माझा शेतकरी बाप साळु केकरे रानात कष्ट करता करता वारला तेव्हा; मी फक्त एक महिन्याचा होतो. आई काशाबाईने माझा सांभाळ केला. माझी आई माणुसकीचा झरा होती. चुलत्याची पत्नी वारल्यावर त्याच्या पाच मुलांचा सांभाळदेखील माझ्या आईनेच केला. त्यापैकी एक डॉक्टर, एक सरकारी हुद्द्यावर मोठा अधिकारी झाला. माझ्याकडे थोडे दुर्लक्ष झाले; शिवाय गरिबीमुळे माझ्या नशिबी मजुरी आली. घरी दारिद्र्य असल्याने शाळेत असतानाच मी २० रुपये मजुरीने शेतीकामाला जाऊ लागलो.
आमच्या वाडीशेजारील मांजरगावात सख्खा मामा राहत होता. त्याची मुलगी विठाबाईबरोबर माझे लग्न लागले. लग्नाचा २२ हजार रुपये खर्च चुलत्यानेच केला. माझ्या कष्टाच्या प्रवासाला आता विठाबाईची सोबत मिळाली होती,’’ असे मोतीराम सांगतात. मजुरीतून वार्षिक दोन हजार आणि स्वतःच्या शेतात भात पिकवून वर्षाला दहा हजार असे असा वार्षिक १०-१२ हजारांत मिळवून दोघे जण संसार करीत होते. पुढे तानाजीचा जन्म झाला. त्यानंतर पूजा आणि सुरेखा अशा दोन मुलीही झाल्या. संसार फुलला; पण डोंगरातील शेतमजुरीत पोट भरत नसल्याने मोतीरामने मायभूमी सोडली आणि ठाणे शहरात रेल्वे रुळावर काम करणाऱ्या मजूर टोळीत ते सामील झाले.
त्यांना आता १२० रुपये मजुरी मिळू लागली. ‘‘घरापासून दूर राहून मी रेल्वे रुळावर सहा वर्षे राबलो. हाडंकाडं खूप दुखायची. त्यामुळे रेल्वेचे काम सोडले. पुन्हा गावी आलो व शेतीत राबू लागलो. पण पैसा नसल्याने पुन्हा संसार अडचणीत आला. मग मी पुन्हा एकदा वाडी सोडली आणि आता नारायणगावच्या मजूर बाजारात जाऊन उभा राहिलो. तेथे अडीचशे रुपये रोजाने काम लागले. मग १५ दिवस शेती आणि १५ दिवस मजूर बाजार असा जीवनप्रवास चालू झाला. पैसा मिळावा म्हणून मी मजूरबाजारात एकदा पत्नीलाही घेऊन गेलो. तिने एक महिना मजुरी केली. अतिश्रमाने तिचे होत असलेले हाल पाहून पुन्हा पत्नीला कधीही मजूरबाजारात न नेण्याची शपथ मी घेतली.
शेती फुलू लागली
पुढे २००० मध्ये मीदेखील मजूरबाजार सोडला. ठेचा खात आम्ही तानाजीला मोठा केला. संसार करताना आम्ही कोणाचा रुपया डुबवला नाही, असे मोतीराम अभिमानाने सांगतात. मोतीराम व विठाबाईचे दिवस पालटून टाकण्यास सरकारी योजना धावून आल्या. अडीच लाखाचे सरकारी अनुदान मिळाल्याने त्यांनी शेतात विहीर खोदली. त्यामुळे शेती आता फुलू लागली आहे. दीड लाखाचे अनुदान मिळाल्याने झोपडीसमोर आता नवे घर बांधायला घेतले आहे. मुलगी पूजा दहावी शिकून लग्नघरी गेली आहे.
दुसरी मुलगी सुरेखा अजूनही नववीत शिकतेय. विहिरीवर सौरपंप बसावा, तानाजीला कोणी तरी दऱ्याडोंगरांतील इतर मुलांना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र उघडून द्यावे इतक्याच माफक अपेक्षा मोतीराम-विठाबाईंच्या आहेत. सह्याद्रीत आतापर्यंत ७५ सुळके सर करणारा बहादूर मुलगा इतरही मुलांना जिद्दीने घडवू शकतो. पण उपाशी राहून निर्माण केलेल्या या चित्त्याची दखल सरकारने किंवा समाजाने न घेतल्याची खंत केकरे दांपत्याला आहे.
(मोतीराम केकरे ८६६९२८१५९७)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.