नोकरी हे काही आयुष्याचे ध्येय होऊ शकत नाही. ती मिळाली नाही, म्हणून हातपाय गाळून बसण्यापेक्षा शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून दिशा शोधता येते, हे बेलज (ता. चांदूरबाजार, अमरावती) येथील ऋषिकेश जुनगरे यांनी दाखवून दिले आहे. म्हैसपालनासाठी आवश्यक बहुवार्षिक चाऱ्याच्या नव्या सुधारित जातीच्या लागवडीतून नवा व्यवसाय सुरू झाला. आता चारा विक्री, चारा बेणे, गांडूळ खत, गोवऱ्या यांच्या विक्रीतूनही गेल्या तीन वर्षात २२ लाखांची उलाढाल त्यांनी गाठली आहे..अमरावती जिल्ह्यातील बेलज (ता. चांदूरबाजार) येथील ऋषिकेश शरद जुनगरे (वय २९ वर्षे) याने बी.ए. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पोलिस खाते किंवा लष्करामध्ये भरतीसाठी नशीब आजमावले. पण अनेकदा संधी आल्या आणि गेल्या. निराश होऊन हातपाय गाळण्यापेक्षा त्याने शेतीत लक्ष घातले. त्यांच्या कुटुंबीयांची सहा एकर शेती आहे. पारंपरिक तूर, कपाशी सोबतच पपई, कलिंगड या सारखी व्यावसायिक पिके घेण्यावर त्यांचा भर आहे. दरवर्षी अर्ध्या एकरावर पपईची लागवड फेब्रुवारी महिन्यात करतात. साधारणतः ८ ते ९ महिन्यात हे पीक काढणीस येते. योग्य व्यवस्थापनाला पोषक वातावरणाची जोड मिळाल्यास सरासरी चार ते साडेचार टन उत्पादन हाती येते..Agriculture Entrepreneur: भैरवधन रेसिडन्सी : कृषी पदवीधराचा नवा स्टार्टअप.हंगामात सरासरी १० ते ११ हजार रुपये टन असा दर मिळतो. एका एकरावर कलिंगडाची फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत लागवड केली जाते. साधारणतः १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याला सरासरी ९ ते १० हजार रुपये टन याचा दर राहत असल्याचा गेल्या काही वर्षांतील त्यांचा अनुभव आहे. पारंपरिक पिकांमध्ये तूर दीड एकर असते. त्यातून एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्याला गेल्या वर्षी ६,३०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला होता. या वर्षी सध्या तरी तुरीचे दर ६,००० रुपयांवर दिसताहेत. कापूस लागवड एक एकर असून, त्यातून सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या वर्षी ७,००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता..दुधाळ व्यवसायाची केली सुरुवात शेती ही प्रामुख्याने वातावरणावर अवलंबून असते. वातावरणातील बदलामुळे त्यात गेल्या काही वर्षांत अडचणी सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीमध्ये २०१४ मध्ये जुनगरे कुटुंबीयांनी दुग्ध व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. एकेक करत पाच एचएफ गाईंची खरेदी करण्यात आली. २ लाख रु. भांडवल किती गुंतवले. मात्र गाईच्या दुधाचे खरेदी दर २७ ते २८ रुपये प्रति लिटर मिळत होते. प्रती लिटर दुधाचा उत्पादन खर्च २२ ते २३ रुपयांच्या घरात पोचल्याने अपेक्षित नफा हाती येत असल्याचे लक्षात आले..Agriculture Entrepreneurs : शेतकरी हेच खरे उद्योजक.काही दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा विचारही या गायींच्या दुधात स्निग्धतेचे (फॅट) प्रमाण कमी असल्याने मागे पडला. दोन वर्षे या व्यवसायात सातत्य ठेवूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे पाहता गोपालनापासून म्हशीपालनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. गाईंची विक्री करत आलेल्या रकमेतून सहा मुऱ्हा म्हशींची खरेदी केली. शेड उभारले. यासाठी एकूण चार लाख रुपये खर्च आला. त्यानंतर मात्र दूध व्यवसायात सातत्य राखले आहे. शेती व दूध व्यवसायात ऋषिकेशला थोरला भाऊ गौरव (वय ३२) व वडील शरदराव यांची मोठी मदत होते. .म्हशीच्या दुधासाठी करार म्हैसपालनात पुढे जाताना दूध विक्री व दराची शाश्वती मिळण्यासाठी ऋषिकेश यांनी अचलपूर येथील एका डेअरी व्यावसायिकासोबत करार केला आहे. १४ ते १५ म्हशींपैकी दुधातल्या ९ ते १० म्हशी असता. त्यापासून मिळणारे सुमारे ५५ ते ६० लिटर दूध त्यांना ६० रुपये प्रति लिटर या प्रमाणे रोज पुरवले जाते. प्रति दिन ३००० ते ३६०० रुपयांचे उत्पन्न हाती येते. प्रति लिटर दुधामागे पशुखाद्यावरील खर्च ३५ रुपयांपर्यंत होतो. पशुखाद्य म्हणून विविध पेंडी, आट्यासोबतच हिरवा आणि वाळलेला चारा दिला जातो. मुऱ्हा म्हैस एका वेळेस सरासरी चार ते साडेचार लिटर दूध देते. या म्हशींचा भाकडकाळ तीन ते साडेतीन महिना इतका राहतो. .गोवऱ्या ठरतात उत्पन्नाचे साधनपूजाविधी, अंत्यसंस्कार यासाठी शेणाच्या गोवऱ्यांना मागणी असते. विदर्भातील अनेक धार्मिक यात्रांमध्ये रोडगे (खाद्यपदार्थ) तयार केले जातात. रोडगे भाजण्याकामी गोवऱ्यांचा वापरल्या जातात. पाच रुपये प्रति नग याप्रमाणे गोवऱ्याची विक्री होते. त्यातून वर्षभरात ९० हजार ते १ लाख रुपयांचे उत्पन्न हाती येत असल्याचे ऋषिकेश सांगतात..Agriculture Entrepreneur : कृषी उत्पादक आता उद्योजक व्हावा.गांडूळ खत नुसतेच म्हशींचे शेण विकण्यापेक्षा त्यापासून दर्जेदार गांडूळ खत उत्पादनावरही भर दिला आहे. त्यासाठी सुरुवातीला प्लॅस्टिक बेडचा वापर केला होता. मात्र यात पाण्याची मात्रा कमीअधिक झाल्यास गांडूळ दगावण्याची शक्यता वाढते. त्याच प्रमाणे अनेक जण टीनपत्र्याचे शेड बांधण्याचाही नाहक खर्च करतात. त्याऐवजी जुनगरे यांनी थेट जमिनीवरच गांडूळ खताचे वाफे तयार केले आहेत. या बेडवर नेपियरचे टाकाऊ भाग झाकण म्हणून टाकले जातात. या माध्यमातून १५ ते २० टन गांडूळ खत उत्पादन होते. खताची विक्री दहा रुपये, तर गांडुळांची विक्री ४०० रुपये प्रति किलो या प्रमाणे केली जाते..कृषी विद्यापीठाचा आयडॉल शेतकरी ऋषिकेश जुनगरे याने विकसित केलेले दुग्ध आणि चारा उत्पादनाचे मॉडेल शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करणारे आहे. त्यांच्या या कार्याची दखल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने घेतली आहे. त्यांना ‘शेतकरी आयडॉल’ म्हणून सन्मानित केले. कृषी विद्यापीठाअंतर्गत विदर्भातील ११ प्रादेशिक संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालयांच्या परिसरात त्यांच्या कार्याचे फ्लेक्स लावले आहेत. जुनगरे कुटुंबीय हे घातखेड (अमरावती) केव्हीके यांचे संपर्क शेतकरी आहेत. चाऱ्यासोबतच शेतीतील मार्गदर्शन ‘केव्हीके’चे प्रमुख डॉ. अतुल कळसकर यांच्याकडून मिळते. आर्थिक सक्षमता गाठण्यात यश मिळविले. त्यासोबतच केव्हीकेच्या वतीने खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला होता. .Rural Entrepreneur: वेटर जेव्हा हॉटेलमालक बनतो.चारा उत्पादन आणि विक्री पशुखाद्यावरील खर्चात बचत करण्यासाठी ऋषिकेशने प्रयत्न सुरू केले. पारंपरिक मका लागवड केल्यास काढणीनंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा पेरणी करावी लागते. यात बराच वेळ खर्ची जातो. त्यामुळे बहुवार्षिक चारा पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. सामाजिक माध्यमामध्ये काही बहुवार्षिक चारा वाणांची माहिती मिळाली. तिथे संपर्क केला असता झाशी येथील भारतीय कृषी संशोधन केंद्राअंतर्गत असलेल्या चारा संशोधन केंद्राची माहिती समजली. त्यांच्याशी संपर्क साधून देशभरात उपलब्ध विविध अधिक उत्पादन बहुवार्षिक चारा वाणांविषयी जाणून घेतले..त्यांच्या संपर्कातील उत्तम चारा उत्पादकांकडून अस्सल वाण खरेदी केले. आज त्यांच्याकडे तीन एकरावर गुणवंत, सुपर नेपिअर, ऑस्ट्रेलियन रेड नेपिअर, ८६०३२ ऊस क्रॉस, मारवेल व जाडी मारवेल, पंजाबचा मका क्रॉस, व्ही-१ तुती, अमेरिकन ५-जी, फोर-जी बुलेट, बंगाल हाफ, इंडोनेशियन स्मार्ट नेपिअर, फुले जयवंत, एचडीएम-६, एचडीएम-११ अशा प्रकारच्या विविध चारा वाणांची लागवड आहे. तीन महिन्यात एका कापणीला २० ते २२ टन चारा मिळतो. घरगुती गोठ्यासाठी वापरल्यानंतर शिल्लक हिरव्या चाऱ्याची कुट्टी (कुटार) अन्य शेतकऱ्यांना ३ ते ४ रुपये प्रति किलो दराने विकली जाते. .चारा बेण्यांचे विक्री व्यवस्थापन जुनगरे कुटुंबीयांकडे विविध चारा वाण उपलब्ध असल्याचे समजल्याने बेण्याला मागणीही सुरू झाली. २०२१ मध्ये व्यावसायिक पातळीवर विक्री सुरू केली. पुढे सामाजिक माध्यमांमध्ये पोस्ट करत बेण्याला अधिक ग्राहक मिळविण्यात आले. जुनगरे कुटुंबीय यशस्वी झाले आहे. लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांचे पीक झाल्यावर उगवणक्षम डोळे असलेले बेणे काढले जाते. कोरडवाहू शेतकऱ्याकडून जुलै ते डिसेंबर या कालावधीत चारा बेण्याला सर्वाधिक मागणी राहते. तर पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी त्यांच्याकडे वर्षभर मागणी नोंदवितात..आता संपूर्ण महाराष्ट्रासोबत अन्य राज्यातूनही बेण्याला मोठी मागणी असते. महाराष्ट्रातील मागणी ते एसटी पार्सलच्या माध्यमातून पूर्ण करतात. तर अन्य राज्यातील शेतकऱ्यांना कुरिअरने पाठवतात. ६० हजार व त्यापेक्षा अधिक बेण्याची मागणी असल्यास १ रुपया प्रति बेणे दर आकारला जातो. त्यापेक्षा कमी मागणी असल्यास दोन रुपये प्रति बेणे असा दर निश्चित केला आहे. त्यांच्या बेण्याला आसाम, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात या राज्यातून सर्वाधिक मागणी असल्याचे ऋषिकेश सांगतात. ऋषिकेश जुनगरे ९६६५९५३२९१,गौरव जुनगरे ८६००३१७६३१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.