
किरण भवरे
Agriculture Success Story : यवतमाळ- नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर पैनगंगा अभयारण्यालगत दुर्गम खरबी (जि. यवतमाळ) गावातील युवा शेतकरी राजू नामदेव पांडे सुधारित शेतीतंत्राचे धडे गिरवीत त्यात कुशल होत आहे. त्यातून सोयाबीन, हरभरा, मका, तीळ पीकपद्धती त्याने आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली. पिकांची उत्पादकता वाढवली. दोन वर्षांपासून शून्य मशागत तंत्राचा वापर सुरू करून खर्चही कमी करण्यास सुरुवात केली आहे.
शेतीतील प्रयोगशीलता
वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीच्या तोट्यातील शेतीचे चित्र बदलायचे तर अभ्यासपूर्ण, सूक्ष्म नियोजनातून व नवे तंत्रज्ञान वापरून व्यावसायिक दृष्टिकोन रुजवावा लागेल. हीच राजू यांची विचारसरणी आहे. हे विचार त्यांनी कृतीत आणण्यास सुरुवात केली आहे. पाच एकरांत सोयाबीन, हरभरा, मका व तीळ अशी पीक पद्धती आहे. तीन एकर शेती बटाईने केली जात आहे.
अनेकदा आपल्याकडे एखादी गोष्ट नसल्याची सल असते. मात्र आपल्याकडे काय नाही यापेक्षा जे आहे त्याचा उपयोग करण्याविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन राजू यांनी बाळगला आहे. शेतात विहीर खोदताना अखंड पाषाण लागला. त्यांच्या शेतजमिनीतही बऱ्याच ठिकाणी अखंड पाषाण आहे. काही ठिकाणी तर पाषाण जमिनीच्यावर आलाआहे. मात्र निराश न होता नव्या जोमाने अखंड दगड फोडून विहीर खोदली. शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध केले. विहिरीवरून दोन वर्षांपूर्वी पाइपलाइन देखील केली.
व्यवस्थापनातील बाबी
पूर्वी सोयाबीनचे एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन होते. ते सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सोयाबीन व हरभऱ्यासाठी टोकणीयंत्रा, कृषी विद्यापीठांकडील सुधारित वाणांचा वापर.
रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी. त्यातून पावसाच्या पाण्याचे सरीद्वारे संवर्धन. अति पावसात पाण्याचा निचरा होऊन पिकाची चांगली वाढ. यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत सुकर.
सुधारित लागवड पद्धतीचा वापर. त्यातून रोपांची योग्य संख्या राखून उत्पादनवाढीस मदत.
दरवर्षी शेणखत एकरी एक ट्रॉली. फेब्रुवारीदरम्यान शेणखत कुजवण्याची प्रक्रिया सुरू. त्यात ट्रायकोडर्मा व जिवाणू कल्चर यांचा वापर. दर आठ दिवसांनी पाणी देऊन ते जूनपर्यंत चांगले कुजते.
शून्य मशागत तंत्राचा वापर
मागील वर्षापासून शून्य मशागत तंत्राचा वापर. यात दोन पद्धतींचा अवलंब.
खरिपात सोयाबीन, त्याच गादीवाफ्यावर (बेड) रब्बीत हरभरा व उन्हाळ्यात तीळ लागवड.
दुसऱ्या पद्धतीत सोयाबीन व रब्बीत मका. मक्यानंतर थेट खरिपात सोयाबीन.
हलक्या जमिनीत दोन बेडमधील अंतर साडेचार फूट, त्यात प्रत्येकी तीन ओळी, तर भारी जमिनीत दोन बेडमधील अंतर साडेतीन फूट व त्यात प्रत्येकी दोन ओळी अशी सोयाबीनसाठी पद्धत.
यंदा हरभऱ्यात कोथिंबिरीचे आंतरपीक.
उत्पादन आणि उत्पन्न
सुधारित व्यवस्थापनाचे परिणाम दिसू लागले आहेत. शून्य मशागत तंत्रात मागील वर्षी सोयाबीनचे एकरी १६ क्विंटल, यंदा साडे १४ क्विंटल, हरभऱ्याचे १० क्विंटल, तर मक्याचे ४५ क्विंटल उत्पादन मिळाले. अलीकडील वर्षांत सर्व पिकांची उत्पादकता चांगल्या पद्धतीने मिळत आहे. तिळाचे दरवर्षी एकरी सहा ते सात क्विंटलपर्यंत, तर मक्याचेही ३५ क्विंटलपासून पुढे उत्पादन मिळते. सोयाबीनला मागील वर्षी क्विंटलला पाच हजार रुपये, मक्याला १८०० ते दोन हजार रुपये दर मिळाला. तिळाला प्रति क्विंटल १० हजार ते १३ हजारांपर्यंत दर मिळतो.
खर्चात बचत
पूर्वी मशागतीसाठी एकरी किमान पाच हजार रुपये खर्च यायचा. शून्य मशागत तंत्राद्वारे पाच एकरांत सुमारे २५ हजार रुपयांची बचत करणे शक्य झाले आहे. सर्व पिकांचे बियाणे घरचेच वापरण्यावर भर असतो. त्याद्वारेही काही हजारो रुपयांची बचत होत आहे.
कुटुंबाची शेतीत मोठी साथ
राजू यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आई सुमनबाई व पत्नी सुश्मिता देखील शेतात राबतात.ऋषभ आणि स्वराज अशी गोंडस मुले आहेत. मोठा भाऊ विकास यांनाही राजू यांच्या प्रयोगशीलतेची प्रेरणा मिळाली आहे. दोघा भावांमध्ये विचारांची देवाणघेवाण सुरू असते.
देशी आंब्याचे संवर्धन
अभयारण्याच्या लगत शेती असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा वावर कायम असतो. त्यामुळे राजू यांनी शेतीला कुंपण केले आहे. त्याला पक्का आधार म्हणून फळझाडे लावली आहेत. त्यामध्ये रसाळ, चविष्ट देशी आंब्याची लागवड केली आहे. दिवसेंदिवस दुर्मीळ होत चाललेल्या आंब्याच्या देशी जातींच्या संवर्धनाचे महत्त्वाचे कार्य राजू अशा रीतीने करीत आहेत.
सोशल मीडियाद्वारे तंत्रप्रसार : राजू यांनी वेळ, तंत्रज्ञान व इंटरनेटचा सदुपयोग करीत कृषी शिक्षण देणारे स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल सुरू केले आहे. त्यातून दुर्मीळ वाण, पाणी बचत, बीजप्रक्रिया, यंत्राद्वारे पेरणी, कीडनाशके, पीकविमा आदी विषयांसह सोयाबीन, हरभरा, तूर, मका, तीळ आदींचे सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ चॅनेलवर प्रसिद्ध केले आहेत. सुमारे २० हजारांपर्यंत चॅनेलचे फॉलोअर्स आहेत.
राजू पांडे ७३५०८७९०८५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.