
संतोष मुंढे
Small Business Success: छत्रपती संभाजीनगर येथील जयश्री देगावे यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले आहे. वडील चांगोजी भिसे यांनी मुलगी जयश्री यांच्यासह त्यांच्या दोन मुलांना उच्चशिक्षित केले. वडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा उपयोग नोकरीऐवजी स्वतंत्र व्यवसायात करण्याचा त्यांचा पहिल्यापासूनच प्रयत्न होता. त्यादृष्टीने त्यांनी हर्बल प्रॉडक्ट उत्पादनांना सुरुवात केली. जयश्री देगावे यांचे पती मधुकर नागोराव देगावे हे छत्रपती संभाजीनगर येथील आयटीआयमध्ये इन्स्ट्रक्टर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या समर्थ साथीने त्यांची यशस्वी उद्योजिका होण्याच्या दिशेने वाटचाल झाली.
जयश्रीताईंनी सुरुवातीला दोनशे रुपयांची गुंतवणूक करून केस वाढीसाठी आवळा आणि शिकेकाई मिश्रित पावडर तयार केली. ‘युवर हेल्थ अँड ब्यूटी केअर’ ही त्यांची टॅगलाइन आहे. केस वाढीसाठी ही पावडर उपयोगी ठरल्याने मागणी वाढली. ही पावडर मोठ्या प्रमाणात तयार करणे पहिल्या टप्प्यात शक्य नसल्याने जालनास्थित एक कंपनीकडून मागणीनुसार त्यांनी आवळा पावडर, उटणे, शिकेकाई पावडर, मेहंदी कंडिशनर, मुलतानी मातीचा वापर करून स्वतःचे प्रॉडक्ट तयार केले. १०० ग्रॅम ते एक किलोपर्यंत उत्पादनांचे आकर्षक पॅकिंग करून विक्री सुरू केली.
सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाच्या माध्यमातून २०१८ मध्ये जयश्रीताईंनी अन्न प्रकिया प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एक महिन्याचा इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम कोर्स केला. यानंतर त्यांनी अन्नप्रक्रिया उद्योगाच्या उभारणीस गती दिली. आवश्यक प्रमाणपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली. पहिल्या टप्प्यात गव्हाच्या पिठाचे केक प्रीमिक्स, चकली भाजणी, मिक्स दलिया, मिलेट्स थालीपीठ भाजणी, पारंपरिक थालीपीठ भाजणी, मिलेट्स केक प्रीमिक्स, दालबाटी पीठ, ढोकळा पीठ, अनारसा पीठ निर्मितीला सुरुवात केली.
या उत्पादनांसाठी मैदा, संरक्षके न वापरता विक्री सुरू केली. दिव्या फूड प्रॉडक्ट्स अॅण्ड हर्बल प्रॉडक्ट अंतर्गत २०० ग्रॅम, अर्धा किलो आणि एक किलोपर्यंतच्या पॅकिंगमध्ये उत्पादनांची विक्री केली जाते. या पदार्थांच्या विक्रीतून दर महिन्याला पंचवीस हजारांची उलाढाल होते. जयश्रीताई या उत्पादित पदार्थांच्या विक्रीसाठी सोशल मीडियाचा परिणामकारक वापर करतात. तयार पदार्थांचा डिजिटल कॅटलॉग यांनी तयार केला आहे. फेसबुक पेजवर त्यांचे सुमारे तीन हजार ग्राहक जोडलेले आहेत. याशिवाय पन्नास व्यावसायिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्या जोडलेल्या आहेत.
राज्यभर उत्पादनांना मागणी
दोन, चार ग्राहकांच्या मागणीपासून सुरू झालेला जयश्रीताईंचा दिव्या फूड प्रॉडक्ट्स अॅण्ड हर्बल प्रॉडक्ट उद्योग विस्तारात चालला आहे. सुमारे एक हजारांहून अधिक ग्राहक त्यांच्याशी जोडले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई आणि कोलकाता येथील ग्राहकांच्या समावेश आहे. जेव्हा उद्योगाची सुरुवात केली तेव्हा थेट ग्राहकांपर्यंत उत्पादनांच्या विक्रीचे तंत्र अवलंबले होते. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील नऊ ठिकाणी त्यांची उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत. याशिवाय कुरिअर मार्फत घरपोच सेवेची सोय देखील केली आहे.
शेतकऱ्यांकडून शेतीमालाची खरेदी
जयश्रीताई अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागणारा गहू, हरभराडाळ, मूगडाळ, उडीदडाळ शेतकऱ्यांकडूनच खरेदी करतात. उत्पादनांना मागणी वाढल्याने आता पीएमएफएमई योजनेअंतर्गत कर्ज घेऊन उत्पादकता वाढीसाठी त्यांनी आधुनिक प्रक्रिया यंत्रांची खरेदी केली आहे. यामध्ये रोस्टिंग आणि मिक्सिंग यंत्र, तीन एचपी ग्राइंडिंग यंत्र, पॅकिंग यंत्र, वजन काटा, दीड एचपी ग्राइंडिंग यंत्राचा समावेश आहे. दर महिन्याला सुमारे एक टन प्रक्रियेची क्षमता त्यांच्या उद्योगाने गाठली आहे. या उद्योगामध्ये तीन महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
नैसर्गिक रंगाचे उत्पादन अन् विक्री
जयश्रीताईंच्या मैत्रिणीच्या मुलीच्या त्वचेला होळीच्या वेळी रासायनिक रंगाचा त्रास झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन त्यांनी एमजीएम कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ वैशाली देशमुख यांच्याकडून नैसर्गिक रंग निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. २०१७ मध्ये एमजीएम कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित दोन दिवशीय नैसर्गिक रंग निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. नैसर्गिक रंग निर्मितीसाठी हळद, बीट, पळसाची फुले, नीळ पावडर, खाद्य रंग, मेहंदीचा वापर केला जातो.
कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जयश्रीताईंनी पहिल्या वर्षी ३० किलो नैसर्गिक रंग तयार केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ओळखीच्या लोकांना या रंगांची विक्री केली. या रंग विक्रीतून ६,४३० रुपये निव्वळ नफा झाला. दुसऱ्या वर्षी ८० किलो नैसर्गिक रंग तयार केला. या रंगाची त्यांनी थेट ग्राहकांना विक्री केली. यातून त्यांना १९,६०० रुपये नफा झाला. यंदाच्या वर्षी देखील त्यांनी नैसर्गिक रंग निर्मितीला सुरवात केली आहे. वर्षभरात केवळ १० दिवसांचा रंग निर्मितीचा हा व्यवसाय त्यांना अपेक्षित आर्थिक नफा मिळवून देतो.
- जयश्री देगावे ९७६२३५१३३५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.