Akola News: राज्यात या मोसमात विक्रमी सोयाबीन खरेदी होत असून अनेक जिल्ह्यात खरेदी केलेला माल साठवणुकीचा प्रश्न तयार होत आहे. गोदामांच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या असून हा माल साठवण्यास विलंब होत आहे. सोयाबीन खरेदीने यंत्रणेची दमछाक केली असून, तूर खरेदीचा मुद्दा त्यामुळेच सध्या दूर ठेवण्यात आला आहे.
आधी सोयाबीनचा विषय पूर्णतः संपवल्यानंतरच तुरीच्या खरेदीबाबत हात घालण्यास यंत्रणास्तरावर मानसिकता बनल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी (ता.२९) तूर खरेदीच्या अनुषंगाने मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यात काहीही झालेले नाही. आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तूर खरेदी कदाचित सुरू होऊ शकेल, अशी शक्यता जाणकार सूत्राने व्यक्त केली.
राज्यात हमीभाव खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबवली जात आहे. नाफेडच्या माध्यमातून विविध एजन्सीच्या सहकार्याने खरेदी केली जात आहे. खरेदी झालेले सोयबीन वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये साठवले जात आहे. मात्र, तालुकास्तरावर असलेल्या गोदामांची क्षमता केव्हाच पूर्ण झाल्याने आता जिल्हास्तरावरील गोदामांमध्ये माल साठवणुकीचा पर्याय काढण्यात येत आहे.
तेथेही माल उतरविण्यासाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तालुकास्तरावरील यंत्रणा तोकडी ठरत असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. राज्याला १४ लाख टन सोयाबीन खरेदीची परवानगी देण्यात आलेली असून आतापर्यंत नऊ लाख टनांपर्यंत खरेदी झाल्याची माहिती आहे. १४ लाख टन खरेदीचा लक्ष्यांक गाठणे अद्यापही बाकी आहे.
आज (ता. ३१) आता मुदत संपत असल्याने नव्याने काय धोरण ठरते यावर खरेदीचे भवितव्य अवलंबून आहे. अकोला जिल्ह्यात दुसऱ्यांदा वाढवून दिलेला लक्षांकही संपल्याने खरेदी रखडली आहे. जिल्ह्यात हजारोंचे सोयाबीन विक्री व्हायचे आहे. जिल्ह्यांना काही ठिकाणी मुदत वाढीची मागणी होत असून खरेदीची मुदतही वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अतिरिक्त गोदाम सुविधेची गरज
विविध गावे, तालुकास्तरावर खरेदी केलेले सोयाबीन गोदामांमध्ये साठवण्यासाठी खरेदीदारांची दमछाक होत आहे. वाहने तासनतास उभी ठेवावी लागत असल्याने हे भाडे चुकवण्याचा फटका बसतो आहे. हा खर्च शासनाकडून खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या कमिशनपेक्षा अधिक होत आहे. साठवणूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त गोदाम सुविधेची गरज निर्माण होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.