डॉ. विलास टाकळे, सतीश डोरले, डॉ. विलास टाकळे, सतीश डोरले
Animal Health: तुतीच्या पानांचा प्रामुख्याने रेशीम कीटकांच्यासाठी खाद्य म्हणून होतो. याचबरोबरीने तुतीचा वापर पशुखाद्य आणि औषधी वापरासाठी करता येतो. त्यांचे चांगले फायदे दिसून आले आहेत. तुती ही एक जलद वाढणारे पीक आहे. पानांच्या कुशीत फुले येतात. तुतीचे फळ २-३ सेंमी लांबीचे असते. फळे मांसल,गडद लाल ते काळ्या रंगाची असतात. पूर्णपणे पिकल्यावर आंबट गोड चवीची होतात.
तुती लागवडीसाठी सुपीक, मुरमाड अगदी हलक्या जमिनीत सुद्धा, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते. कटींगद्वारे , परिपक्व फांद्यापासून सुद्धा रोपे तयार करून लागवड करता येते. लागवड ४ बाय १० किंवा ४ बाय १२ फुटावर करावी. लागवड करताना १ बाय १ बाय १ फूट आकारमानाचा खड्डा करून त्यामध्ये २ किलो कुजलेले लेंडीखत / शेणखत त्याचबरोबर १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिश्रण टाकावे.
खड्यात खत, माती मिश्रण भरून ठिबक सिंचन लॅटरल टाकाव्यात. रोप लागवडीपूर्वी पाणी द्यावे. खड्यात पुरेशी ओल झाल्यानंतर रोपे लावावे. लागवड करावयाची रोपे / कलमे किमान दोन महिन्यांपुढील असावीत. लागवडीसाठी जून, जुलै हा उत्तम हंगाम आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात लागवड करता येते. उन्हाळ्याच्या महिन्यांत लागवड टाळावी.
पाल्याची पहिली कापणी ६० दिवसांनंतर करावी. जमिनीपासून दीड फूट सोडून पहिली छाटणी करावी. पहिली छाटणी झाल्यानंतर प्रति झाड ५० ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. पहिल्या छाटणीनंतर दुसरी छाटणी ४५ दिवसांनंतर करावी. पहिल्या छाटणीनंतर दोन, तीन नवीन फांद्या निघाल्यावर त्यापासून एक फुटापासून छाटणी करावी.
तिसरी छाटणी ही दुसऱ्या छाटणीनंतर ३५ - ४० दिवसांनी करावी. अशा पद्धतीने झाडाची कॅनोपी व्यवस्थापन करून प्रती झाड किमान १६ मुख्य फांद्या ठेवणे गरजेचे आहे.
एका झाडापासून १५० दिवसानंतर ४० किलो पाला मिळतो.
१५० दिवसानंतर दर ३ महिन्यांनी शेणखत, युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट खताची मात्रा द्यावी.
लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यांनी तुतीची चाऱ्यासाठी कापणी करता येते, त्यानंतर ६ ते ८ आठवड्यांचा छाटणीचा कालावधी असतो. कापणी करताना, फांद्या वरच्या दिशेने कापल्या पाहिजेत, यामुळे साल निघणार नाही.
पौष्टिक चाऱ्याची उपलब्धता
तुती हा रवंथ करणाऱ्या जनावरांसाठी उत्कृष्ट चारा आहे. तुतीची पाने दुधाची गुणवत्ता (प्रथिने आणि चरबी) आणि प्रमाण वाढवतात. ताजी किंवा कोरडी पाने खाद्य मिश्रणात देता येतात.
गाय, शेळ्यांना तुतीची पाने खायला दिल्याने दूध देण्याचे प्रमाण, प्रथिनांमध्ये वाढ दिसून आली आहे.
कोकरे, शेळीच्या आहारात तुतीची पाने दिल्याने वजनात वाढ दिसून आली आहे.
दुधाळ जनावरांमध्ये व्यंधत्व निवारणासाठी, माजाचे चक्र सुरळीत करण्यासाठी तुतीची पाने उपयुक्त ठरतात. तुती पानांमधील फायटो इस्ट्रोजन घटक माज नियमित करण्यास मदत करतात.
कोंबडी खाद्यामध्ये तुती पाल्याचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे अंड्याचा आकार आणि उत्पादन वाढते. पिवळ्या रंगात सुधारणा होते. व्यावसायिक खाद्यापेक्षा अंड्यांमध्ये जीवनसत्त्व के आणि बीटा कॅरोटीन वाढविण्यासाठी तुतीच्या पानांच्या पेंडीचा वापर ९ टक्क्यांपर्यंत करावा.
तुतीमध्ये संतुलित खनिजे, उच्च प्रथिनांचे प्रमाण असल्याने जनावरे निरोगी राहतात.
शास्त्रज्ञ ली आणि ली (२००१) यांच्या संशोधनानुसार औषध उद्योगात तुतीची पाने, मुळे आणि देठांचा वापर करता येतो. मानवी आजारांच्या उपचारामध्ये तुतीचा वापर करतात. उदा. बेरीबेरी, बाह्य सूज, मधुमेह, स्ट्रोक, सर्पदंश, कीटक चावणे, घाम येणे, फोडे, जखमा, भाजणे इत्यादी.
तुती पानांमध्ये जीवनसत्त्व ब आणि क चांगल्या प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तुतीच्या पानांमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी लागणारे सिटोस्टेरॉल असते.
तुती पानातील पोषक घटक
पोषक घटक प्रमाण
कोरडे पदार्थ २८.४ टक्के
आर्द्रता ७१-७५ टक्के
कच्चे प्रथिन ५-१० टक्के
कच्चे चरबी ०.६४-१.५० टक्के
एकूण राख ४.५० टक्के
कच्चे तंतू ९.९०-१३.८५ टक्के
कार्बोहायड्रेट्स ८-१३ टक्के
ऊर्जा (किलो कॅलरी/१०० ग्रॅम) ६९-८६
न्यूट्रल डिटर्जंट फायबर ८-११ टक्के
आम्ल डिटर्जंट लिग्निन ३.४०-८.१० टक्के
हेमिसेल्युलोज २.५०-१२.८० टक्के
एस्कॉर्बिक आम्ल ( मिग्रॅ/१०० ग्रॅम) १६०-२८०
कॅरोटीन (मिग्रॅ/१०० ग्रॅम) १०.०००-१४.६८८
लोह (मिग्रॅ/१०० ग्रॅम) ४.७०-१०.४०
झिंक (मिग्रॅ/१०० ग्रॅम) ०.२२-१.१२
कॅल्शिअम (मिग्रॅ/१०० ग्रॅम) ३८०-७८६
- डॉ. विलास टाकळे, ९५४५४३३५७४
(वरिष्ठ संशोधन अधिकारी, बाएफ, वाघोली फार्म, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.