Mulberry Management : तुती रोपवाटिका आणि बागेचे व्यवस्थापन

Nursery Management Techniques : तुती रोपवाटिकेसाठी दोन भाग माती आणि एक भाग कुजलेले शेणखत मिश्रण करून ५० फूट बाय ३ फूट बाय १.५ फूट आकाराचे गादी वाफे तयार करावेत. बेण्याचे दोन डोळे जमिनीच्या खाली आणि एक डोळा जमिनीच्या वर राहील.
Mulberry Cultivation
Mulberry CultivationAgrowon
Published on
Updated on

डॉ. सी. बी. लटपटे

Yield improvement : तुती लागवडीसाठी मध्यम भारी प्रकारची योग्य पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावे. जमिनीचा सामू ६.५ ते ७.२ पर्यंत असावा, सेंद्रिय कर्ब प्रमाण १ असावे. लागवडीसाठी चिबड किंवा चोपण जमीन टाळावी. सपाट किंवा मध्यम उताराची जमीन तुती लागवडीसाठी योग्य ठरते. बाल्य कीटक संगोपनासाठी तुतीचा एस-३६ तर प्रौढ कीटक संगोपनासाठी व्ही-१ या वाणाची निवड करावी.

रोपवाटिका निर्मिती :

- एक एकर तुती क्षेत्रासाठी प्रथम २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. ८ ते १२ महिने वयाचे तुती बागेतील पेन्सिलच्या आकाराचे बेणे घ्यावे. ३ ते ४ डोळे असलेले बेणे सिकेटरच्या साह्याने काढून बुरशीनाशकाच्या (२० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाणी) द्रावणात ३० मिनिटे बुडवावे.

- गादी वाफे करताना दोन भाग माती आणि एक भाग कुजलेले शेणखत मिश्रण करून ५० बाय ३ बाय १.५ फूट आकाराचे गादी वाफे तयार करावेत. दोन डोळे जमिनीच्या खाली व एक डोळा जमिनीच्या वर राहील या प्रमाणे दोन दिवस अगोदर पाणी देऊन तयार केलेल्या गादी वाफ्यावर तुती बेणे लागवड करावी.

- दोन ओळींत १५ सेंमी आणि दोन बेण्यांत १० सेंमी अंतरावर लागवड करावी.

- गादी वाफ्यास ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. जून महिन्यात शेतात रोपे लागवड करावयाची झाल्यास रोपवाटिका १५ फेब्रुवारीपर्यंत तयार करून घ्यावी. मार्च महिन्यानंतर जमिनीचे तापमान वाढत असल्याने शेडनेट लावावे. तुती बहूवर्षी वृक्ष असल्याने हिवाळा व उन्हाळ्यातील काळ लागवडीसाठी टाळावा. रोपवाटिकेमध्ये तयार झालेल्या रोपांची ३.५ ते ४ महिन्यांपर्यंत शेतात लागवड करावीत.

- तुती लागवडीसाठी पट्टा पध्दत, खड्डा पध्दत, सरी पद्धत आणि ३ मीटर ओळ पद्धतीचा अवलंब करावा.

- धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यातील हलक्या डोंगर माथ्याच्या जमिनीवर तुती लागवड खड्डा पद्धतीने करून ठिबक सिंचन व्यवस्था केल्यास हलक्या जमिनीतून ३ ते ४ कोषाची पिके घेता येतील. भारी ते मध्यम काळ्या जमिनीत पट्टा पद्धतीने लागवड करावी.

Mulberry Cultivation
Mulberry Farming : शेड निर्जंतुकीकरण, दर्जेदार तुती पाला उपलब्धतेवर भर

पट्टा पद्धत लागवड :

- तुती लागवड पट्टा पद्धतीने ६ फूट बाय ३ फूट बाय २ फूट किंवा ५ फूट बाय ३ फूट बाय २ फूट अंतरावर केल्यास अनुक्रमे हेक्टरी झाडांची संख्या १२,३४५ आणि १३,८८८ एवढी बसते.

- लागवड केल्यानंतर दुस­ऱ्या वर्षी पासून सरासरी वर्षाकाठी कोषाची ८ ते ९ पिके घेता येतील.

- आपल्याकडे तिन्ही ऋतूमध्ये भरपूर सूर्य प्रकाश मिळतो, त्यामुळे तुतीची चांगली वाढ होते. महाराष्ट्र राज्यात व्ही-१ तुती जात लोकप्रिय आहे. प्रति एकरी दरवर्षी २५ टन प्रति पानांचे उत्पादन मिळते. जास्त पानांचे उत्पादन मिळविण्यासाठी पट्टा पद्धतीने तुती लागवड करावी.

- पट्टा पद्धतीने लागवड केल्यास तुती छाटणी, फांद्या तोडणी आणि वाहतूक सोईची होते.

- फांद्यावरील पानांमध्ये आवश्यक पाण्याचे प्रमाण जास्त काळ राहत असल्यामुळे रेशीम कीटक पाने खातात.

- पट्टा पद्धतीच्या तुती लागवडीमध्ये धैंचा, बोरू, मूग, उडीद लागवड करता येते. याचा तुती पिकास फायदा होतो.

- पट्टा पद्धतीमध्ये दोन जोड ओळींत चांगले ६ फूट अंतर राहिल्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश हवा, पाणी, व अन्नद्रव्य घटक तुती बागेस मिळतात. बॉडर रो इफेक्टमुळे तुती पानांची प्रत सुधारणा होते. पट्टा पद्धतीमध्ये ट्रॅक्टर चालवणे शक्य होते. आंतरमशागत करणे सोईचे होते, खर्चात ३० टक्के बचत होते.पट्टा पद्धत लागवडीत

ठिबक सिंचनाचा वापर करता येतो.

खड्डा पद्धत (३ फूट बाय ३ फूट बाय १.५ फूट) :

- हलक्या जमिनीत तसेच डोंगर उतारावर आठ फूट अंतरावर चर काढून ३ फूट बाय ३ फूट बाय १.५ फूट अंतरावर १.५ फूट बाय १.५ फूट आकाराचे खड्डे करून त्यात तुती रोपांची लागवड करावी. सपाट जमिनीवर ३ बाय ३ बाय १.५ फूट अंतरावर १.५ बाय १.५ फूट अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी १२,३४५ रोपे बसतात. बैलाच्या साह्याने उभी-आडवी आंतरमशागत करणे सोईचे होते. त्याचबरोबर उत्तम प्रतीच्या तुती पानांचे उत्पादन मिळते.

तीन मीटर ओळ पध्दत ः

- ३ ते ५ एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर तुती लागवडीसाठी ही पद्धत फायदेशीर ठरते. लागवडीसाठी ३ मी. बाय ३ मी. बाय ४ मी. आणि ३ मी. बाय ३ मी. बाय ४ मी. अंतराने लागवड केली जाते. एकरी ३,९६९ झाडे बसतात.

- या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे सर्व बाजूने आंतरमशागतीसाठी पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टरचा वापर करता येतो. त्यामुळे तण नियंत्रणावरील खर्च आणि वेळेत बचत होते.

जमिनीतील पोषक अन्न घटकांची सुधारणा :

खत व्यवस्थापन ः

- मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत जमिनीचा सामू हा ७ ते ८.५ आहे. तुती रोपांची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचा सामू ६.८ असावा. शेतकऱ्यांनी तुती लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावे. त्यानुसार जमीन सुपीकतेसाठी सुधारणा कराव्यात.

- नत्रयुक्त खते किंवा नत्र हे अमोनियम सल्फेटच्या स्वरूपात १२५ किलो /एकर/कोषाचे पीक या प्रमाणात दिले तर जमिनीतील फॉस्फरस, लोह आणि झिंक प्रमाणात वाढ होण्यास मदत होते.

Mulberry Cultivation
Mulberry Cultivation : तुती लागवडीच्या सुधारित पद्धती

- स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेट ७५ किलो/एकर/कोषाचे पीक या प्रमाणात दिल्यास जमिनीतील स्फुरद मात्रा वाढ होण्यास मदत होते.

- माती परीक्षण अहवालानुसार पालाश हे म्युरेट ऑफ पोटॅशच्या स्वरूपात द्यावे.

- तुती बाग ५ वर्षे वयाची झाली असेल तर झिंक सल्फेट १० किलो/एकर/वर्ष कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

- सेंद्रिय खत ८ टन/एकर/वर्ष दोन समान हप्त्यांमध्ये जून व नोव्हेंबर महिन्यात द्यावे.

- जमिनीचा सामू आम्लधर्मी असेल तर शेतात चुना मिसळावा लागतो. जमीन अल्कली प्रकारची असेल तर जिप्सम किंवा प्रेसमड जमिनीत मिसळावी.

- बहुतांशी मराठवाडा विभागातील जमिनीत ८० टक्के जस्त कमतरता जाणवते. हे लक्षात घेऊन १० किलो झिंक सल्फेट प्रति वर्ष दोन समान हप्त्यांत ६ महिन्यांच्या अंतराने तुती बागेस द्यावे.

रासायनिक खत मात्रा :

कोष पीक--- अमोनियम सल्फेट (किलो)--- सिंगल सुपर फॉस्फेट (किलो) म्युरेट ऑफ पोटॅश

(किलो)

१ ले पीक--- १४०--- ७०--- १९

२ रे पीक--- १४०--- ७०--- १९

३ रे पीक--- १४०--- ७०--- १९

४ थे पीक--- १४०--- ७०--- १९

५ वे पीक--- १४०--- ७०--- १९

स्रोत : (सेरीकल्चर फॉर हाय इन्कम बायहोल्टाइन फॉर क्वालिटी सिल्क, दंडिण, २००६)

तुती बागेत रासायनिक खत दिल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. तुती बागेस सहा महिन्यांच्या अंतराने ४ टन कुजलेले शेणखत आणि २ टन गांडूळ खत प्रति एकरी द्यावे. १.६ किलो सेरीआयझो आणि ०.४ किलो सेरीफॉस हे १५० ते २०० किलो कुजलेल्या शेणखतासोबत मिसळून सरीमधून द्यावे.

जून आणि जानेवारी महिन्यात तुतीच्या पट्टा पद्धत लागवडीमध्ये धैंचा किंवा बोरू ८ किलो प्रति एकर या प्रमाणात पेरून ४० ते ४५ दिवसांनी फुलोरा येण्याअगोदर नांगराच्या साह्याने गाडून टाकावे.

तुती छाटणी :

- लागवड केल्यानंतर एक वर्षाने जमिनीपासून २० सेंमी अंतरावर मे, जून महिन्यांत छाटणी करावी. ३५ दिवसांनंतर तुती पाने खाद्य म्हणून देण्यास तयार होतात. नंतर अंडीपुंजांतून बाहेर पडलेल्या लहान आळ्यांना ७ दिवसांत दोन कात अवस्था पूर्ण हाईपर्यंत कोवळी तुती पाने खाद्यात द्यावीत. नंतर फांद्या खाद्य तिस­ऱ्या, चौथ्या कात अवस्थेत आणि ५ व्या वाढीच्या अवस्थेत द्यावे.

- कोष काढणीनंतर ८० व्या दिवशी छाटणी करावी. अशा क्रमाने वर्षातून ४ वेळा छाटणी व खाद्य देण्याची साखळी पूर्ण करावी. आठ कोषाचे पिके घ्यावेत.

- तुती बाग ५ बाय ३ बाय २ फूट किंवा ६ बाय ३ बाय २ फूट अंतरावरील पट्टा पद्धतीच्या लागवडीमध्ये काळे पॉलिथिन आच्छादन कायम ठेवले तरी चालते. दोन पट्ट्यातील अंतर ५ किंवा ४ फुटांपेक्षा कमी म्हणजे ३ फूट असेल तर तुती छाटणी आणि आंतरमशागतीच्या वेळी पॉलिथिन आच्छादन काढून घ्यावे. व पुन्हा आच्छादन पाण्याच्या पाळ्या देण्यापूर्वी पट्ट्यात पसरून द्यावे.

- काळे पॉलिथिन आच्छादन व ठिबक सिंचन दोन्ही पद्धती एक वेळा ३ फूट पट्ट्यात वापरता येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते आणि तुतीची वाढ झपाट्याने होते.

- बागायती /कोरडवाहू भागात तुती लागवडीमध्ये उन्हाळ्यात काळ्या पॉलिथिन आच्छादनाचा वापर केल्यास तुती पानांची उत्पादकता वाढते.

तुती बागेसाठी पाणी नियोजन :

- रेशीम कोषाचे एक पीक निघण्यासाठी २५ ते २८ दिवसांचा कालावधी लागतो.

- तुती बागेस द्यावयाचे पाणी खूप खोल (४०० ते ५०० फूट) आणि क्षाराचे जास्त प्रमाण असलेले नसावे. पाण्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, कार्बोनेट, बाय कार्बोनेट आणि फ्लोराइडचे प्रमाण नसावे. त्यामुळे वेळोवेळी पाणी, मातीचे परीक्षण करून घ्यावे.

- तुती बागेस मोकाट पद्धत किंवा दांडातून पाणी दिले तर भरपूर प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन आणि पाण्याचा अपव्यय होतो. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा.

- पाणी देताना जमीन सपाट असणे आवश्यक आहे. जमीन उंच सखल असेल तर सर्व बागेस सम प्रमाणात पाणी पोहोचत नाही.

- तुती छाटणीनंतर खत मात्रा आणि पाण्याची मात्रा दिल्यामुळे खत झाडाच्या मुळास उपलब्ध होते. वाळू मिश्रीत जमिनीत ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. भारी चिकण मातीच्या काळ्या जमिनीत ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

- दर ६० ते ७० दिवसांच्या कालावधीत पाण्याच्या ६ ते ७ पाळ्या लागतात.

संपर्क : डॉ. सी. बी. लटपटे, ७५८८६१२६२२

(प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com