
डॉ. पराग घोगळे
DDGS in Animal Feed: डीस्टीलर्स ड्राइड ग्रेनस विथ सोल्यूबल्स (डीडीजीएस) हा इथेनॉल उत्पादन प्रक्रियेतील उपपदार्थ आहे. इथेनॉल उत्पादन प्रक्रियेत शिल्लक राहिलेल्या चोथ्याला वाळवून डीडीजीएस तयार करतात. ज्या धान्यांपासून डीडीजीएस बनवतात, त्यावर किण्वन प्रक्रिया अगोदरच झाली असल्याने त्यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन वाढीस मदत मिळते.
सध्या बाजारपेठेत ‘डीडीजीएस’ची किंमत कमी असल्यामुळे पशुपालकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. ‘डीडीजीएस’ हे मका, तांदूळ, गहू, बार्ली व इतर धान्यांपासून तयार होते. धान्यापासून इथेनॉल उत्पादन करणारे कारखाने वाढल्यामुळे बाजारात ‘डीडीजीएस’ जास्त प्रमाणात उपलब्ध होत आहे. गाई, म्हशींच्या आहारात ‘डीडीजीएस’च्या वापराबाबत पशुपालकांच्या मनात अजूनही अस्पष्टता आहे.
धान्यावर प्रक्रिया
इथेनॉल बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये धान्य स्वच्छ केले जाते. त्यातील माती दगड, इतर कचरा बाजूला केला जातो. धान्याला काही तासांसाठी भिजत ठेवल्यामुळे त्यातील आद्रता वाढते आणि हे धान्य किण्वन प्रक्रियेसाठी तयार होते. भिजलेले धान्य नंतर बारीक दळून घेतले जाते. उकळून थंड करून किण्वन प्रक्रियेसाठी असलेल्या टँकमध्ये पाठवले जाते. किण्वन प्रक्रियेदरम्यान यीस्ट आणि एन्झाइम्समुळे धान्यातील साखर विघटित होते. त्यातून इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साइड तयार होतो.
किण्वन प्रक्रिया सुमारे २४ ते ४८ तास सुरू असते. त्यानंतर डिस्टिलेशन प्रक्रियेद्वारे इथेनॉल वेगळे केले जाते. प्रक्रियेत उरलेला चोथ्यामध्ये (स्टीलेज) सुमारे ७५ ते ८० टक्के पाणी असते. त्यामुळे हा चोथा पाच दिवसात खराब होतो, म्हणून हा उरलेला चोथा ड्रायरमध्ये पाठवला जातो. ड्रायरमध्ये चोथ्यातील आर्द्रता काढून टाकली जाते. अशाप्रकारे ‘डीडीजीएस’ तयार केले जाते.
मका ‘डीडीजीएस’मध्ये सुमारे ३० ते ३५ टक्के प्रथिने असतात,जी जनावरांच्या दूध उत्पादनवाढीसाठी उपयुक्त ठरतात. त्यामध्ये फॅट, ऊर्जा तसेच एकूण पचनीय पदार्थ (टीडीएन) यांचेही प्रमाण जास्त असते.
‘डीडीजीएस’ चा योग्य वापर
बाजारातील उपलब्ध इतर पेंडीच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे पशुपालक सध्या ‘डीडीजीएस’ जास्त प्रमाणात पशुखाद्य म्हणून वापरत आहेत. परंतु शिफारशीत प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात ‘डीडीजीएस’ जनावरांना खाऊ घातल्यास तोटा देखील होतो.
काही पशुपालक गाई, म्हशींना दारू बनविणाऱ्या कारखान्यातील डिस्टीलरी वेस्ट खाऊ घालतात. त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. डिस्टिलरी वेस्ट खाऊ घातल्याने गाई, म्हशी गाभण न राहणे, पुढील
वेतात उत्पादनात घट आढळणे, तीव्र आम्लतेमुळे जनावरांची खुरे खराब होणे, कासेचा दाह होणे इत्यादी दुष्परिणाम होतात. सुरुवातीला दूध जास्त मिळूनही नंतर येणाऱ्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे जनावरे विकावी लागली आहेत. अशाच प्रकारचे अनुभव ‘डीडीजीएस’ जास्त प्रमाणात वापरल्यास दिसून येतात, असे पशुपालकांना दिसून आले आहे.
‘डीडीजीएस’ मधील गंधक
‘डीडीजीएस’मधील गंधकाचे प्रमाण ०.७ ते १ टक्के इतके असते. त्यामुळे याच्या पशुआहारातील वापरावर मर्यादा येतात. धान्य स्वच्छता आणि किण्वन प्रक्रियेमध्ये योग्य सामू मिळविण्यासाठी धान्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल वापरले जाते. यामुळे गंधकाचे प्रमाण वाढते. निसर्गतःच धान्यामध्ये काही प्रमाणात गंधक असते. किण्वन प्रक्रिमध्ये त्यातून सल्फाईटस तयार होतात. जेव्हा जास्त गंधक असलेला आहार गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांना दिला जातो. त्याचा विपरीत परिणाम मेंदूवर दिसून येतो. त्यांना पोलिओएनसेफॅलोमलेसिया हा आजार होण्याची शक्यता बळावते. गोठ्यात उदास मनःस्थितीमधील जनावरे हे या आजाराचे एक लक्षण आहे.
‘डीडीजीएस’ मधील गंधकाचे गाई, म्हशींच्या किण्वन पोटात (रुमेन) जिवाणूद्वारे ‘हायड्रोजन सल्फाइड’मध्ये रूपांतर होते, हा विषारी पदार्थ आहे. याचे जास्त प्रमाण झाल्यास त्याचे विपरीत परिणाम जनावरांच्या शरीरावर होतात. शरीरात थायमिन या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. तांबे या खनिजाची चयापचय क्रिया बिघडते.
पिण्याच्या पाण्यातही गंधकाचे प्रमाण असते. त्यामुळे जनावरांना ‘डीडीजीएस’ देताना पिण्याच्या पाण्यातील गंधक तपासून घ्यावे. मक्यापासून बनविलेल्या मूरघासामध्ये गंधकाचे प्रमाण तपासावे, जेणेकरून जनावरांना गंधकाची विषबाधा होणार नाही.
‘डीडीजीएस’मधील बुरशीजन्य अफलाटॉक्झिन्स
‘डीडीजीएस’बनविताना तसेच प्रक्रियेमध्ये आद्रता जास्त प्रमाणात असल्याने त्यामध्ये बुरशीजन्य अफलाटॉक्झिन्सचे प्रमाण वाढून त्याचा जनावरांच्या यकृतावर दुष्परिणाम होऊ शकतो.
इथेनॉल बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्यामध्ये अगोदरच बुरशी लागली असल्यास ‘डीडीजीएस’मध्ये अफलाटॉक्झिन्सचे प्रमाण वाढते. कुठलाही खाद्यपदार्थांमध्ये आद्रता जास्त असल्यास त्यावर बुरशी वाढते हे आपल्याला माहितीच आहे. ही बुरशी विविध प्रकारची असते. मुख्यत्वे अॅस्परजीलस बुरशी वाढताना या खाद्य पदार्थांवर काही रसायने सोडते, यालाच अफलाटॉक्झिन्स असे म्हणतात. हे अफलाटॉक्झिन्स काही केल्या विघटित होत नाही. गाई, म्हशींच्या शरीरात गेल्यावर रक्तातून यकृताकडे नेले जाते. यामुळे यकृतावर वाईट परिणाम होतो. रक्तामधून अफलाटॉक्झिन्स दुधामध्ये उत्सर्जित होते. अफलाटॉक्झिन्स दुधामध्ये आढळल्याने असे दूध घेण्यास डेअरी किंवा दूध संस्थांना नुकसानकारक ठरते. अफलाटॉक्झिन्सयुक्त दूध पिल्यामुळे मानवी शरीरावर देखील वाईट परिणाम दिसून येतो.
गाई, म्हशींना आहार देताना ‘डीडीजीएस’ किंवा इतरही आहार घटक, जसे की मुरघास, पशुखाद्य, कोरडा किंवा हिरवा चारा यातही अफलाटॉक्झिन्सचे प्रमाण नियंत्रणात असावे लागते. अशावेळी २० पीपीबी पेक्षाही कमी प्रमाणात अफलाटॉक्झिन्स बी १ आहारात असावे. ५ पीपीबीपेक्षा कमी अफलाटॉक्झिन्स एम १ दुधात असावे असे भारतीय मानक ब्यूरोचे मानक आहेत. म्हणूनच ‘डीडीजीएस’ वापरताना त्यातील अफलाटॉक्झिन्सचे प्रमाण तपासून घ्यावे. जरी सुरुवातीला प्रमाण कमी असले तरी बुरशी ही दर दिवशी वाढते. त्यामुळे अफलाटॉक्झिन्सचे प्रमाणही वाढते म्हणून आठवडा किंवा १० दिवस पुरेल इतकाच ‘डीडीजीएस’ चा साठा पशुपालकांनी करावा. कारण ‘डीडीजीएस’ जास्त काळ पडून राहिल्यास अफलाटॉक्झिन्सचे प्रमाण वाढून जनावरांचे अधिक नुकसान होऊ शकते.
‘डीडीजीएस’ किती प्रमाणात वापरावे ?
अमेरिकन डीडीजीएस मंडळाच्या संशोधनानुसार गाई, म्हशींच्या आहारात २० टक्क्यांपेक्षा जास्त ‘डीडीजीएस’ आहारात वापरणे त्यांच्या तब्येतीला हानिकारक आहे. गाई, म्हशींना देण्यात येणारा पशुआहार समतोल असणे आवश्यक आहे. केवळ दूध वाढते म्हणून ‘डीडीजीएस’ वापरणे चुकीचे असून, तात्पुरता फायदा न बघता जनावरांची तब्येत सांभाळणे जास्त आवश्यक आहे.
जनावर वेळेत गाभण राहून वर्षाला एक वासरू मिळाले तरच दूध व्यवसाय फायद्यात राहतो. त्यामुळे जास्त नुकसान होऊन दूधधंदा तोट्यात जाऊ नये यासाठी पशुपालकांनी जागरूक राहावे. पशुआहारात इतरही घटक, जसे की संतुलित पशुखाद्य, पेंडी, धान्य, यांचाही वापर करावा.
सोयाबीन, शेंगदाणा, सरकी, मोहरी, मका, गहू इत्यादी पूर्वापार वापरण्यात येणाऱ्या आहारघटकांचा वापर करून संतुलित पशुखाद्य बनवावे. कुठला आहारघटक किती प्रमाणात वापरावा याचे काही प्रमाण ठरवून दिलेले असते, त्याबाबत आपल्या पशुवैद्यकांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा.
- डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९ , (लेखक पशुआहारतज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.