Pune News: झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी सोमवारी (ता. ४) दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही काळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि महिनाभर व्हेंटिलेटरवर होते. त्यांना ‘दिशोम गुरु’ म्हणून ओळखले जात असे आणि त्यांनी झारखंड राज्याच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली. झारखंड सरकारने ३ दिवसांच्या दुखवट्याची घोषणा केली आहे.
सर गंगा राम रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, शिबू सोरेन यांचे सोमवारी सकाळी ०८ वाजून ५६ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्यावर डॉ. ए.के. भल्ला, नेफ्रोलॉजी विभागाचे अध्यक्ष, तसेच न्यूरोलॉजी आणि आयसीयूच्या डॉक्टरांच्या चमूने उपचार केले. १९ जून रोजी त्यांना रांची येथून दिल्लीतील या रुग्णालयात हलवण्यात आले होते. गेल्या एका महिन्यापासून ते व्हेंटीलेटरवर होते.
सामाजिक आणि राजकीय योगदान
११ जानेवारी १९४४ रोजी तत्कालीन अविभाजित बिहारमधील रामगड जिल्ह्यातील नेमरा गावात शिबू सोरेन यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत सावकारीच्या अन्यायी प्रथेविरुद्ध जोरदार आवाज उठवला. त्या काळात सावकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा दोन तृतीअंश हिस्सा हिसकावून घ्यायचे, आणि शेतकऱ्यांना केवळ एक-तृतीयांश हिस्सा मिळायचा. शिबू सोरेन यांनी या जाचक व्यवस्थेविरुद्ध लढा देत सामाजिक बदल घडवून आणला. त्यांचा प्रभाव फक्त झारखंडपुरता मर्यादित नसून, शेजारील ओडिशा आणि पश्चिम बंगालपर्यंत पसरला होता.
शिबू सोरेन यांनी स्वतंत्र झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे झारखंडच्या मागणीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. १९७२ मध्ये त्यांनी ए.के. रॉय आणि बिनोद बिहारी महतो यांच्यासोबत मिळून झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली. सुरुवातीला बिनोद बिहारी महतो हे पक्षाचे अध्यक्ष होते, तर शिबू सोरेन यांनी सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली. १९८० च्या दशकात पक्षाचे नेतृत्व पूर्णपणे त्यांच्या हाती आले. एप्रिल २०२५ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी पक्षाध्यक्षपद सोडले, आणि त्यांचे पुत्र हेमंत सोरेन यांची JMM चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली.
राजकीय कारकीर्द
शिबू सोरेन यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांना यश मिळाले नाही. मात्र, १९८० मध्ये त्यांनी दुमका मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर १९८९ १९९१, १९९६, २००२, २००४, २००९ आणि २०१४ मध्येही ते दुमकामधून खासदार म्हणून निवडून आले. याशिवाय, २००२ मध्ये त्यांनी काही काळ राज्यसभेचे सदस्यत्व भूषवले आणि २००४ मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कोळसा खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.
शिबू सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा जबाबदारी सांभाळली. पहिल्यांदा २००५ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, परंतु त्यांचा हा कार्यकाळ केवळ १० दिवसांचा होता. दुसऱ्यांदा २००८ मध्ये त्यांनी ४ महिने २२ दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केले. तिसऱ्यांदा डिसेंबर २००९ ते मे २०१० या कालावधीत ते मुख्यमंत्री होते. १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड स्वतंत्र राज्य बनल्यानंतर JMM ने पाच वेळा सत्ता मिळवली, आणि प्रत्येक वेळी मुख्यमंत्रीपद सोरेन कुटुंबाकडेच राहिले.
विवाद आणि कायदेशीर लढाई
शिबू सोरेन यांचे नाव १९९४ मध्ये त्यांचे खासगी सचिव शशी नाथ झा यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात अडकले. दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांना आणि अन्य चार जणांना या प्रकरणात दोषी ठरवले. डिसेंबर २००६ रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. मात्र पुढे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत शिबू सोरेन यांना या खटल्यातून निर्दोष मुक्त केले.
शिबू सोरेन यांच्या पश्चात त्यांची पत्नी रूपी सोरेन, दोन पुत्र हेमंत सोरेन आणि बसंत सोरेन, तसेच कन्या अंजली सोरेन आहेत. त्यांचा मोठा मुलगा दुर्गा सोरेन यांचे २००९ मध्ये निधन झाले होते.
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा
शिबू सोरेन यांच्या निधनानंतर झारखंड सरकारने ४ ते ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीसाठी तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे. या कालावधीत राज्यात सर्वत्र राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरलेला असेल आणि कोणतेही सरकारी समारंभ आयोजित केले जाणार नाहीत. तसेच, या तीन दिवसांत सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.