Indian Agriculture: जपर्यंत शेतकरी मुख्यतः बियाणे, खते, कीडनाशके, पाणीपुरवठा, मजुरी आणि वाहतूक या बाबींवर खर्च करीत आले आहेत. याशिवाय, वीजबिल, कर्जाचे व्याज, पशुपालन किंवा यंत्रसामग्री देखभाल यावरही खर्च होतो. अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धती वापरत असल्यामुळे उत्पादकता कमी असूनही, उत्पन्नाच्या तुलनेत खर्च खूप जास्त असतो. सध्या भारतात सरासरी शेतकऱ्याचा वार्षिक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कारण रासायनिक खतांचे दर, मजुरीचे दर, डिझेल किंवा वीज दर सतत वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात शाश्वत शेतीकडे कल वाढेल अशी चिन्हे आहेत.
भविष्यातील भारतीय शेतकरी अधिकाधिक प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागतील. यामध्ये ड्रोनद्वारे पिकांची देखरेख, स्मार्ट सेन्सर्सद्वारे जमिनीतील ओलावा आणि पोषणमूल्ये मोजणे, जीपीएस आधारित ट्रॅक्टर, अचूक पेरणी यंत्रणा, तसेच मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून बाजारभाव आणि हवामानाचा अंदाज घेणे या गोष्टी येतील. यामुळे शेतकऱ्यांचा तंत्रज्ञानावर खर्च वाढेल.
जसजसे रासायनिक खते व कीडनाशके आरोग्यावर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम करत आहेत, तसे शेतकरी जैविक, नैसर्गिक आणि शाश्वत शेतीकडे वळत आहेत. यासाठी विविध प्रकारच्या गांडूळ खतांची निर्मिती, देशी बियाण्यांची निर्मिती, गोमूत्र व शेणावर आधारित उत्पादनांचा वापर करावा लागतो. या बदलामुळे सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना प्रशिक्षण, साधनसामग्री आणि प्रमाणित प्रक्रियेवर खर्च करावा लागेल. पाणी हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
हवामान बदलामुळे पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन, जलसंधारण, शेततळ्यांची निर्मिती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या तंत्रज्ञानावर खर्च करावा लागेल. या उपायांनी एकीकडे खर्च वाढेल, पण त्याच वेळी उत्पादनक्षमतेत मोठी वाढ होईल, आणि दुष्काळजन्य परिस्थितीतही शेती टिकून राहील.
केवळ शेती उत्पादन करून विकणे यावरून शेतकरी आता प्रक्रिया उद्योगाकडे वळत आहेत. म्हणजेच टोमॅटो सॉस, मिरची पावडर, सेंद्रिय तांदूळ, पॅकेजिंग केलेली भाजीपाला विक्री यांसारख्या प्रक्रिया केंद्रे वाढतील. यासाठी यंत्रसामग्री, पॅकेजिंग, कच्चा माल साठवणूक, ब्रँडिंग आणि विपणन या गोष्टींसाठी शेतकऱ्यांना भांडवली खर्च करावा लागेल. म्हणून भविष्यातील खर्च हा केवळ उत्पादनापुरता मर्यादित न राहता मूल्यवर्धन आणि विपणनावरही केंद्रित होईल. आधुनिक शेतीची खर्चाची पूर्तता करण्यासाठी भांडवलाची गरज भासेल.
त्यामुळे भविष्यातील शेतकऱ्यांचा खर्च हा बँक कर्ज, खासगी गुंतवणूकदार, क्रेडिट साखळी यावर अधिक आधारित असेल. याबरोबरच, नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षणासाठी पीक विमा घेण्याकडे कल वाढेल. यामुळे विमा हप्त्यावर होणारा खर्च ही एक महत्त्वाची बाब ठरेल. युवकांचा शेतीकडे कल वाढविण्यासाठी त्यांना आधुनिक शेतीचे शिक्षण देणे गरजेचे आहे. भविष्यात शेतकऱ्यांचा खर्च विविध कृषी प्रशिक्षण कार्यक्रम, ऑनलाइन अभ्यासक्रम, कृषी प्रदर्शन, डिजिटल साधनांच्या वापरावर आधारित असेल.
भविष्यातील खर्चाच्या बदलामुळे शेतकऱ्यांची आर्थिक शिस्त, योजना आखण्याची सवय, आर्थिक साक्षरता वाढेल. मात्र काही अल्पभूधारक शेतकऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाचा खर्च परवडणार नाही, म्हणून सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघ, डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे सामूहिक गुंतवणूक, भांडवली मदतीचा पर्याय आवश्यक ठरेल. सरकारने ‘डिजिटल इंडिया’, ‘डबल फार्मर्स इनकम’, ‘पीएम-किसान’, ‘ई-नाम’, ‘किसान रेल’ यांसारख्या अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांचा कल नव्या गुंतवणुकीकडे वळतो आहे. भविष्यात सरकार अधिकाधिक तंत्रज्ञान-आधारित अनुदान, डिजिटायझेशन, ऑनलाइन कर्ज सुविधा यावर भर देईल. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या खर्चाच्या पद्धतीवर होईल.
नवीन युगात अनेक कृषी स्टार्टअप्स शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्ता, माहिती, बाजारपेठ पोहोचवतात. भविष्यात शेतकरी यासारख्या सेवा खरेदी करण्यावर खर्च करतील. ही ‘सेवा आधारित खर्चाची नवी पद्धत’ असेल. त्यामुळे शेती क्षेत्रात सेवा क्षेत्र फार वेगाने वाढेल. जमीन धारणा क्षेत्र कमी झाल्यामुळे, या प्रक्रियेमध्ये एकाच पिकावर लक्ष्य केंद्रित होईल. आज अमेरिकेत सलग ५००० एकर मक्याचे पीक दिसते.
तसेच जमीन मालक वेगळे पण टोमॅटो चे गाव, सोयाबीनचे गाव, कांद्याचे गाव अशी गावे ओळखली जातील आणि त्यांचे सर्वांचे शेती सेवाक्षेत्र समान असू शकेल. भारतीय शेतकऱ्यांचा खर्च पारंपरिक स्वरूपात राहणार नाही. तो तंत्रज्ञान, साक्षरता, पर्यावरणस्नेही उपाय, प्रक्रिया उद्योग, पाणीसंवर्धन, विमा आणि आधुनिक व्यवस्थापनावर केंद्रित होईल. शेतीचा भविष्यकाळ ‘उत्पादन + प्रक्रिया + तंत्रज्ञान’ या त्रिसूत्रीवर आधारित असेल आणि त्यामुळे खर्चही या तीन क्षेत्रांमध्ये विभागलेला असेल. परंतु या बदलत्या प्रवृत्तीमुळे शेती अधिक शाश्वत, फायदेशीर आणि मानाच्या व्यवसायात रूपांतरित होईल, असा विश्वास ठेवायला हरकत नाही.
shekharsatbara@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.