Indian Agriculture: ग्राहकांच्या आवडीनुसार ठरवा पीकपद्धती

Changes in Cropping Method: ‘ग्राहकराजा’ची आवड निवड, अभिरुची आता जशी बदलते आहे, त्यानुसार ‘शेतकरीराजा’ने आपल्या पीक पद्धतीत बदल केला, त्यानुसार पिकांचे उत्पादन घेतले तरच दोघांचेही जीवन आनंददायी होईल.
Smart Agriculture
Smart AgricultureAgrowon
Published on
Updated on

डॉ. भास्कर गायकवाड

Market-based Cropping System: हरितक्रांतीपूर्वी दोन वेळच्या जेवणाची पंचाईत होती. आज शेती उत्पादन वाढले, अन्नधान्य स्वावलंबन झाले. परंतु यासाठी अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या. जमीन, पाणी, पर्यावरण, मानवी आरोग्य या सर्वांना यामुळे हानी पोहोचली आहे. यापुढील काळात यावर योग्य तो विचार करूनच पुढे जावे लागेल. अन्न सुरक्षेपेक्षा अन्नद्रव्य सुरक्षा महत्त्वाची आहे. कार्बोहायड्रेटचा आहारात वापर वाढला आहे, पण प्रथिनांचा वापर कमी झाला तर पुढच्या पिढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होईल. अर्थात प्रथिनांचा वापर वाढविण्यासाठी प्राणिजन्य की वनस्पतिजन्य प्रथिने याचाही गांभीर्याने विचार करावा लागेल.

२०५० मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या १६५ कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. यांपैकी ८७ कोटी समाज हा शहरात. तर ७६ कोटी समाज हा ग्रामीण भागात असेल. शहरी लोकसंख्या वाढत असताना ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण अभिरुचीमुळे आहारविषयक गरजा वाढणार आहेत. ग्राहकांच्या मागणीचा विचार करून शेती पद्धतीमध्ये योग्य ते बदल करण्याची जबाबदारी ग्रामीण समाजावर असणार आहे. वातावरणामध्ये होणारे बदल, शेतीसाठी कमी होत असलेली जमीन आणि पाणी, मजुरांची टंचाई आणि शेतीमालाचे बाजारभाव या सर्व प्रश्‍नांचा विचार करून जे विकले जाईल, तेच पिकवेल त्याचीच भविष्यात चांगली प्रगती होईल.

Smart Agriculture
Sustainable Farming Method: शाश्‍वत शेतीपद्धतींचा अंगीकार

नैसर्गिक पद्धतीने - जसे की वनस्पतीपासून बनविलेली प्रथिने, वनस्पतीच्या पेशींपासून तयार होणारे मांस (मॉकमीट) ज्याला व्हेगन/ व्हेगीज म्हणतात - त्याची मागणी वाढत आहे. आजची तरुण पिढी जी आरोग्याचा जास्त विचार करते, तिच्याकडून या घटकांचा वापर वाढला आहे. फळे तसेच भाजीपाला ज्यांमधून मोठ्या प्रमाणात पचनीय तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे, जैविक- प्रतिजैविके आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट्स मिळतात त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वर्षभर फळे व भाजीपाला यांचा योग्य पद्धतीने पुरवठा करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे.

भरडधान्यांवर भर द्या

आजही मोठ्या प्रमाणावर गहू- तांदूळ यांच्या उत्पादनावर भर दिला जातो. परंतु यांची मागणी भविष्यात कमी होऊन भरडधान्ये - जसे की ज्वारी, बाजरी, नागली, राळा, भगर या पौष्टिक धान्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे या पिकांच्या लागवडीवर भर द्यावा लागेल. ही पिके पर्यावरणातील बदलाला सक्षमपणे सामोरी जाऊन शाश्‍वत उत्पादन देऊ शकतात. प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी पारंपरिक कडधान्यांचा वापर वाढविता येईल. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाचा विचार केल्यास, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी देशी गाय, शेळ्या यांच्या उत्पादनाला जास्त मागणी आहे.

Smart Agriculture
Intercropping Method : कपाशी -सोयाबीन आधारित आंतरपीक पद्धती

स्थानिक कोंबड्यांचे मांस तसेच अंडी यालाही मोठी मागणी आहे. यासाठी ग्राहक जास्तीचे पैसे देत आहेत आणि भविष्यात त्याची क्रयशक्ती वाढणार आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेती उत्पादनाला फार मोठी मागणी आहे. विशिष्ट भागांमध्ये पिकविलेल्या शेती उत्पादनांमध्ये त्या त्या भागातील विशिष्ट चव आणि गुणधर्म असतात. त्यानुसार ग्राहकांची मागणी असते. त्यासाठी जास्त पैसे मोजण्याचीही त्यांची तयारी असते. या सर्व बाबींचा विचार केला तर शेती क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होणे अपेक्षित आहे. कमीत कमी प्रक्रिया, शेतीमालातील नैसर्गिक गुणधर्मांचा आरोग्यासाठी फायदा, मिळालेले उत्पादन आहे त्याच स्वरूपात आहारामध्ये घेण्याची गरज या बाबींचाही विचार भविष्यात करावा लागणार आहे. या सर्व बाबींसाठी खरं तर ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात काम होऊ शकते.

पायाभूत सुविधांत हवी मोठी गुंतवणूक

आज देशामध्ये हजारो शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झालेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून ग्राहकांची मागणी आणि कंपन्यांच्या परिसरामध्ये असलेली संधी यांचा योग्य मेळ घालून एक-दोन संकल्पनांवर काम केले तर ग्राहक- उत्पादकांचा योग्य मेळ बसेल. ग्राहक व उत्पादकांमधील संवाद हा सुद्धा फार महत्त्वाचा विषय आहे. जो आजच्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेमध्ये होत नाही. शेती उत्पादन घेत असताना पारंपरिक रासायनिक खतांऐवजी विद्राव्य खते, जिवाणू खते यावर भर दिला तर उत्पादनाची गुणवत्ता वाढविता येईल.

कृषी संशोधन संस्थांमध्येही ग्राहकांच्या मागणीनुसार शेती उत्पादन काढण्यासाठी योग्य ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच भविष्यातील ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य प्रकारे शेतीमाल उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सेवासुविधा निर्माण करण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. शेतकऱ्‍यांना ग्राहकांच्या मागणीनुसार शेती उत्पादन काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर व नवीन सेवासुविधा तयार कराव्या लागतात. ज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यम तसेच दीर्घ मुदतीची गुंतवणूक करावी लागते. यासाठी शेतकऱ्‍यांना मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज अल्पदरात उपलब्ध करून देणे हेही तेवढेच गरजेचे आहे.

आजचा ग्राहक हा केवळ पोट भरण्यासाठी अन्न खात नसून, तो आरोग्यदायी व आनंदी जीवनशैलीच्या दृष्टिकोनातून आहार निवडत आहे, त्यामध्ये आपल्या रुचीनुसार बदल करत आहे. ज्या वेगाने तो खाद्य पद्धतीमध्ये बदल करत आहे त्याच वेगाने शेतकऱ्‍यांनी शेती उत्पादनामध्ये बदल केला तरच भविष्यातील शेती जास्त किफायतशीर आणि शाश्‍वत राहणार आहे.

९८२२५१९२६०

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com