Forest Fruits Agrowon
ॲग्रो विशेष

Healthy Diet : समृद्ध अन्नटोपली

Team Agrowon

नीलिमा जोरवर

Forest Fruits and Vegetables : रानभाज्यांमध्ये असलेली विविधता परिसरानुसार बदलत जाते व त्यांची संख्याही वाढत जाते. सह्याद्रीच्या डोंगरी भागात आढळणारी आणि समुद्राकाठच्या गावांत आढळणारी मासे-भाज्यांची विविधता भिन्न आहे. हिमालयासारख्या भागात गेलो तर इथे आढळणाऱ्या लींगडी, बुरांश सारख्या भाज्या आणि सह्याद्रीत आढळणाऱ्या लोती, बडदा, रानसुरणाच्या विविध जाती यांची विविधता बदलत जाते. भंडारदऱ्याच्या परिसरातील गावांत आढळणारे कात्रुड, सत्तर सारख्या अळिंबी तर छत्तीसगडच्या दंतेवाड्यात आढळणारे अतिशय चविष्ट जात बोडा आणि साल बोडा हे साल वृक्षाच्या आजूबाजूच्या मातीत येणाऱ्या अळिंबी, हे सर्व आपली ‘अन्नटोपली’ समृद्धतेने भरून टाकते. आपल्या पूर्वजांनी ती आपल्याकडे सुपूर्द केली आहे. त्यासाठी अनेक मानवी पिढ्यांनी हजारो वर्षे मेहनत व प्रयत्न केले आहेत.

दिल्लीवरून निघाल्यावर हिमाचल प्रदेशातील मंडी हे पहिले गाववजा शहर येते. गाव डोंगराच्या कुशीतच वसलेले. इथले लोक छान शेती करतात. त्याबरोबरच पहाडातून मिळणाऱ्या भाज्या-फळे-अळिंबी त्यांच्या आहारात नियमित येतात. हिमाचल हा सह्याद्रीपेक्षा खूपच कमी वयाचा व वेगळा पहाड. मातीचे ढिगारे एकावर एक ठेवल्यासारखा दिसतो. इथल्या उन्हाळ्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या, उबदार व सकस वातावरण आणि ठिसूळ मातीचे पहाड त्यामुळे अनेक वनस्पतींची रेलचेल.

फुलांची विविधता

मंडी तशी जास्त उंचावर नसल्यामुळे इथले पहाड वनस्पतींनी आच्छादलेले. मंडीच्या रस्त्यावरून पायी चालताना बाजूच्या पहाडात अखे नावाचे छोटे बेरीसारखे रसरशीत फळे भरपूर लगडलेली, हाताने तोडून खाऊ शकतो असे करवंदासारखे झुडूप लागले. पहाडाच्या कडेला गवतासारख्या वाढलेल्या जंगली स्ट्रॉबेरी. यांचा आकार गुंजाएवढाच. लहान मुलांचे हे आवडते खाणे. मंडीवरून पुढे काजाकडे जाताना रस्त्यात मस्त जंगल येते आणि आपल्याला हिमालयाची भव्यता समजत जाते. जंगली गुलाबांचे ताटवे, सुंदर दिसणारे देवदार आणिक खूप सुंदर फुलांनी बहरलेली झाडे, वेली व झुडपे.

यातच होती बुरांश आणि काफळची मोठी झाडे. मोठ्या आकाराची, लालभडक रंगाची बुरांशची फुले आंबट असतात. ते सुकवून किंवा ताजेही खाता येतात. बुरांशची गूळ घालून बनवलेली चटणी आपल्याकडच्या लाल अंबाडीच्या फुलांच्या चटणीसारखीच वाटते. या रानफुलांचा खाण्यासाठी वापर होतो तसाच आपल्याकडे देखील रानभाज्यांच्या यादीत फुलभाज्या बऱ्याच आहेत. हदगा, शेवगा, चिंच, शिरी, जिवती, लाल अंबाडी, बहावा, महुआ इत्यादींची यादी मोठीच आहे. पण दुर्दैवाने बाजारात आपल्याला फुलभाजीचे कोणतेच पर्याय उपलब्ध नसतात.

पहाडाच्या कुशीतील शेती

अतिशय आकर्षक रंगसंगती असणारे, आंबट-गोड चवीची काफळची छोटी फळे मुबलक मिळतात. हे हिमालयातील लोकांचे खूप आवडते फळ. चवीला देखील खूप मस्त लागतात. याच पहाडांच्या कुशीत शेतकरी शेती करतात. भाजीपाला, गहू, बटाटा, बार्ली याबरोबरच सफरचंद, नासपती, आलूबुखार, आणि अप्रिकॉट. हे सर्व झाडावरून तोडून खातो तेव्हा ताजी फळे कसली चविष्ट लागतात हे जाणवत राहते.

इथे ही फळे मंडीपासून ते कुलूच्या बाजारातदेखील खूपच स्वस्त मिळतात. ५०-८० रुपये किलो. सफरचंद, आलुबुखार सध्या बाजारात आले आहेत. याच पहाडात येणारी नेचेवर्गीय भाजी अशी मस्त फोफावलेली असते. जमिनीत येणारे तिचे जरासे वाकलेले मोठे-कोवळे ठोंब बाजारात विकत मिळतात. या लींगडीची भाजी तर छानच लागते, पण इथे याचे लोणचे फार प्रसिद्ध आहे. याच्या देठांचे लोणचे घातले जाते. कधी या परिसरात गेलात तर लींगडीचे लोणचे अवश्य विकत घ्या.

अक्रोडची शेती

इथे अक्रोडची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषतः तुम्ही मनीकरण, मनालीकडे जाता तसा अक्रोडचा वापर वाढतो. जसे आपल्याकडे नारळ, शेंगदाणे हे मोठ्या प्रमाणात भाज्यांमध्ये वापरले जातात तसा इथे अक्रोडचा वापर होतो. त्याच्या विविध रेसिपी इथे आहेत. त्यातलाच एक इथला प्रसिद्ध, खास अक्रोडचे सारण असलेला सिद्धू हा पदार्थ. आपल्याकडे जसा वडापाव असतो तसा हा इथला सिद्धू. सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स इथे असतातच पण त्याबरोबर आपल्याकडच्या गोडंबी सारख्या असणाऱ्या एका जंगली वृक्षाच्या बिया देखील विकत मिळतात. याला आपण सोलून आतला दाणा खाऊ शकतो. हिमाचलची अन्नटोपली पौष्टिक व विविधतेने भरलेली आहे.

शेतामध्ये बटाटा, राजमा, कडधान्यांच्या विविध जाती, फळांचे विविध जंगली व लागवड केलेले प्रकार असे हे समृध्द अन्न. परंतु इथे वाढलेल्या देश-विदेशी पर्यटनामुळे इथले मूळ खाणे सोडून लोकांनी चायनीज, पंजाबी खाण्याच्या पद्धती जास्त स्वीकारल्या आहेत. तुम्ही इथले जेवण शोधत असाल तर मिळण्याची शक्यता खूप कमी असते. त्यातल्या त्यात पौष्टिक म्हणजे राजमा-चावल किंवा आलू-मुळी पराठा असे मर्यादित पदार्थ मिळतील. सिद्धूच्या आतले अक्रोडचे सारण कमी तर बाहेरचे कव्हरिंग गहुऐवजी मैद्याने बनवले जाऊ लागले आहे. हीच परिस्थिती आपल्याकडे देखील आहे. भाजी-भाकरी हे आपल्या शहरात देखील लवकर मिळत नाही.

सिंगभूम हा झारखंड मधला आद्यदेव मानला जातो. सिंगभूमने एक लोखंडी पात्याचा बाण इथल्या डोंगरांत मारला आणि त्या बाणाचे लोखंड इथल्या मातीत सगळीकडे पसरले, अशी आख्यायिका आहे. इथे लोहाच्या मोठ्या खाणी आहेत. या मध्य भारतातील जंगल भागात साल, सराई, महुआ अशा झाडांची संख्या मोठी आहे. महुआच्या झाडांचा वापर खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. फुले, फळे, बिया यांचा वापर इथल्या संस्कृतीचाच भाग आहे. त्याबरोबरच कोसरा, मडवा मिलेट्स हे इथले मुळ खाणे. बाजारात मिळणारे जात बोडा म्हणजे जमिनीत येणारे मश्रूम आणि साल बोडा म्हणजे सालच्या झाडाजवळ असणारे मश्रूम, लाल मुंग्यांची चटणी, पळसाच्या पानावर बनवलेली तांदळाची पानोरी आणि सोबत घरीच बनवलेली राइस बिअर हे इथल्या बाजारात मिळणारे खास पदार्थ.

त्याशिवाय कोचाई आणि इतर कंदांचे विविध प्रकार, मोठे करटोली आणि काकडीचे प्रकार. अनेक वर्षांपूर्वी लोक पोटासाठी इथून इतर राज्यांत गेलेले असल्यामुळे शेतीतील ही विविधता जाऊन त्याची जागा संकरित भाज्यांनी घेतली आहे. कोबी, सिमला, टोमॅटो अशा तरकारी भाज्या उगवण्याचे आणि खाण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे पण तरीही गावांतील लोकांनी ही विविधता जपलेली आहे. त्यामुळे मोह, मडवाच्या विविध पाककृती आणि जंगली मश्रुम, कंद आणि भाज्या आपल्याला इथे मिळत राहतात.

छत्तीसगड, ओडीशातील विविधता

छत्तीसगडला भारताचे भाताचे कोठार असे संबोधले जाते. भाताच्या अनेक दुर्मिळ जाती इथे होत्या. बारीक आकाराचा, सुगंधित, लाल रंगाचा असा विविध प्रकारचा भात येथे आढळतो. भाताच्या विविध वाणांची जोपासना केली गेली आहे. भाताशिवाय भरडधान्य, काळा कुलीद, लाल, काळी चवळी, वालाचे प्रकार आणि काळा हरभरा, पिवळा मुग याने इथली भूमी समृद्ध आहे.

ओडीशाच्या विविध भागांत देखील भात, कडधान्यांची विविधता आहे. मंड्या (नाचणी), वरी, राळा, कोदो, जोधरा (ज्वारी) सोबतच येथे लाल झुनगा, मेथी मूग, पिवळा मूग असे प्रकार आजही केले जातात. आजही येथे झाडाच्या पानांवर जेवण वाढले जाते. भात आणि भरडधान्यांची पेज रोजच्या आहाराचा भाग आहे. सोबतीला चव वाढवण्यासाठी विविध चटण्या, चवदार आंब्याच्या रसापासून बनवलेला आमहडा आणि मिठाईचे विविध प्रकार इथे आहेत. ओडीशा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात जसा ५६ भोगांचा नैवेद्य दिला जातो तसा इथे गेलेल्या माणसांना देखील असे मिष्टान्न खाण्यास मिळते. मग रस्त्यावर २० रुपयांत रबडी, बासुंदी किंवा रसमलाई मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. इथे मिळणारा गरम गरम चुलीवरचा रसगुल्ला भारी प्रसिद्ध आहे.

आपल्या भारत देशामध्ये विविध घटक राज्ये आहेत. तिथले हवामान, माती, भूगोल भिन्न आहेत आणि त्यानुसारच इथले विविध भाषा बोलणारे, वेगळे पदार्थ खाणारे लोक यामुळेच आपली भारताची अन्नटोपली खूप मोठी बनली आहे. यामध्ये जंगलातल्या रानभाज्या, कंद, फळे आहेत तसेच भात, भरडधान्ये, कडधान्ये आणि मासे, खेकडे व इतरही जीव अशी समृध्द विविधता आहे. हे सर्व आपण सांभाळतोय ना?

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT