Forest Vegetable : बखर रानभाज्यांची : समृद्ध करणारा प्रवास

Bakhar Ran Bhajyanchi : रानात मिळणाऱ्या, आपोआप उगवणाऱ्या खाद्य वनस्पतींची संख्या मोठी असली, तरी ज्यांचा वापर खास भाजीसाठी होतो अशा अनेक वनस्पती इथे आढळल्या. विशेष म्हणजे यातील विविधता पाहून आपण नेहमी खात असलेल्या १०-१५ भाज्यांची गरिबी जाणवली. इथले आदिवासी निसर्गसंपन्न व समृद्ध आहेत याची खात्री पटली.
Bakhar Ran Bhajyanchi
Bakhar Ran BhajyanchiAgrowon

Vegetable Information in Forest : “ही अखऱ्याची भाजी, ही बाफळी, ही कोळू, ही राजगिरा, ही खुरासणी, हा चवळवेल, हे चाईचे डेंग आणि ही पाथरी आणि माठ पण आहे; कोणते देऊ ताई?” वाघेरे घाटातून नाशिककडे जातानाच्या एका वळणावर आंब्याच्या झाडाखाली बसलेला महिलांचा गट माहिती देत होता. त्या नुकत्याच संगतीने समोरच्या डोंगरावरून या रानभाज्या घेऊन आल्या होत्या. त्यामुळे आम्हाला या ताज्या ताज्या भाज्या मिळाल्या. त्याही इतक्या विविध. मनात म्हटले ‘निसर्ग देतो तर छप्पर फाडून देतो या दिवसांत!’ सर्वच भाज्या घेऊन टाकल्या. पावसाळा सुरू झाला की घरात रोज फक्त रानभाजीच बनते. इतर नेहमीच्या बाजारात मिळणाऱ्या भाज्यांना मग सुट्टी असते. आतापर्यंत लोत, शेवळ, कुरडूदेखील खाऊन झालेच आहे.

आज मला या भाज्या खूप चवदार बनवता यायला लागले आहे आणि कोणती भाजी कधी खावी, तिचे औषधी फायदे काय आणि त्या करताना कोणती प्रक्रिया करायची अथवा काय काळजी घ्यायची हे सर्व आता सरावाचे झाले आहे. कारण या रानभाज्यांच्या शोधाचा प्रवास सतत १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून केला आहे. त्यासाठी डोंगर-दऱ्या-ओढे-नाले फिरले आहे आणि त्यातूनच साकारलेले एक पुस्तक, ते म्हणजे बखर रानभाज्यांची. आज अनेकांना या पुस्तकातील दीडशेहून जास्त रानभाज्यांची नावे माहित झाली आहेत. पुस्तकातील छायाचित्रांमुळे आपल्या शेतातील, परिसरातील भाज्या ओळखता येत आहेत. काही ठिकाणी या माहितीच्या आधारे लोकांनी ‘फुड फॉरेस्ट’ बनवले आहे. गावातील लोक आपल्या पारंपारिक अन्नाकडे आत्मीयतेने पाहू लागले आहेत. ‘बखर रानभाज्यांची – प्रवास रानभाज्यांच्या शोधाचा’ हे मराठीतील २२५ पानी कॉफीटेबल पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा आठ वर्षांची अथक मेहनत सार्थकी लागली.

Bakhar Ran Bhajyanchi
Human Health : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली

रानभाज्या हा शब्द २००९ मध्ये एका कार्यशाळेत कानावर पडला आणि मनात घर करून बसला. माझे बालपण गावातच गेलेले असल्यामुळे आई बनवायची ती आवडती तांदूळजा, कोळू, माठ या भाज्या आठवायला लागल्या. आमच्या घराच्या शेजारी असणारे टेलर बाबा परिसरातून वेगवेगळ्या भाज्या शोधून आणायचे आणि त्या बनवल्या की आमच्या घरी हमखास द्यायचे. त्यात टाकळा, शिंदळ माकडे आणि फानभाजीचे मुटके असायचेच. त्यामुळे हा विषय थोडा परिचयाचा असला तरी पुढे अभ्यासातून जो खजिना समोर आला तो अद्‌भुत होता. त्यासाठी मात्र जंगल व जंगलातील आदिवासी गावांमध्ये भटकावे लागले; कधी पायी, तर कधी स्कुटी तर कधी पिकअप. आणि या भटकंतीत जे जे सापडले ते विस्मित करणरे, आनंद देणारे होते.

रानात मिळ्णाऱ्या, आपोआप उगवणाऱ्या खाद्य वनस्पतींची सख्या मोठी असली तरी ज्यांचा वापर खास भाजीसाठी होतो अशा अनेक वनस्पती इथे आढळल्या. विशेष म्हणजे यातील विविधता पाहून आपण नेहमी खात असलेल्या १०-१५ भाज्यांची गरिबी जाणवली. इथले आदिवासी निसर्गसंपन्न व समृद्ध आहेत याची खात्री पटली. काय काय खात होते ते? तर ८० प्रकारच्या झुडूपवर्गीय पालेभाज्या, २७ प्रकारच्या कंदवर्गीय भाज्या, ४० प्रकारच्या वृक्षवर्गीय भाज्या, ४ प्रकारचे निवडुंग, ७ प्रकारच्या जंगली अळंबी, १५-२० प्रकारच्या फुलभाज्या (ज्यामध्ये बाजारात खूप महाग असणारी अमरी (ऑर्किड), एक विशिष्ट प्रकारची बाभळीच्या शेंग यांचा समावेश होता)! बापरे केवढी ही खाण्यातील संपन्नता! ही सर्व माहिती पुस्तकात लिहायच्या आधीच ठरवले होते की प्रत्येक भाजी स्वतः डोळ्याने पाहायची, त्याचे फोटो घ्यायचे आणि स्वतः खाऊन बघायची मगच त्याबद्दल लिहायचे. हा क्रम बव्हंशी पाळता आला.

‘निवडुंगाची भाजी’ कशी बनत असेल, असे आधी वाटायचे. पण जेव्हा फड्या निवडुंगाचे कोवळे पान खाल्ले तेव्हा एकदम हिरव्या चिंचेची चव लागली. मुरमाठी बाभळीच्या शेंगाची भाजी तर कसली अफलातून लागते. पण त्याआधी शेंगा शिजत ठेवतो तेव्हा घरभर बाभळीचा असा वास सुटतो की बस्स! तर चीचुर्डे खाताना कडू चव कधी आवडीची बनले समजलेच नाही. म्हणजे लोकांना ‘आज कुछ मिठा हो जाये असे वाटते’ तर मला ‘आज कुछ कडवा हो जाये’ अशी कडू खाण्याची इच्छा होते. कडू चवीच्या प्रेमात पाडणाऱ्या भाज्या म्हणजे चीचुर्डे, शिंदळ माकडे, शेंदण्या, कुसरीच्या घुगऱ्या आणि डुक्कर कंदाच्या वळ्या.

Bakhar Ran Bhajyanchi
Human Diet Management : आहारात असावेत तंतुमय पदार्थ

आंबट, गोड, कडू, तिखट, तुरट, खारट अशा सहाही चवी ज्यात आहेत अशी अळवाची फळे, तर गोड सोडून इतर सर्व चवी उग्र असणाऱ्या भाज्या, कोशिंबची रसरशीत जेलीसारखी अंजिरी गर असणारी चटकदार फळे खाल्यावर पुढचे दोन-तीन दिवस काहीही खा, मस्त चव तोंडात असणार. काकडीसारखे खाऊ शकणारे मेक, गोमेट्या आणि बारीकशे लांजा फुटाणा. चुलीच्या आहारात भाजून खाता येतात असे सत्तर आणि अनेक झाडांची कोवळी पाने... ही सर्व चवींची लज्जत समजली ती कोणत्या पुस्तकातून किंवा अभ्यासक्रमातून नाही तर निसर्ग व तिथल्या माणसांच्या सहवासातून. खऱ्या जीवनशाळेतून. आज आपण आपले अन्न चविष्ट बनविण्यासाठी भरपूर प्रकारचे मसाले वापरतो, कृत्रिम फ्लेवर वापरतो पण निसर्गातील या चवींना कशाचीच सर येणार नाही.

आमचा अकोले तालुका तसा निसर्ग समृद्ध. सह्याद्रीचा डोंगरभाग आणि इथली वनस्पती व शेतीविविधता भुरळ पाडणारी आहे. परंपरागत शहाणपणातून ही विविधता आजही टिकून आहे. रानातील व शेतीत पिकवले जाणारे गावरान अन्न इथल्या संस्कृतीचाच भाग आहे. अनोळखी गावांत जाऊन लोकांना भेटणे, त्यांना बोलते करणे यात फारच मजा आली. एकदा गांगडवाडीत वस्ती करायचे ठरवले. बाहेर धो-धो पाऊस पडत होता. वीज गेलेली. चुलीवर जेवण रांधायचे काम चालू होते. अशा वातावरणात तिथल्या आज्जी-बाबांच्या सोबत छान गप्पा रंगल्या.

आज्जी-बाबांनी काळाचा पट उलगडून दाखवला. ५० वर्षांपूर्वीचा भंडारदरा परिसर डोळ्यासमोर उभा राहिला. बाबा तमासगीर; कधीतरी घरात त्याचा पाय लागायचा. पोरांना जगवायसाठी आज्जी कळसूबाईच्या डोंगरावरून पंदाचे कंद आणायची, ते शिजवून त्याचे मुटके करायचे, कैलीची भाजी भरपूर आणायची. ही भाजी भंडारदरा धरणाच्या कॉलनीतील साहेब लोकांना विकून मिळालेल्या पैशांतून घरात मीठ-मिरची यायची. या भाज्यांमुळेच तिला त्याकाळी आपल्या पिलांना वाढवता आले.

अशा अनेक माणसांच्या अनेक आठवणी भाज्यांमुळे ताज्या झालेल्या. हे सर्व ‘बखर रानभाज्यांची’ पुस्तकात मांडताना ललित शैलीची निवड केली. कारण अन्न हे फक्त पोटभरण नसते, तर तो इतिहास असतो, भूगोल असतो, संस्कृती असते. अति पाऊस, मध्यम पाऊस व कोरडा पर्जन्यछायेचा भूभाग अशी ढोबळ विभागणी अकोल्यातील गावांची करता येऊ शकली. इतके इथले वनस्पती वैविध्य ठळकपणे लक्षात येत होते. वरच्या भागात दिसणारे अळंबी, बडदा, दिवा या भाज्या खालच्या भूभागात नाहीत तर इथे असणारी मुरमाटी, फांजी, शिंदळ माकडे वरच्या भागात नाहीत. मधला पट्टा तर तिवस, कांचन, बहाव्यासारख्या फुलभाज्यांनी व्याप्त. त्यामुळे ही विविधता प्रचंड. तिचा मागोवा घेण्यासाठी करावा लागणारा प्रवास देखील खूप झाला. फोटो घ्यायचे असे ठरलेच होते. एकदा शिरीच्या फुलांचे फोटो घ्यायचे होते. ही भाजी धामणगावच्या अमुक परिसरात आढळते व जूनमध्ये तिला फुले लागतात हेही समजलेले. म्हणून जून महिन्यात शिरीचा शोध घेत एका वस्तीच्या बांधावर पोहोचले. शिरीचे वेल भेटले पण फुले येण्याचा काळ संपून गेला होता. म्हणून फोटोसाठी वर्षभर वाट बघावी लागली.

अळूची पाने आणि सुरण आपण नियमित खातो पण जंगलात सुरणसारखे अजून चार तर अळूचे सात प्रकार या अभ्यासातून समोर आले. अजिबात खाजरी नसणारी व खडकाच्या कापीत उगवणारी तेरा अळू, मोठ्या झाडांच्या बेचक्यात उगवणारी रुखाळू, पंढरी अळू, काळी अळू, ब्रम्हराक्षस असे कितीतरी प्रकार यात आहेत हे समजले. या भाज्या शिजवण्याची पद्धत आपल्याला माहीत असणे आवश्यकच असते. म्हणून उमवणे, ठिकरी देणे, हाटण अशा स्वयंपाक बनवण्याच्या नवीन रिती देखील माहीत झाल्या. हे सर्व पुस्तकात मांडताना खरेच खूप भारी वाटले. एका संपत चाललेल्या ज्ञानाचे दस्तऐवजीकरण झाले, याचा मनस्वी आनंद मिळाला.

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)

: ranvanvala@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com