Kolhapur Ground Water Level : कोल्हापूर जिल्ह्याची पाणीदार जिल्हा म्हणून ओळख आता नष्ट होण्याच्या मार्गाकडे वाटचाल सुरू असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्याची भूजल पातळी तब्बल दोन मीटरने खालावली असल्याची अहवाल समोर आला आहे. यामुळे पाण्याचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. यासाठी कोल्हापूरकरांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता आहे.
केंद्रीय भूजल मंडळाच्या भूजल सर्वेक्षणानुसार, देशाच्या काही भागात भूजल पातळी कमी होत आहे. अलीकडच्या वर्षांत महाराष्ट्रातील अनेक भागांत भूजल पातळीत लक्षणीय घट झाली आहे. गतवर्षी सन २०२३-२४ मध्ये मॉन्सूनपूर्व काळात पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात पाणी पातळी भूगर्भीय क्षेत्रानुसार सरासरी १० ते १६ मीटरपर्यंत होती.
यावर्षी मॉन्सूनपूर्वी काळात ही पाणी पातळी साधारणपणे दोन मीटरने कमी झाली आहे. हे अतिशय चिंताजनक आहे. भूजल सर्वेक्षणानुसार गेल्या २० वर्षांच्या कालावधीत भूजल पातळी चार मीटरपेक्षा जास्त किंवा दहा वर्षांच्या कालावधीत दोन मीटरपेक्षा जास्त घसरली आहे. यामध्ये देशातील जिल्ह्यांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश झाला आहे. भूजल हा कोल्हापुरातील सर्वात महत्त्वाचा जलस्रोत आहे.
वाढती लोकसंख्या, नागरिकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे भूजलाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यामध्ये विविध जल-भूवैज्ञानिक आणि भू-आकृतिशास्त्रीय वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील भूजल क्षमता वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न आहेत.
सध्या जिल्ह्यात भूजलाचा अतिवापर, असमान वितरण यामुळे भूजल पातळी कमी झाली आहे. त्याचबरोबर सांडपाण्यामुळे जलस्त्रोतांमध्ये असणारे पाणीही अस्वच्छत होत असल्याचे चित्र आहे.
याकडे गांभीर्याने न पाहिल्यास भविष्यात मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. भूजलाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकारने सुधारित धोरण करावी, आणि त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे
भूजल व्यवस्थापनाशिवाय पर्यायच नाही
वाढती लोकसंख्या आणि त्यासाठी लागणारे पाणी, जलाशयांमधील अपुरा पाणीसाठा आणि भूजलाच्या वापराबद्दल असंवेदनशीलता या कारणांमुळे भूजल साठ्यांची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे भूजल व्यवस्थापनाशिवाय पर्यायच नाही.
महाराष्ट्र अग्निजन्य खडकांचा प्रदेश आहे. त्यामुळे भूजलाची उपलब्धता ठराविक प्रमाणात आहे. या खडकाची सच्छिद्रता एक ते तीन टक्के आहे. त्यामुळे अशा भूगर्भातील खडकांमधून पाण्याचे वहन हळू व सूक्ष्म पद्धतीने होते.
या खडकांमध्ये असलेल्या चिरा, फटी, भेगा, मधोमध असलेले वाळूचे अथवा मातीचे थर यामधून ते होते. भूपृष्ठावर ज्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे वरून खाली पाणी वाहते तसेच ते भूमिगत वाहत असते आणि शेवटच्या तळावर येऊन थांबते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कूपनलिकांसाठी मोठ्या प्रमाणात खोदाई
जिल्ह्यात सध्या कूपनलिकांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीत खोदकाम सुरू आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नाही. कूपनलिकांसाठी खोदाई करायची असल्यास ती २०० मीटरपर्यंत करण्यास परवानगी आहे. परंतु या नियमाची पायमल्ली करून सर्रास ४०० मीटरपर्यंत खोदाई केली जात आहे.
भूजल पातळी मोजणीची उपकरणे अशी...
भूजल पातळी मोजण्यासाठी ‘इलेक्ट्रिक वॉटर लेव्हल मीटर (साउंडर) चा वापर केला जातो. या उपकरणाला पाण्यामध्ये सोडल्यानंतर त्यातील सेन्सरद्वारे पाण्याशी संपर्क येतो. त्यानंतर इंडिकेटर बीप होऊन भूजल पातळी किती आहे हे समजते. त्याचबरोबर ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) या यंत्राचा उपयोग करूनही भूगर्भाची स्थिती मोजली जाते. यामध्ये भूजल पातळी किती आहे हे समजते.
‘भूगर्भातील पाणी काढण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. ज्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भूजलाची दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत असून त्याच्या संरक्षणाची गरज आहे. पाणी संपल्यावर आपणा सर्वांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. यासाठी योग्य भूजल व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची संवेदनशीलता व सामाजिक सहभाग महत्त्वाचा आहे.
-डॉ. अमोल पां. जरग, भूमाहितीशास्त्र अभ्यासक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.