Agriculture Cultivation : इतके अनर्थ केवळ अतिमशागतीने केले

Over Cultivation of Agriculture : माती वाहून जाणे म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होणे आणि शेवटी पिकांची उत्पादकता आणि दर्जाही घसरणे! इतके अनर्थ केवळ अतिमशागतीने घडत असतील तर खरिपासाठीची पूर्वमशागत म्हणजे काही टन माती वाहून जाण्यास तयार केलेला मार्गच म्हणावा लागेल.
Agriculture Cultivation
Agriculture Cultivationagrowon

Indian Agriculture : भर उन्हात ४० ते ४५ डिग्री तापमानात राज्यातील अन्नदाता आपल्या शेतात खपून खरिपाची तयारी करत आहे. तळपत्या उन्हाचे चटके सहन करत स्वतः शेतकरी, त्याचे कुटुंब, बैल, ट्रॅक्टरचा चालक हा सगळा पसारा शेतामध्ये राबताना दिसत आहे. या सगळ्यांची भिस्त फक्त दोघांवरच आहे, एक वरुण राजा आणि दुसरे म्हणजे काळी आई.

या वर्षी वरुण राजाचे आगमन वेळेवर होऊन पुरेसा पाऊस पडेल, असे भाकीत वर्तवले गेले असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. बहुतांश शेतकरी बांधवांचे कोणते पीक, किती एकर करायचे हे जवळपास ठरले आहे. त्यासाठी लागणारे बियाणे आणि खते खरेदीची लगबग सुरू झाली आहे. जमिनीची भरपूर मशागत केली, चांगले बियाणे आणि खते आणली की खरिपाची तयारी पूर्ण झाली अशी साधार मानसिकता आहे.

पण आता हे एवढे सरळ सोपे राहील नसून शेतीमध्ये अनेक संकटे येत आहेत. यामध्ये सर्वांत मोठे संकट आहे ते म्हणजे बदलत्या हवामानाचे आणि त्यानंतर आहे ते बेभरवशाच्या बाजाराचे! या दोन टोकांमध्ये दोलायमान शेतीचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. या संकटांवर मात करण्यासाठी प्रत्येक शेतकरी, शेतकऱ्यांचे गट-समूह आणि गाव या सर्वांना फार विचार करून पावले टाकण्याची वेळ आली आहे. अर्थात त्यांच्या प्रयत्नांना शास्त्राचा आधार आणि धोरणांचे पाठबळ हेही तेवढेच आवश्यक आहे.

हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये शेतीपद्धतीत काही मूलभूत बदल करणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक हंगामात चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांची जशी भिस्त पाण्यावर असते तशीच जमिनीवर म्हणजेच मातीवरही असते. बदलत्या हवामानात ज्या तीव्रतेने पाण्याची समस्या आ वासून उभी आहे त्याच तीव्रतेने जगभरामध्ये मातीची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. इतके की पुढील तीस वर्षांत पिकाऊ मातीच नष्ट होण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Agriculture Cultivation
Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

जर पिकाऊ माती नष्ट झाली तर अन्नधान्य कोठे पिकवणार? जेवढे प्रयत्न पाणी मिळविण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी घेतले जातात, त्यापेक्षा अनेक पटीने माती टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण दरवर्षी पडणाऱ्या पावसामुळे जशी पाण्याची आवक निश्चित आहे तशीच मातीची जावक सुद्धा निश्चित आहे. म्हणजे दरवर्षी मातीची धूप होतच आहे. एकदा वाहून गेलेली माती परत येत नाही.

पावसाने पाणी मिळते, परंतु माती मिळत नाही. म्हणजे ज्या मातीच्या जिवावर शेतीमधून भरघोस उत्पादन घेण्याची स्वप्ने बघतो त्याच मातीचा असा ऱ्हास डोळ्यादेखत होत आहे, ही केवढी भीतीदायक गोष्ट आहे. या ऱ्हासाला कारणीभूत आपणदेखील तेवढेच आहोत, हे लक्षात आल्यावर आपल्या पायाखालील माती सरकणार नसेल तर आपण आपल्याच पुढच्या पिढीचे गुन्हेगार ठरणार, यात शंका नाही.

जागतिक पातळीवर आणि राष्ट्रीय स्तरावर मातीच्या धुपीबद्दल जेव्हा संशोधन होते, तेव्हा पाण्यामुळे होणारी धूप ही ५५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे लक्षात आले आहे. पाण्यामुळे होणाऱ्या धुपीस कारणीभूत घटकांचा अभ्यास केल्यास जवळपास ६० टक्के धूप ही मनुष्याने केलेल्या ढवळाढवळीमुळे होते. यामध्ये शेतीमध्ये केलेल्या अनेक प्रकारच्या मशागतीच्या कामांचा वाटा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

म्हणजे एवढे सिद्ध झाले आहे की ज्या प्रदेशात शेतीची मशागत जास्त त्या भागात मातीची धूप अधिक! शेतीमधून माती वाहून जाणे म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होणे, म्हणजेच जमिनीचा उपजाऊपणा कमी होणे आणि शेवटी पिकांची उत्पादकता आणि दर्जा घसरणे! इतके अनर्थ केवळ अतिमशागतीने घडत असतील तर असे म्हणायला हरकत नाही की खरिपासाठी केलेली पूर्वमशागत म्हणजे नव्याने आणखी काही टन माती वाहून जाण्यास तयार केलेला मार्ग आहे.

Agriculture Cultivation
Turmeric Cultivation : नियोजन हळद लागवडीचे...

शेतकरी पिकाच्या पेरणीसाठी पावसाची वाट पाहतो, पण आलेला पाऊस अगोदर त्याच्या शेताचं फूल वाहून घेऊन जातो. आपल्या राज्यात जमिनीच्या प्रकारानुसार आणि उतारानुसार शेतीमधून दरवर्षी एकरी २ ते ४ टन मातीचे फुल वाहून जाते. याबरोबरच जमिनीमध्ये धरून ठेवलेला कार्बनचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. मातीतील कार्बन जेवढा नष्ट होतो तेवढे सूक्ष्मजिवांचे अन्न नष्ट होते आणि परिणामी पिकांचे जमिनीतून अन्न घेण्याचे काम मंदावते.

साहजिकच रासायनिक खतांचा मारा करूनही अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यातच अधिक उत्पादन घेण्यासाठी अधिक खते द्यावी लागतात, ही हरितक्रांतीची शिकवण आता विपरीत परिणाम करू लागली आहे, हे अभ्यासू शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. काही शेतकऱ्यांचे रासायनिक खते घालण्याचे लिमिट संपले आहे आणि ते आता पिकांच्या घटत चाललेल्या उत्पादकतेमुळे चिंतीत झाले आहेत. दुसऱ्या बाजूला रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची प्रत खराब होत असून क्षारयुक्त जमिनीचे प्रमाणही वाढत चालले आहे.

खरिपाच्या तयारीसाठी किती रासायनिक खते खरेदी करायची, हा निर्णय घेताना जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण माहिती करून घेणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच महत्त्वाचे आहे की घातली जाणारी रासायनिक खते पिकाला उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्मजिवांचे प्रमाण किती आहे, हे माहिती करून घेणे! आणि सूक्ष्मजिवांची संख्या अवलंबून आहे त्यांना मिळणाऱ्या अन्नावर म्हणजेच सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणावर!

आपल्या मातीत सेंद्रिय पदार्थ किती आहेत हे त्या मातीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावरून समजते. म्हणून हंगामापूर्वी आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब तपासणे अत्यंत गरजेचे आहे. शेजारील शेतकऱ्याने खताच्या एवढ्या गोण्या आणल्या म्हणून मी एक वाढीव गोणी आणतो, या प्रकारच्या स्पर्धा शेतकऱ्याला आणि जमिनीलाही मारक ठरत आहेत, हेही लक्षात घ्यावे लागेल. खते खरेदीचा निर्णय जसा सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर आणि उपलब्ध अन्नद्रव्यांवर अवलंबून आहे तसा घातलेल्या खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मातीतील सूक्ष्मजिवांबरोबरचा जैविक खतांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

एकूणच रासायनिक खतांवरील वाढत्या खर्चाचा विचार केला असता, घातल्या जाणाऱ्या प्रत्येक किलोचा हिशेब ठेवणे आवश्यक असते. म्हणजे खताचा प्रत्येक ग्रॅम जसा पिकाला मिळाला की नाही हे बघणे जसे महत्त्वाचे तसेच एकाही किलोचे पैसे वाया जाणार नाही याची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी जैविक खतांचा वापर अनिवार्य आहे. कारण जैविक खतांमधून मिळणारे सूक्ष्मजिवाणू रासायनिक खतांचे विघटन करून ते पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे पिकांच्या मुळांभोवती जेवढे सूक्ष्मजिवाणू जास्त तेवढा रासायनिक खतांचा पिकांना उपयोग जास्त. म्हणून खरिपाच्या तयारीमध्ये जैविक खते खरेदीही प्राधान्याने केली पाहिजे.

(लेखक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये कृषी विद्यावेत्ता आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com