Maharashtra Mango : महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वतीने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पनेतून राजारामपुरी आठव्या गल्लीतील भारत हौसिंग सोसायटीच्या सभागृहामध्ये कोल्हापूर आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास ग्राहकांचा पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड या आंबा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टॉल या उत्सवात मांडण्यात आले आहेत. हा महोत्सव १९ ते २३ मे दरम्यान सुरू राहणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आढळणाऱ्या ४७ जातीचे आंबेही या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. या महोत्सवात दीड किलो वजनाचा वनराज आंबा प्रदर्शनास भेट देणाऱ्या अबालवृद्धांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.
या महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, रायगड हापूस, देवगड हापूस, केशर आदी प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. महोत्सवात उत्पादक ते ग्राहक अशी संकल्पना असल्याने खुद्द कोकणचा हापूस ३०० ते ७०० रुपये साईज, दर्जानुसार असे डझनाच्या दरात उपलब्ध आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्यांतील विविध आंब्यांचीही चव या महोत्सवात चाखण्याची संधीही पणन मंडळाने प्रदर्शनास भेट देणाऱ्या ग्राहकांना दिली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
या महोत्सवाचे उद्घाटन विभागीय सहनिबंधक अरुण काकडे व आंबा उत्पादक शेतकरी भारत सलगर यांच्या हस्ते फित कापून झाले. यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक सचिन कांबळे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले उपस्थित होते.
राज्यातील ४७ जातींचे आंबे
महोत्सवात हापूस, मोहन भोग, हिलाटिओ, करूठा कोलंबन, पायरी, बैंगनपल्ली, पंचदराकलशा, मुशारद सस्ती, सुवर्णरखा, फर्नांडिस, वातगंगा, बंगाली पायरी, कोल्हापुरी रेड स्माल, दूध पेढा, विलभ, राजूमन, काळा करेल, ब्लॅक कोलमन, मानकुर, चिन्ना सुवर्णरखा, बनेशाम, चेसका राजभ, किपींग, निलम, नेरूका रासम, पेढरबाम, जहांगीर, छोटा जहांगीर, सल्लू-कल्लू, माया, गोवा मानकूर, कुलास, कोंडूर गोवा, पदेरी, रत्वा, आम्लेट, केसर, हिमायुद्दीन, ओलूर, नाजूक पसंद, कोरल, काळा गंडहस, मिरीजीओ, करूक्कम, वनाराज, याकुती, तोतापुरी यांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.