Food and Tourism Article : नुकताच चैत्र पाडवा झाला. चैत्र, वैशाख व ज्येष्ठ या उन्हाळ्याच्या महिन्यांना सुरुवात झाली. चैत्रात झाडांवरची लुसलुशीत कोवळी पालवी, काही झाडांना फुलांचा बहार तर काही झाडे फळा-फुलांनी लगडलेली असं चित्र असतं. आंबा, करवंद, फणस, तोरणे, रातांबे यांची झकास मेजवानी असते. उन्हाळ्याची सुट्टी कधी लागतेय आणि आपण मामाच्या गावाला कधी पोहोचू, असे आम्हाला लहानपणी वाटायचे. मामाची तर मोठीच आमराई होती. खोबऱ्या, गोट्या, गोल गटूळा रसाळ गावसामद्या असे खास आंबे राखलेले.
मागच्या चार-पाच पिढ्यांनी तरी या झाडांचे आंबे खाल्लेले. शेतकरी मामाच्या शेतातील ही धनदौलत सगळ्या भाचराना उन्हाळ्यात खुली असायची. त्यामुळे आपल्या गावापासून फार दूर नसलेल्या मामाच्या गावी महिना-पंधरा दिवस आमचे पर्यटन होई. मुंबई-पुण्यात राहणाऱ्या किंवा खेड्यांमध्ये असलेल्याही भाच्यांना हा मामाचा गाव प्रिय होता. इथे मग एकत्र आलेले मामा-मावश्यांच्या मुली-मुले धमाल मस्ती करत. गावातले, मातीतले खेळ, गप्पा-किस्से व शेतातला भरपूर खाऊ यांची चंगळ असायची.
काळ बदलला. भाचरे मोठी झाली. मामाच्या शेतातील आमराईतील एक-एक झाड तुटत गेले तसा मामाचा गाव व ते निर्मळ ममत्व सुटले. आता मामाही शहरात आणि भाचेही. मामाचा गाव देखील मागे पडला. मुलांना घेऊन फिरण्याची नवी पद्धत जन्माला आली. मुला-बाळांसह संपूर्ण कुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडू लागले. काही जण स्वतःच मित्र-मैत्रिणींसोबत भटकंतीसाठी/ट्रेकिंगसाठी बाहेर पडू लागले.
ज्याच्या त्याच्या खिशाला परवडेल असे ‘पॅकेज’ घेऊन कधी कोकण तर कधी ताडोबा तर कधी राजस्थान तर कधी हिमाचल असे विविधांगी सहलींना जाऊ लागले. काही जण तर वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर परदेशात देखील हिंडूफिरू लागले. यात देखील विविधता येत गेली. आणि पर्यटनाचा मार्ग व्यावसायिकरीत्या खुला झाला.
आजचा लेखाचा विषय पर्यटन आहे की काय, असे वाटतेय ना? विषय आहारभान हाच आहे. पण आज जरा एका वेगळ्या अंगाने आपण बघणार आहोत. आता उन्हाळ्याची सुट्टी लागलीय व आपले भटकंतीचे नियोजन देखील झाले असणार. अशा सुट्ट्या आपण ज्यांच्याबरोबर घालवणार आहोत, त्या ठिकाणी आपण आपल्या आहाराबद्दल जागरूक तर आहात ना?
‘‘हा काय प्रश्न झाला का? अहो, आम्ही चार-पाच अंकी रक्कम दिली आहे त्यासाठी. मोठाले हॉटेल, लक्झरी सुविधा आहेत.’’
‘‘आणि जेवण, ते कसे असणार?’’
‘‘असणार की हॉटेलमध्ये असते तसे. बुफे देखील असणार.’’
लोकहो, माझा मुद्दा इथेच आहे. आपण इतकी मोठी रक्कम भरतो आणि आपल्या ताटांत तेथे येणाऱ्या अन्नाबद्दल सजग असतो का? एरव्ही मुलांना चायनीज किंवा फास्ट फूड पासून दूर ठेवणारे आपण फिरण्यासाठी बाहेर जातो तेव्हा काय खात असतो? ते आपल्या पोटाला पचणारे असते का? त्यात वापरलेले कृत्रिम रंग व चव आणि खूप सारे तेल व मैदा आपल्या शरीरावर दीर्घ काळ परिणाम करणारे असू शकतात का? या सर्वांची उत्तरे आपण शोधायला हवीत. आपण जर अशा मोठ्या सहलीसाठी किंवा कामानिमित्त सतत प्रवास करत असाल तर जेवणाची काळजी घ्यायला हवी.
त्यासाठी आपण शक्यतो घरगुती पद्धतीचे जेवण मिळावे, याचा आग्रह धरावयास हवा. हल्ली कोकण किंवा भंडारदरा-कळसूबाई अशा ठिकाणी ‘होम स्टे’ व घरगुती जेवण मिळते. आम्ही जेव्हा असे ट्रेक आमच्या परिसरात घेतो तेव्हा आवर्जून आहाराकडे विशेष लक्ष देतो. इथले स्थानिक पदार्थ जेवणात येतील, हे कटाक्षाने बघतो. उन्हाळ्यात आमच्या गावातील करवंदाची कढी, फणसाची भाजी व नाचणीची भाकरी खाण्यासाठी दरवर्षी लोक आवर्जून येत असतात. असेच अजून एक उदाहरण देता येते ते पुण्यातील फाल्कन गटाचे. त्याचे संयोजक धनंजय शेंडबळे सांगतात, “ गेले ४० वर्षाहून अधिक काळ आम्ही सह्याद्रीत असे ट्रेक करत असतो. आमचे असे साहसी ट्रेक १ ते ७ दिवसांचे देखील असतात. यासाठी एक गोष्ट आम्ही कटाक्षाने पाळतो ती म्हणजे जेवण. एकतर आमचे जेवण आम्ही स्वतःच बनवतो. आमच्याकडे सर्व शिधा सोबत असतो. याशिवाय बाहेर पडले कि ‘चमचमीत’ तळकट पदार्थ खाण्याचा मोह आम्ही आवरतो. त्यामुळे कोणतीही दीर्घ ट्रीप / मोहीम आम्ही यशस्वी करू शकलो आहोत.’’
चमचमीत वरून आठवले, मी चार वर्षे माझ्या कामानिमित्त महाराष्ट्रातील २५ पेक्षा जास्त जिल्हे फिरत होते. अशा वेळी मिळणारे ‘हेल्दी फुड’’ म्हणजे दाल खिचडी, इडली-डोसा किंवा पराठा यालाच माझी पसंती असायची. काही दुर्गम ठिकाणी मिसळपाव, वडापाव किंवा पाववडा असेच पदार्थ मिळायचे. त्यावेळी मी जेवण न करता तेथे मिळणारी फळे घेऊन वेळ काढली आहे. त्यामुळे सतत फिरस्ती असतानाही मी तेव्हा आजारी पडले नाही व नंतर शरीरावर त्याचे काही दुष्परिणाम झाले नाही.
तुम्ही म्हणाल, “अरे, मिसळ, वडापाव हे तर अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ. मग ते खायचे नाहीत का?’’
खाऊयात ना. पण मिसळ-भेळ खाताना त्यात कडधान्य किती प्रमाणात असतात आणि तेल व मसाले किती असतात हे बघायला पाहिजे. बटाटेवड्यामध्ये हल्ली फेरफार व्हायला लागलीय. बेसन ऐवजी वाटाण्याचे पीठ असते आणि बटाट्याची भाजी नावालाच असते. शिवाय कधी तरी असे खाणे ठीक; पण रोज-रोज खाणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवलेल्या दिसतात. अनेकदा आपल्या आवडीचे आरोग्यदायी अन्न मिळण्याची शक्यता अनेक पटीने कमीच असते. उदाहरणार्थ भाकरी. भाकरी हा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ. महाराष्ट्रात फिरतो तेव्हा देखील भाकरी मिळण्याची मुश्कील, भाकरी कोठे मिळते का याचा शोध घ्यावा लागतो.
काही पथ्ये आवश्यक हे सर्व बघता. बाहेर कामानिमित्त किंवा भटकंती / सहलीसाठी फिरताना आहाराबद्दल आपण काही नियम घालून घेऊ शकतो व इतरांनाही त्याचा आग्रह धरू शकतो. यातूनच परिवर्तनाला सुरुवात होईल, याची मला खात्री वाटते. घरगुती व स्थानिक लोकांकडे जेवनाची सोय करावी. आपल्याला जेथे शक्य आहे तेथे आपण अशा जेवणाची व्यवस्था करू शकतो. यातून स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येईल व आपले आरोग्यही उत्तम राहील.
स्नॅक्स किंवा वेफर्स सोबत घेण्याएवजी घरी बनवलेले लाडू, चिवडा, दशम्या असे पदार्थ सोबत घेऊ शकतो. हल्ली तर मिलेटपासून बनवलेले लाडू, शेवचिवडा. कुकीज असे सर्वच पदार्थ उपलब्ध आहेत. बाजरीचे मुरमुरे किंवा ज्वारीचा चिवडा किंवा नाचणीची शेव असे पदार्थ नक्कीच आपल्याला उपयोगी पडू शकतील.
याशिवाय खजूर, शेंगदाणे, फुटाणे किंवा त्याचे लाडू-चिक्की असे इन्स्टंट एनर्जी देणारे पदार्थ आपण सोबत ठेवू शकतो. याशिवाय आपण प्रवासात फळांचा वापर मोठ्या प्रमाणात करू शकतो. हॉटेलमध्ये जेवण करताना मैदा व जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत. हे पदार्थ चवीला उत्तम असले तरी बरेचदा त्यात कृत्रिम रंग व फ्लेवर वापरलेले असू शकतात. शिवाय यासाठी वापरण्यात आलेले धान्य व भाज्या यांचा स्रोत देखील आपणास ठाऊक नसतो. त्यामुळे अगदीच पर्याय नसेल तेव्हा आपल्याला हॉटेलमध्ये खावे लागते. अशा वेळी सलाड किंवा भाजी / डाळी यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा.
आपल्या सहलीच्या आयोजकांकडे आरोग्यदायी जेवणाचा आग्रह धरावा. हल्ली काही मोठ्या आणि बाहेरच्या देशांतील हॉटेल्समध्ये ‘हेल्दी डिशेस’ मिळतात. नाश्त्यातील पदार्थ शक्यतो आरोग्यदायी असतात. तोच आग्रह आपण इतर ठिकाणी करू शकतो.
एखाद दिवसाचे बाहेर फिरणे असेल तर घरचा डबा सोबत ठेवणे हितावह आहे. याशिवाय काही ‘इन्स्टंट मिक्सेस’’ सोबत घेतल्यास त्याचा देखील वापर करता येऊ शकतो. इथे पुन्हा संरक्षके वापरलेले पॅक्ड फूडऐवजी ज्वारी-नाचणी व मिलेटचे पोहे किंवा फ्लेक्स, मुरमुरे सोबत असले तर तुम्ही त्यापासून गुळ-पोहे, दुध-पोहे, भेळ असे पदार्थ झटपट बनवू शकता.
इन्स्टंट न्यूडल्सऐवजी खिचडी, उपमा असे झटपट बनणारे पदार्थ देखील बनवू शकतो. त्यासाठी बाजारात आता प्रवासात सोयीचे होईल असे इलेक्ट्रिक कुकर, स्टोव्ह देखील उपलब्ध आहेत. आणि मिलेटसारख्या धान्यांमुळे चविष्ट पर्याय देखील.
(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)
: ranvanvala@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.