Diet in Summer : उन्हाळ्यात आहार कसा असावा?

Article by Nilima Jorwar : आपल्याकडे असे काही खास अन्नपदार्थ आहेत, जे उन्हाळ्यात औषध म्हणून उपयोगी पडतात. हे पदार्थ भारतात अनेक पिढ्या परंपरेने करत आल्या आहेत. ऋतुमानानुसार केलेले आहारातील बदल हे यामागचे शहाणपण. म्हणून तर विदर्भ किंवा मराठवाड्यातील उन्हात देखील ते टिकाव धरू शकले.
Summer Diet
Summer Diet Agrowon

Summer Human Diet Management : परवा पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना पायाला ओला चिखल लागला आणि खाली जमिनीकडे लक्ष गेले. काळ्या रंगाच्या फळांचा सडा पडला होता. म्हणून वरती बघितले तर पार्किंगमध्ये सावली करून असलेला महावृक्ष पिंपळ अंगोपांगी फळला होता. त्याच्या फांदी-उपफांद्यावर दाटीने फळे लगडली होती.

ही फळे पाहताना झटकन लहानपण डोळ्यासमोर आले. वड, पिंपळ व उंबराची फळे आम्ही खात असू. पिंपळाची फळे इतर दोघांपेक्षा चवीला एकदम सरस. मस्त गोड लागतात. वडाचे कडक असावेत. उंबर पाणथळीला असेल तर उंबर चवीला पुचट लागतात. वडावर खूप सारे पक्षी जमायचे व नुसता किलबिलाट असायचा.

पोपट यायचे, तांबट तर असायचेच, मैना यायच्या आणि इतर पक्षी देखील. पिकलेली फळे खाली पडली की आम्ही ती गोळा करायचो व खायचो. खाण्याच्या या प्रेरणा उपजतच असतात. माणसाबरोबर कीटकांना देखील त्या असतात. म्हणून याच वड-पिंपळ-उंबरात कीटकांसाठी खास फुलोरा असतो. इथे निसर्गाचे सूक्ष्म नियोजन अचंबित करते.

सध्या वसंत ऋतू सुरू आहे. सगळीकडे फुले लागली आहेत. आंबा-काजू मोहरले आहेत. फणसाने फळे धरली असतील. करवंदी फुलल्या आहेत. पळस-पांगारे-सावरी देखील मोहरले आहेत. जंगलातील फळांचा हंगाम आता सुरू झाला खरा. आधी येतील आंबळ्या. मग करवंदी, जांभूळ, आंबे, भोकर आणि सिंदाडे.

Summer Diet
Healthy Diet : अन्न ही प्राणिमात्रांची मूलभूत गरज

उन्हाळ्याची सुरुवात अशी दमदार फुला-फळांनी होते. कारण बाहेर उष्णतेचा पारा हळूहळू वाढायला लागतो. आल्हाददायक गारवा कमी होत जातो तसे तापमान वाढू लागते. बाहेरच्या वाढत्या तापमानाचा आपल्या शरीरावर परिणाम दिसू लागतो. उन्हाळ्यापूर्वी हिवाळा ऋतू असतो तेव्हा आपली अन्नपचन क्षमता चांगली झालेली असते. परंतु उन्हाळ्यात मात्र ती तितकीशी छान नसते. शिवाय उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता जास्त असते.

शरीराचे तापमान व एकूणच आतील सर्व संस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी द्रव स्वरूपात केलेलं सेवन जास्त फायद्याचे ठरते. यासाठी फळे व फळांचा रस महत्त्वाचा आहेच. जसे की आंबा, अननस, संत्री, उसाचा रस यासोबतच नारळाचे पाणी हे देखील उपयुक्त असते. या रसांमध्ये फळांतील साखर व खनिजे देखील आपल्याला मिळतात. उन्हाळ्यात जेव्हा जास्त घाम येतो तेव्हा शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होऊ शकते, म्हणून फळांतील साखर व इतर खनिजे ती कमी भरून काढतात.

आपल्याकडे कोकण-मुंबई भागात दमट व गरम वातावरण असते, तर मराठवाडा-विदर्भात तर एकदम प्रचंड गरमी वाढलेली असते. अनेकदा हा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जातो. अशा वेळी अन्न खावेसे वाटत नाही. जीव नुसता पाणी पाणी करतो. कितीही पाणी प्यायले तरी तहान भागात नाही, याला ‘सोक पडणे’ असे म्हणतात. अन्न सेवन केले तर जडपणा येतो, सुस्ती वाढते व रोजच्या कामात अडथळा निर्माण होतो. याशिवाय काहींना वाढलेल्या उन्हामुळे उष्णतेचे त्रास होतात.

उन्हाळी लागणे, अर्धशिशी किंवा घोळणा फुटणे असे प्रकार होतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा त्रास जाणवतो. शेतकऱ्यांना तर उन्हात काम करावेच लागते. अशा वेळी आपली तब्येत बिघडू नये म्हणून काही खास अन्नपदार्थ आपली नक्कीच मदत करतील. पण त्यासोबत काही गोष्टी अजून करणे आवश्यक आहे. जसे की शेतातील काम आपण भर दुपारी न करता सकाळी लवकर व सायंकाळी चारनंतर करावीत. विसरभ, वसई भागात हीच पद्धत आहे.

Summer Diet
Human Diet Management : आहारात असावेत तंतुमय पदार्थ

इथे शेतातील मजूरदेखील सकाळी व सायंकाळी काम करतात, दुपारी त्यांना सुट्टी असते. याशिवाय अंगावरचे कपडे हे सुती व फिकट रंगाचे असावे. शक्यतो सफेद रंगाचे कपडे हे उष्णतारोधक असतात तर याउलट काळ्या रंगाचे कपडे जास्त उष्णता शोषतात. डोके व शरीराचा इतर भाग आच्छादित असावा, जेणेकरून उन्हाचा थेट संबंध कमीत कमी येईल. चहा व इतर गरम पेय या दिवसांत घेणे टाळावे. फ्रिजचे पाणी पिण्यापेक्षा मातीच्या रांजणातील पाणी प्यावे. हे असे छोटे-छोटे उपाय करून उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्यावी.

खास उन्हाळ्यासाठी अन्नपदार्थ

यासोबतच आपण असे खास अन्नपदार्थ बघणार आहोत, जे तुम्हाला उन्हाळ्यात औषध म्हणून कामी पडतील. हे पदार्थ भारत देशात अनेक पिढ्या परंपरेने करत आल्या आहेत. ऋतुमानानुसार केलेले आहारातील बदल हे यामागचे शहाणपण. म्हणून तर विदर्भ किंवा मराठवाड्यातील उन्हात देखील ते टिकाव धरू शकले. याच काही पाककृती तुम्ही नक्की करून पाहा व ‘शरीराला ठंडा-ठंडा , कूल-कूल’ ठेवा. इथे वरवरचे थंडपेय किंवा आइस्क्रीम खाण्याचा सल्ला देत नाही. पण खालील साधेसोपे पदार्थ सहज उपलब्ध असणारे व गरिबातील गरिबाला देखील परवडणारे आहेत.

गडचिरोलीमध्ये बासी व आंबील हे दोन पदार्थ उन्हाळ्यातील इथले मुख्य जेवण आहे. इथे ४५ अंश सेलिसअसच्या पुढे तापमान असते. तुम्ही उन्हाचे बाहेरदेखील पडू शकत नाही. अशा वेळी बासी हा छत्तीसगडी समूहाचा रोजचा आहार असतो. त्यासाठी शिळा भात रात्रभर त्याच्या ५-६ पट पाणी घालून ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे अंघोळीला पाणी तापवण्यासाठी गावाकडे वापरतात तसे मोठे पातेले भरून हा रात्रभर भिजवलेला भात अजून पाणी घालून चुलीवर ठेवला जातो.

हे मिश्रण पुन्हा एक-दोन तास उकळवले जाते. घरातून बाहेर पडताना. मोठे वाडगेभर किंवा तपेलीभरून प्यायचे. हवे तेवढे प्रत्येकाने ते प्यायचे. विशेष म्हणजे यात मीठ किंवा साखर काहीही घातलेले नसते. ही बासी पिऊन तुम्हाला सारखी सारखी तहान लागत नाही व उष्णतेचा त्रास देखील होत नाही. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. ही बासी बनवण्यासाठी कोणतेही तांदूळ वापरू शकता.

याच भागातील गोंड समूहाचे पेज आणि आंबील आणि महुआच्या फुलांचे मनुखे हे उन्हाळ्यातील खास पदार्थ. भाताचे आंबील बनवण्याची यांची पद्धत म्हणजे तांदळाच्या कण्या भरपूर (पातेलेभर) पाण्यात शिजत घालायच्या. चुलीत रात्रभर असणाऱ्या आहारात त्या शिजून, गळून जातात. भरपूर उकळलेली ही पेज उन्हाळ्यातील यांची संजीवनी.

नाचणी किंवा ज्वारीचे आंबील हा पदार्थ तर चव, पौष्टिकता व आरोग्य यांचा त्रिवेणी संगमच. पूर्वी तुकारामबिजेला गावोगावी वारकरी ज्वारीच्या धाटाने बनवलेले आंबील गावचा प्रसाद म्हणून बनवायचे. आंबील आंबट, गोड व नमकीन अशा तीन चवींत बनवता येते. त्यासाठी नाचणी किंवा ज्वारीचे पीठ एक वाटीभर घ्या.

त्यात पाच पट पाणी घालून चांगले ढवळा. हे मिश्रण असेच रात्रभर झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी यात अजून थोडे पाणी घालून चांगले उकळून घ्या. चवीनुसार मीठ किंवा गूळ घालून उकळी द्या. थंड अथवा गरम ते भरपूर प्या. शेतावर अथवा कामावर जाण्यापूर्वी हे प्यायल्यास उष्णतेचा त्रास कमी जाणवेल.

वसईची कन्हेरी म्हणजे दमट वातावरणात उपयुक्त असे पेय. अंग दुखले, थोडीशी कणकण आली, भूक लागत नाही किंवा आजारी पडलात तर ही कन्हेरी तुम्हाला ताजेपणा देते. त्यासाठी लाल किंवा कोणत्याही पांढऱ्या तांदळाचे पीठ किंवा वरई / राळा / नाचणी यांचे पीठ घ्या. दोन व्यक्तींसाठी अडीच चमचे पीठ पुरे.

एखादी हिरवी मिरची तुकडे करून, पाव चमचा जिरे व तीन-चार कढीपत्ता आणि अर्धा चमचा साजूक तूप व चवीपुरते मीठ. कढईत तूप गरम करून मिरची, जिरे व कढीपत्ता घाला. त्यातच पीठ घालून ते चांगले एक मिनिट भाजून घ्या. नंतर त्यात दीड ग्लास पाणी हळूहळू ओता व ढवळत राहा. पातळसर मिश्रण घट्ट व्हायला लागले की मीठ घाला. अगदी काही मिनिटात कन्हेरी तयार. गरम गरम प्या. बाहेरून दमून आल्यावर देखील ऊर्जा मिळविण्यासाठी ही पिऊ शकता.

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)

ranvanvala@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com