Raja Ram Mohan Roy Agrowon
ॲग्रो विशेष

Raja Ram Mohan Roy: आधुनिक भारताचे जनक: राजा राममोहन रॉय

Social Reform: राजा राममोहन रॉय हे आधुनिक भारताच्या सामाजिक व धार्मिक सुधारणांचे अग्रणी मानले जातात. सतीप्रथा बंदी, स्त्री-शिक्षण, आधुनिक शिक्षण प्रणाली आणि ब्राह्मो समाजाच्या स्थापनेसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे.

Team Agrowon

सौ. सुरेखा बोऱ्हाडे

Indian History: राजा राममोहन रॉय यांनी आधुनिक भारताचे अग्रगण्य समाज सुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक म्हणून मोठे कार्य केले. व्यक्तिमत्त्व सुंदर, भव्य, ज्ञानी, त्यागी व तपस्वी असे राजा राममोहन रॉय होते.

राजा राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी पश्‍चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्यात राधानगरी येथे झाला. त्यांच्या घराण्याला रॉय ही सन्मान दर्शक पदवी बंगालच्या नबाबाच्या दरबारात प्राप्त झाली होती. राममोहन यांना संस्कृत, बंगाली, इंग्रजी, फारसी, ग्रीक व हिब्रू अशा अनेक भाषा अवगत होत्या.

श्रुतीस्मृती-पुराणांचा, कुराणचा आणि बायबलचा त्यांनी सखोल अभ्यास केला. या धर्मांचा तुलनात्मक अध्ययन करता त्यांच्या लक्षात आले की मूर्तिपूजा करणे अयोग्य आहे. कारण एकच अद्वितीय असा परमेश्‍वर आहे हा विचार अभ्यासाने पक्का झाला. त्यांनी आपले मूर्तिपूजेविरोधी विचार आई-वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु यामुळे त्यांच्यात मतभेद उत्पन्न झाले. राममोहन यांना आई-वडिलांवर प्रेम आणि श्रद्धा असतानाही घर सोडावे लागले.

हिंदू समाज रचनेतील उच्चनीच जातिभेदही त्यांना मान्य नव्हता. त्यांनी भारतभर प्रवास केला. बौद्ध धर्म समजून घेण्यासाठी ते तिबेटला गेले. तेथेही त्यांनी मूर्तिपूजन, धर्मगुरू पूजन, मंत्रतंत्र व कर्मकांड याविरोधात तेथील धर्मगुरूंशी वाद केला. त्या वेळी राममोहन यांना मारण्याचा प्रयत्न झाला. ते परत मायदेशी आले. सुसंपन्नता असतानाही त्यांनी सरकारी नोकरी स्वीकारून ग्रंथ लेखनात सुरुवात केली. फारसी भाषेत ‘ईश्‍वरभक्तांस देणगी’ या शीर्षकाखाली त्यांनी सृष्टिकर्ता व पालनकर्ता एक निराकार परमेश्‍वर आहे, हा सर्व धर्मांचा पाया आहे अशा अर्थाचा निबंध प्रसिद्ध केला.

सतिबंदीसाठी प्रयत्न

राममोहन रॉय यांनी सुशिक्षित मंडळींबरोबर धर्म चर्चा सुरू केली. या चर्चेत विविध धर्मपंथांचे लोक भाग घेत. मूर्तिपूजेची बाजू उचलून धरणारे बहुसंख्य लोक यामध्ये असल्याने या सनातनी मंडळींबरोबर झालेल्या मतभेदामुळे राममोहन यांना व त्यांच्या पत्नी-मुलांना विविध प्रकारचा छळ सहन करावा लागला. राममोहन यांनी ठिकठिकाणी मूर्तिपूजेविरुद्ध आपली परखड मते मांडली. त्यांनी १८१४ पासून कोलकता येथून सामाजिक व धार्मिक आंदोलनास प्रारंभ केला. सहकाऱ्यासोबत आत्मीय सभा सुरू केली‌.

त्यांच्या कुटुंबातील त्यांची वहिनी पतीबरोबर सती गेली. सती जातानाच्या तिच्या किंकाळ्या त्यांना अस्वस्थ करत राहिल्या. म्हणून एखादी स्त्री जर सती जात असेल तर ते तिला सती जाण्यापासून परावृत्त करत. ही प्रथा बंद व्हावी यासाठी राममोहन यांनी तळमळीने व कसून कार्य केले. १८१८ पासून सतीबंदीच्या कायद्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नाला यश येऊन त्या वेळेचे गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिग यांनी राममोहन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून १८२९ मध्ये सतीबंदीचा कायदा जाहीर केला.

आग्रह आधुनिक शिक्षणाचा

राजा राममोहन रॉय यांनी ‘संवाद कौमुदी’ साप्ताहिक बंगालमध्ये सुरू केले. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांविषयीच्या प्रश्‍नांचा आणि भारतीयांच्या राजकीय मागण्यांचा व तक्रारींचा ऊहापोह करणारे, एका भारतीयाने सुरू केलेले ते पहिले नियतकालिक होते. त्या वेळी इंग्रज सरकारने इंग्रजांच्या परवानगीशिवाय वृत्तपत्र काढण्यावर बंदी केली. या विरोधात त्यांनी आवाज उठवला.

त्यांनी भारतीय शिक्षण विषयक प्रश्‍नालाही हात घातला. इंग्रज सरकारच्या शिक्षण धोरणाऐवजी भारताच्या भाग्योदयासाठी व अन्य पुढारलेल्या राष्ट्रांबरोबर भारताला दर्जा प्राप्त होण्यासाठी भारतीयांना आधुनिक पाश्‍चात्त्य शिक्षण मिळाले पाहिजे, असा आग्रह धरला. परंपरागत संस्कृत शिक्षणाबरोबर भौतिकी, रसायन, तंत्रज्ञान, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र या विद्यांचे शिक्षण भारतीयांना मिळावे. यासाठी त्यांनी स्वखर्चाने प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले. बंगाली भाषेत इतिहास, भूगोल या विषयावरची अनेक पुस्तके स्वतः लिहिली.

तत्त्वज्ञानाचा व उपासना पद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. दिल्लीच्या बादशहाने काही राजकीय तक्रारी ब्रिटिश सरकार पुढे दाखल करण्यासाठी आणि त्याबरोबर सतीबंदीचा कायदा सरकारने कायम ठेवावा म्हणून राममोहन इंग्लंडला गेले. मुघल बादशहा अकबर दुसरा याने खुश होऊन या वेळी त्यांना ‘राजा’ हा किताब दिला. परदेशामध्ये त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले.

तेथील समारंभातील त्यांच्या भाषणामुळे व चर्चा-संवादामुळे भारताची प्रतिमा उजळून निघाली. तेथील मुक्कामात ते अकस्मात आजारी पडले. ब्रिस्टल येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी स्थापन केलेल्या ब्राम्हो समाजामुळे भारताच्या नवयुगाची प्रभात झाली, असं म्हणावं लागेल. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्य या प्रज्ञाशाली महापुरुषाने भारतीयांना दिली आणि त्यावरच आधुनिक भारताचा पाया घातला गेला.

९१५८७७४२४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT