Agriculture Success Story: शेतीतील नवा प्रयोगशील मार्गदर्शक: अभिजित घुले यांची यशोगाथा

Innovative Farming: रांजणी (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) येथील अभिजित नानासाहेब घुले या तरुण शेतकऱ्याने प्रयोगशीलता जपत आले, मिरची, कलिंगड उत्पादनात हातखंडा तयार केला आहे. सिंचन व खत व्यवस्थापन कामांमध्ये वेळ आणि श्रमाची बचत करण्यासाठी ‘सेंट्रलाइज सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे. युवा प्रयोगशील शेतकरी म्हणून अभिजित यांनी ओळख निर्माण केली आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Modern Agriculture: शेवगाव तालुक्यातील दहिगावने, रांजनी, शहरटाकळी, भातकुडगाव परिसरात जायकवाडी प्रकल्पाच्या फुटगवट्यातून सिंचन व्यवस्था तयार झाली आहे. त्यामुळे या भागात उसासह अन्य नगदी पिकांचे क्षेत्र वाढले आहे. भागातील अनेक तरुण शेतकरी प्रयोगशील शेतीकडे वळले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील रांजणी (ता. शेवगाव) येथील अभिजित घुले यांनी एमएस्सीचे (वनस्पतीशास्त्र) शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली.

त्यांची वडिलोपार्जित १४ एकर शेती आहे. तत्पूर्वी घुले कुटुंब शेतामध्ये उसाचे उत्पादन घेत होते. मात्र नातेवाईक सर्जेराव बाळासाहेब मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित यांनी पाच वर्षांपासून आले लागवड करण्यास सुरुवात केली. सध्या शेतामध्ये आले प्रमुख पीक असून मिरची, कलिंगडाचे उत्पादनही घेतले जाते. अभिजित यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनात आधुनिक शेतीविषयी तांत्रिक माहिती घेतली. त्यानंतर पाणी, खत व्यवस्थापन इतर बाबींचा अभ्यास करत काटेकोर नियोजन करत उत्पादनात वाढ मिळविली. अभिजित यांना वडील नानासाहेब, आई ज्योती, बहिणी दीपाली यांची शेतीमध्ये मदत मिळते.

सिंचनासाठी ‘सेंट्रलाइज सिस्टीम’

पिकांना सिंचन करताना पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी २०२२ मध्ये ‘सेंट्रलाइज सिस्टीम’ (सेंट्रलाइज वॉटर इरिगेशन सिस्टीम) कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून सहा एकर क्षेत्राला पाणी आणि खत व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करण्यात येते. विहिरीनजीक पाणी दाब मीटर, गेज मीटर, फिल्टर यंत्र, पाणी देण्यासाठी समांतर तयार केलेल्या पाइपलाइनचे व्हॉल्व्ह, खत देण्यासाठी स्वतंत्र पाइप व त्यासाठी व्हॉल्व अशी यंत्रणा आहे. ही सर्व यंत्रणा शेतातील विहिरीजवळ आहे.

Agriculture
Agriculture Success Story: सेंद्रिय शेती ते दुग्ध व्यवसाय; सविता करंजकर यांचा प्रेरणादायी प्रवास!

या यंत्रणेपासून सहा एकर क्षेत्राच्या मध्यापर्यंत समांतर आठ पाइपलाइन आहेत. प्रत्येक पाइपलाइनला स्वतंत्र व्हॉल्व्ह असून, तेथून दोन्ही बाजूंनी क्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यंत पाइपलाइन केल्या आहेत. प्रत्येक पाइपलाइनद्वारे साधारणपणे २८ गुंठे क्षेत्राला सिंचन होईल अशी व्यवस्था आहे. त्‍याला ठिबक सिंचनाची जोड दिली आहे. यामध्ये साधारण २ केजीपर्यंत पाण्याचा दाब नियंत्रित केला जातो. एका व्हॉल्व्हमधून प्रति तास साधारण ३५ हजार लिटर पाणी दिले जाते. शिवाय एकाचवेळी एकापेक्षा अधिक व्हॉल्व्हद्वारे सिंचन करता येते.

जायकवाडी प्रकल्पाच्या फुटगवट्यापासून सुमारे चोवीस हजार फूट अंतरावर पाइपलाइन टाकत पाणी आणून ते विहिरीत सोडले आहे. या पाइपलाइनचा एक पाइप ‘सेंट्रलाइज सिस्टीम’ला जोडण्यात आला आहे. शिवाय पाइपलाइनचे पाणी बंद असेल, तेव्हा विहिरीतील पाण्याचा वापर करण्यासाठी सिस्टीमला देखील पाइप जोडल्या आहेत. तसेच पाण्याचा दाब दर्शविणारे मीटर बसविले आहेत.

‘सेंट्रलाइज’ला ठिबकची जोड

‘सेंट्रलाइज सिस्टीम’मधून खते देण्यासाठी व्हेंच्युरी बसवलेली आहे. यामध्ये एक पाइप काढून तो लहान पाइप विद्युतपंपाच्या मोठ्या पाइपला जोडला आहे. त्यामुळे द्रवखत विद्युतपंपात जाऊन पुन्हा ‘सेंट्रलाइज सिस्टीम’मध्ये येऊन ठिबकद्वारे पिकाला जातात. ठिबकची डबल लाइन असल्याने संतुलितपणे पुरेसे पाणी शक्य तेवढ्या वेळेत पिकास मिळते.

या माध्यमातून खते, पाणी देण्याची कामे एकाचवेळी करता येतात. त्यासाठी जास्त मनुष्यबळाची आवश्यकता भासत नाही. तसेच रासायनिक फवारणीच्या कामासाठी ब्लोअर ट्रॅक्टरला जोडला आहे. त्याला नोझल यंत्रणा जोडत एका जागेवरून ३० फुटांपर्यंत एकावेळी फवारणी करता येते. एकाजागी ट्रॅक्टर उभा करून फवारणी करता येत असल्याने वेळ आणि मनुष्यबळाची मोठी बचत होत असल्याचे अभिजित घुले सांगतात.

Agriculture
Agriculture Success Story : एकीच्या बळावर पाटील बंधूंची नेत्रदीपक भरारी ; ५ एकरांपासून ८० एकरांपर्यंतचा प्रवास

आले शेतीला प्राधान्य

उसाची शेती करणाऱ्या घुले परिवाराचे आता पाच वर्षांपासून आले हे प्रमुख पीक झाले आहे. सध्या त्यांच्याकडे १४ एकर क्षेत्रांपैकी ९ एकरांवर आले पीक आहे. तसेच ३ एकर कलिंगड, एक एकरावर मिरची लागवड आहे. आले पिकाची काढणी केल्यानंतर नांगरट करून जमिनीला विश्रांती दिली जाते. एका क्षेत्रात लागवड केल्यानंतर पुढील दोन वर्षे त्या क्षेत्रात आले लागवड केली जात नाही. शेताला विश्रांती दिली जाते. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. त्या शेतामध्ये पिकांची फेरपालट केली जाते. शिवाय दर तीन वर्षांनी ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांची लागवड करून पीक फुलोऱ्यात आल्यानंतर जमिनीत गाडले जाते.

आले लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत करून पाच फूट रुंदीचे बेड तयार केले जातात. त्यावर एकरी २० टन या प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत वापरले जाते. शेणखताच्या वापरानुसार रासायनिक खतांचे नियोजन केले जाते. बेडमध्ये खत भरणीनंतर सिंचन करून पुन्हा वाफशावर जमीन आल्यानंतर लागवड केली जाते. त्याआधी ट्रायकोडर्मा, रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशकांचा वापर करून शेणखत कुजवले जाते. त्यानंतर पुन्हा पिकामध्ये कोणत्याही रासायनिक निविष्ठांचा वापर केला जात नाही. फक्त सेंद्रिय घटकांच्या वापरावर भर दिला जातो.

दरवर्षी साधारणपणे १५ मे ते १५ जून या काळात आले लागवड केली जाते. कारण या काळात तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस असते. हे वातावरण कोंब फुटण्यासाठी महत्त्वाचे ठरते. आले लागवडीसाठी एकरी १ टन बेण्याचा वापर केला जातो. कोंब फुटण्यासाठी साधारणपणे चाळीस दिवस आले बेणे घरीच सुप्त अवस्थेत ठेवले जाते.

कोंब लागवड एकाआड एक झिगझॅग पद्धतीने केली जाते. लागवड केल्यानंतर दर पंधरा-वीस दिवसांनी कोंबाची वाढ होईल तसे मातीची भर दिली जाते. अशा पद्धतीने नियोजन केल्यामुळे आल्याचा बेड दीड ते दोन फूट उंचीपर्यंत येतो. बेड जितका अधिक उंच असेल, तेवढा ओलावा टिकून योग्य तापमान राखले जाते.

फेब्रुवारी महिन्यापर्यंत कमी पाणी लागते, त्यानंतर पाण्याचे प्रमाण वाढविले जाते. पावसाळा आणि हिवाळ्यात दर चार ते पाच दिवसांनी, तर उन्हाळ्यात तीन दिवसांनी एकदा सिंचन केले जाते. जमिनीतील ओलावा आणि तापमान यांचा अंदाज घेऊन सिंचनाचा कालावधी निश्‍चित केला जातो.

आले पिकामध्ये सड रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. वातावरणातील बदलानुसार सिंचन, खताचे योग्य नियोजन करून प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न केले जातात. आले पिकामध्ये सुमारे ८० टक्क्यांपर्यंत सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर भर दिला जातो. सेंद्रिय शेतीसाठी शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल गाडगे यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे अभिजित सांगतात.

मल्चिंगवर मिरची, कलिंगड लागवड

मागील २ वर्षांपासून एक एकरांवर मिरचीची, तर तीन वर्षांपासून २ एकरांवर कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत. मिरचीची सहा फूट लांबीच्या बेडवर दोन झाडांत अर्धा फुटांचे अंतर ठेवून लागवड केली जाते. तर कलिंगडाचे सहा फुटांच्या बेडवर सव्वा फुटाचे अंतर राखून झिगझॅग पद्धतीने लागवड होते. दोन्ही पिकांची बेडवर मल्चिंगचा वापर करून लागवड केली जाते. मल्चिंग वापर करण्यामुळे सिंचनाच्या पाण्यात मोठी बचत होते. शिवाय किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो.

तसेच लागवडीमध्ये तणांचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे तण नियंत्रणावरील खर्चात मोठी बचत होते. या वर्षी आले लागवडीमध्ये आंतरपीक म्हणून मिरची लागवड केली होती. त्यातून एकरी १७ टनांपर्यंत मिरची उत्पादन मिळाले. त्यास सरासरी ४५ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला. कलिंगडाचे एकरी २८ ते ३० टन उत्पादन मिळाले, त्यास २२ ते २३ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला आहे.

अभिजित घुले, ७७०९४८३८६६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com