
Mushroom Production: अळिंबी उत्पादन घेण्यासाठी त्याचे शुद्ध व दर्जेदार बीज (स्पॉन्स) उपलब्ध होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. अळिंबी उत्पादन करणारे शेतकरी आणि स्पॉन्स पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. त्यातही मेघालयासारख्या ईशान्येतील राज्यामध्ये तर ही तफावत मोठी आहे. अळिंबी बीज उत्पादनातून रेमंड बी. मारवेन यांनी कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसायाची संधी निर्माण करत यश मिळवले आहे.
अळिंबीच्या काही जाती खाण्यायोग्य असून, त्यातील प्रथिने, पोषक व आरोगदायी घटकांमुळे महत्त्वाच्या ठरतात. अलीकडे कमी जागा, गुंतवणूक आणि कमी श्रमामध्ये त्याचे उत्पादन घेता येत असल्याने मेघालयामधील अनेक तरूण अळिंबी उत्पादकनाकडे वळत आहे. मात्र त्यांच्या अळिंबीचे बीज उपलब्धता करणे ही तशी आव्हानात्मक बाब ठरत आहेत. हीच बाब हेरून मेघालयातील री-भोई जिल्ह्यातील उम्समू गावातील रेमंड बी
मारवेन या तरुणाने ओयस्टर अळिंबी बीज (स्पॉन्स) निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. या औषधशास्त्रातील एम. फार्म हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या या तरुणाने उमियममधील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या संशोधन संकुलाला भेट दिली होती. त्यावेळी त्याला अळिंबी बीजाची मागणी आणि उत्पादनात राहत असलेली तफावत समजून आली. यामध्येच आपल्याला व्यवसायाची संधी असल्याचे त्याने हेरली.
मग त्यांनी फार्मर्स फर्स्ट प्रकल्पांतर्गत ‘अळिंबी बीज उत्पादन आणि उद्योजकता विकास’ हे सात दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. या अळिंबी बीज उत्पादनाच्या शास्त्रीय माहितीसोबतच प्रात्यक्षिकही करता आले. त्यातील अत्यंत कमी किमतीमध्ये करण्यायोग्य पद्धतीचा अवलंब करत त्यांनी स्वतःच्या घरातील दोन खोल्यांमध्ये छोटी प्रयोगशाळा उभारली. खर्च कमी राखण्यासाठी आवश्यक साधनेही शक्यतो घरगुती वापरली. उदा. निर्जंतुकीकरणासाठी घरगुती प्रेशर कुकर आणि साधे लसीकरण हूड इ.
अगदी ५०० मिलि कल्चर मीडियापासून सुरुवात केली. सुरुवातीला अनेक आव्हानाचा सामना करावा लागला तरी रेमंड यांनी हार मानली नाही. त्यांच्या चिकाटीमुळे ९१.३ टक्के यश दरासह २३ मदर स्पॉन पॅकेट तयार केले. त्यातून आणखी उत्पादन घेत पुढील २३० व्यावसायिक स्पॉन पॅकेटची पहिली बॅच तयार केली. आता ते आठवड्यातून ५०० व्यावसायिक स्पॉन पॅकेट तयार करतात. त्याची विक्री स्थानिक क्षेत्रात १०० रुपये प्रति किलो दराने केली जाते. एका बाजूला बीज (स्पॉन) उत्पादन घेत असतानाच दुसऱ्या बाजूला टिश्यू कल्चर आणि त्यांच्या होमस्टे व्यवसायासाठी ताजे मशरूम देखील वाढवतात.
अल्प गुंतवणुकीत गाठले ध्येय
रेमंड यांनी या उद्योगासाठी ९० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीतून त्यांनी पायाभूत सुविधा
आणि कामगार खर्च भागवला होता. पहिल्या काही टप्प्यांतच त्यांनी स्पॉन आणि मशरूम विक्रीतून मासिक ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. हळूहळू
गुंतवणूक वाढवत त्यांनी प्रगत उपकरणे विकत घेतली
आहेत. आता त्यांचे ध्येय आपल्या उम्समू गावाची
ओळख अळिंबी उत्पादनासाठीचे गाव म्हणून करण्याचे
ठेवले आहे. या व्यवसायातून स्थानिक रोजगार निर्माण होत आहे.
एकात्मिक शेती प्रणाली
या व्यवसायात यश मिळू लागल्याने त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यांनी कुटुंबाच्या जमिनीवर वराह पालन, मत्स्यपालन, गांडूळ खत आणि भाजीपाला शेती अशी एकात्मिक शेती प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच येणाऱ्या पर्यटकांना होमस्टे उभारला असून, त्यामध्ये आपल्या शेतातील उत्पादनांचाच प्रामुख्याने वापर केला जातो. त्यांच्या यशामुळे गाव आणि परिसरातील तरुणांनाही व्यवसायासंबंधी प्रोत्साहन मिळाले आहे.
(स्रोत : आयसीएआर चे ईशान्य पर्वतीय प्रदेशासाठी संशोधन संकुल, उमियम, मेघालय)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.