Nashik News : शेतकऱ्यांना अवघा १ रुपयांचा पीकविमा हप्ता, तर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी केंद्रास ४० रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे. असे असताना केंद्रावर शेतकऱ्यांकडून सर्रासपणे १०० रुपयांवर वसुली होत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या लुटीचा पर्दाफाश मालेगाव तसेच चांदवड तालुक्यात ‘ॲग्रोवन’ने केला आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा भरण्याची घोषणा केली. मात्र मोठा गाजावाजा होऊन ती घोषणा नावापुरती उरली का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
मागील वर्षीही शेकड्यात रकमा घेऊन शेतकऱ्यांची लूट करण्यात आली. त्यावेळीही ‘पैसे घेऊ नये किंवा संबंधितावर कारवाई करा’ असे आदेश काढून कागदी घोडे मिरविले गेले. प्रत्यक्षात ही लूट थांबली नसून यावर्षीही ती राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या वसुलीला सरकार चाप लावणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘स्टिंग ऑपरेशन’मधून आलेला अनुभव
ठिकाण : मालेगाव कॅम्प, जि. नाशिक
शेतकरी : पीक विमा भरून मिळेल का ?
केंद्र चालक : हो, गर्दी आहे, सायंकाळी निवांत या.
शेतकरी : शेतात कामे आहेत, लवकर होईल का?
केंद्र चालक : आत्ता नाही होणार, सर्व्हर जाम आहे. संध्याकाळी निवांत करू.
शेतकरी : किती खर्च येईल
केंद्र चालक : निवांत या संध्याकाळी सांगतो.
शेतकरी : अहो सांगा ना. येताना पैसे आणायला.
केंद्र चालक : तुमचा नंबर द्या, फोनवरून तुम्हाला खर्च सांगतो.
ठिकाण : चांदवड, जि. नाशिक
शेतकरी : पीक विम्याची मुदत कधीपर्यंत आहे ?
केंद्र चालक : १५ जुलैपर्यंत भरता येईल, पण साईट जाम होऊन जाईल. करायचं असेल तर लवकर करा.
शेतकरी : काय काय कागदपत्र लागतील.
केंद्र चालक : आधारकार्ड, बँक पासबुक आणा, उतारा मी काढून घेईल.
शेतकरी : उताऱ्याला किती पैसे लागतील.
केंद्र चालक : ३० रुपये.
शेतकरी : फॉर्म भरायला किती खर्च येईल.
केंद्र चालक : किती फॉर्म भरायचे आहेत तुम्हाला ?
शेतकरी : दोन.
केंद्र चालक : मग फॉर्म आणि उतारा १३०, दोन फॉर्मचे २६० रुपये लागतील.
शेतकरी : बरं, वडील लागतील स्वतः की मी असलो तरी चालेल.
केंद्रचालक : हो चालेल, पण लवकर या करून देतो.
सरकारने पैसे न दिल्याने वसुली ?
सीएससी केंद्रांच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काही केंद्र चालकांनी दबक्या आवाजात सांगितले की, ‘आम्हाला दोन वर्षांपासून विमा कंपन्यांनी पैसे दिलेले नाहीत. मग आम्ही वीज बिल कसे भरायचे, गाळ्याचे भाडे कसे द्यायचे? खर्च कसा भागवायचा?’
केंद्र चालकांची कारणे...
एक रुपयात अर्ज भरा म्हटल्यानंतर ‘सर्व्हर जाम आहे,’ ‘नंतर या भरून देईल’ अशी उत्तरे केंद्र चालक देतात.
‘सर्व्हर जाम होईल, आत्ताच करून घ्या. थोड्याच खर्चात तुम्हाला तत्काळ करून देतो,’ असेही सांगितले जाते.
सर्व कागदपत्रे झेरॉक्स करून उतारा काढून देतो. त्यामुळे पैसे लागतीलच, असेही केंद्रचालक म्हणतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.