बाळासाहेब पाटील
Mumbai News : यंदाच्या खरीप हंगामात अवर्षणामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे २४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून अग्रिम मंजूर झाला. मात्र, अजूनही ८३१ कोटी ४९ लाख रुपयांची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमधील अग्रिम वाटप लांबले आहे. नांदेड जिल्ह्यातील तब्बल २८५ कोटी ७४ लाख रुपये, वाशीम जिल्ह्यात १०५ कोटी, ७९ लाख रुपयांची रक्कम वाटप रखडली आहे. तर हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दावेच मंजूर न झाल्याने येथे पीकविमा मिळालेला नाही.
विमा कंपन्यांनी त्यांना प्राप्त झालेला शेतकरी विमा हप्ता आणि शासनाकडून प्राप्त झालेला अग्रिम विमा हप्ता यातून प्रतिकूल हवामानामुळे पेरणी, लावणी होऊ शकली नसेल तर दुसऱ्या हप्त्याची वाट न पाहता आपत्तीच्या दाव्यांची पूर्तता करण्याचा नियम आहे.
यंदा जोखमीच्या बाबींचा पहिला ट्रिगर नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, सांगली, नंदुरबार, बीड, बुलडाणा, वाशीम, धुळे, पुणे, हिंगोली, धाराशीव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, अमरावती आदी २४ जिल्ह्यांमध्ये लागू झाला होता.
जळगाव, चंद्रपूर, सांगली, नंदुरबार, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांतील आक्षेप मागे घेण्यात आले होते. नागपूर, परभणी, जालना, कोल्हापूर, अकोला, धाराशीव या जिल्ह्यांत पीकविमा कंपन्यांनी आक्षेप घेतले नव्हते. हिंगोली, धुळे, पुणे आणि वाशीममध्ये आक्षेप घेण्यात आले आहेत त्यावर विविध स्तरांवर सुनावणी सुरू होत्या.
सुनावणीअखेर राज्यातील शेतकऱ्यांना २१०५ कोटी १४ लाख रुपये मंजूर झाले होते. यापैकी १२७३ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ८३१ कोटी, ४९ लाख रुपयांची रक्कम अद्याप वितरित झालेली नाही.
दुष्काळग्रस्त छत्रपती संभाजीनगरला ठेंगा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी चोलामंडलम ही कंपनी नियुक्त केली आहे. या जिल्ह्यातील एकही दावा मंजूर करण्यात आला नाही. या जिल्ह्यात गंभीर दुष्काळ जाहीर करूनही कंपनीने ठेंगा दाखविल्याने शेतकऱ्यांना अस्वस्थता आहे. त्याबरोबरच हिंगोली जिल्ह्यातील दावा मंजूर करण्यात आलेला नाही.
कंपनीनिहाय थकीत रक्कम
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी १३९ कोटी १५ लाख
भारतीय कृषी विमा कंपनी १८५ कोटी ७९ लाख
एचडीएफसी इर्गो ८४ कोटी ४९ लाख
युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स ३४ कोटी ५१ लाख
आयसीआयसीआय लोबार्ड २२ कोटी ६१
एसबीआय ५० कोटी २० लाख
युनायटेड इंडिया २८५ कोटी ७४ लाख
नुकसान भरपाई मंजूर अर्ज संख्या ४८ लाख ३४ हजार ४५
नुकसान भरपाई अर्ज वाटप संख्या २६ लाख ५७ हजार ४९
नुकसान भरपाई मंजूर रक्कम २१७ कोटी ७६ लाख १४ हजार
वितरित विमा रक्कम १२७ कोटी ३६ लाख ५ हजार
प्रलंबित अर्जांचे वाटप २१ लाख ७७ हजार ६९६
प्रलंबित वाटप ८३१ कोटी ४९ लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.