Jalna News : शासनाने मदत जाहीर केली ती कमीच आहे. आमचे खायचे वांदे होऊन बसले. उत्पन्न शून्य झालं असताना घर चालवायचं कसं, मुलांचे शिक्षण, आजारपणावर खर्च करायचा कुठून. हे सर्व प्रश्न असताना बियाणे खताचे उधारी चुकवायची कशी, त्यातच अंगावर असलेले कर्ज फेडायचं कसं हे प्रश्न आहेत. त्यामुळे शासनाने कर्जमाफी ही करावीच, त्याशिवाय आम्ही सावरू शकत नाही. टाका (ता. अंबड) येथील प्रदीपकुमार वरखडे व रामेश्वर घुगे व्यथा मांडली..सरकी, तूर, बाजरी, सोयाबीन, फळबाग सारंच नुकसानीत आहे. पिकाला खर्च लावून बसलो आता नेमक सोनरूपी पीक हाती येणार होतं. पण निसर्गाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला. झालेलं नुकसान भरून निघणार नाही, पण मायबाप सरकारने निदान आमचा खर्च वसूल होईल, अशी मदत करावी, अशी आर्त साद दुनगाव (डोंणगाव दर्गा), टाका, वडीगोद्री, रामगव्हाण, सौंदलगाव, कर्जत आदी शिवारातील शेतकऱ्यांनी सरकारला घातली..Flood Relief Package: ‘पॅकेज’चा फोलपणा.रब्बीची वाटदेखील अवघड...दुनगाव (डोंणगाव दर्गा) (ता. अंबड) येथील शुभम मुंडे, विक्रम मुंडे, बंडू खाडे, लहू मुंडे, जमीर पठाण, जुबेर पठाण, अशोक जायभाये, रामेश्वर मुंडे यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक आपत्तीने निर्माण केलेल्या संकटाच्या झळा स्पष्ट जाणवत होत्या. शुभम मुंडे म्हणाले, की ६० गुंठ्यांतील अति पावसाला सामोरे जाऊ शकणारी तूर आता वाळून गेली. तिच्यावर ३५ हजार खर्च झाले. दोन हेक्टर कपाशीवर सुमारे दीड लाख खर्च झाला. त्यात आमचे श्रम धरले नाही. खत, औषध पाच फवारण्या सारं काही पाण्यात गेलं..दसऱ्याच्या आसपास कापूस घरात यायचा. आता आठ-दहा बोंड प्रत्येक झाडाला आहेत, त्यातली काही सडलीत. महिन्यापेक्षा जास्त काळ पाऊस होता. आता पाऊस आला नाही तर किमान दीड ते दोन महिन्यांनंतर जमीन पेरणी योग्य होईल. एरवी आम्ही नोव्हेंबरमध्ये सुरुवातीपर्यंत पेरणी करायचो. यंदा मात्र तशी स्थिती नाही. अजूनही शेतातून पाणी वाहतय. दुसरं असं, की पाऊस किती झाला तरी शिवारात मोठी साठवण करणारी तलाव नाहीत. त्यामुळे मार्च, एप्रिलपासून पाणी प्रश्न बिकट होत जातो. हंगाम लांबला तर रब्बीची पाण्याअभावी शाश्वती नाही. त्यामुळे यंदा खरीप हातचा गेला आणि रब्बी अवघड होऊन बसेल. नुकसान अमर्यादित झाले त्यामुळे भरपाई मर्यादित नकोच. निदान झालेला खर्च तरी सरकारने भरून द्यावा..Flood Crisis: ‘मनुदेवी’च्या प्रकोपाने आमचे व्हत्याच नव्हते झाल...पंचनाम्याची गती संथ...दुनगाव (डोंणगाव दर्गा) येथीलच रामेश्वर मुंडे व बंडू खाडे म्हणाले, नुकसानीचे पंचनामे प्रचंड संथ सुरू आहेत. किती पंचनामे झाले कळायला मार्ग नाही. श्री. खाडे म्हणाले की, २२ एकर शेतीतील सोयाबीन, तूर, कपाशी, हायब्रीड सारी पिकं हातची गेली. एकीकडे पंचनामे संथ गतीने होत आहेत. दुसरीकडे सरकार मदत जाहीर करून ती दिवाळीपूर्वी देऊ म्हणते. पंचनामे झाले नाही तर मदत मिळेल का ? फक्त मोसंबीचे पंचनामे होत आहेत.शेतात मजूर येईना....टाका (ता. अंबड) येथील किशोर मस्के पाटील म्हणाले, की महिनाभरापेक्षा जास्त काळ झालेल्या पावसामुळे विविध शेतांत जाणाऱ्या वाटा चिखलमय झाल्यात. टाका ते जळगाव रस्त्यावर ४० टक्के शेतकऱ्यांची शेती. पण आताही शेतकऱ्यांना पाण्यातून मार्गक्रमण करण्याशिवाय पर्याय नाही. गावाच्या पश्चिम भागातील सांडाचा मळा शिवारात शेती असलेल्यांनाही शेतात जाणे अवघड. त्या शिवारात शेती असलेले श्याम मस्के व शरद मस्के पाटील म्हणाले, की मोसंबी बागेतून पाणी वाहतंय. शिवाय शेतात जाण्याची वाट बिकट आहे. एक महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही शेतात जाण्याकरिता पाणी आणि चिखल तुडवत जावं लागतं. .व्यापारी येऊ न शकल्याने मोसंबीची तोडणी शक्य झाली नाही, त्यामुळे मोठी गळ झाली, तूर, कपाशीची पीक अजूनही पाण्यात आहेत. अजून पंचनामा झाला नाही. शेतातून वाहणार पाणी पाहता मागच्या वर्षी प्रमाणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी शक्य नाही. पेरणी लांबली तर रब्बीतल्या काही पिकांचा पेरणीचा कालावधी संपून जाईल. त्यामुळे रब्बीची शाश्वती तशी कमीच. पावसाने उघडीप दिल्याने कपाशीची चार दोन बोंडं फुटली, पण मजूर मिळत नाही, मिळालं तर चिखलात वेचणी करण्याला नकार देतं. एका वेचणीत कापसाचा धुराळा उडल. त्यामुळे जिथे कोरडवाहू सात आठ क्विंटल कापूस पिकायचा तिथं एक, दोन क्विंटल पुढे जाणार नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.