Pomegranate  Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Farming : डाळिंब बागेत आंबिया बहरावर भर

सुदर्शन सुतार

Management of Pomegranate Orchard :

शेतकरी नियोजन

पीक : डाळिंब

शेतकरी : विश्वजित गंगाधर भोसले

गाव : बेंबळे, ता. माढा, जि. सोलापूर

एकूण क्षेत्र : ४० एकर

डाळिंब क्षेत्र : २४ एकर

सोलापूर जिल्ह्यातील बेंबळे (ता. माढा) येथील विश्वजित गंगाधर भोसले यांची ४० एकर शेती आहे. त्यापैकी २४ एकर क्षेत्रामध्ये डाळिंब लागवड आहे. त्याशिवाय १५ एकरांत ऊस लागवड आहे. सुरवातीच्या काळात ऊस आणि केळी लागवडीवर अधिक भर दिला होता. मात्र उत्पादित मालास मिळणारा दराची शाश्वती कमी झाल्याने डाळिंब लागवडीकडे वळल्याचे विश्वजित सांगतात.

डाळिंब लागवड

जमीन मध्यम ते हलक्या प्रतीची असल्याने डाळिंब लागवडीचा निर्णय योग्य होता. त्यानुसार सुरवातीला १५ एकरांवर लागवडीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून डाळिंबाच्या भगवा वाणाची सुमारे ६००० रोपे आणली. त्यानंतर मागील तीन महिन्यांपूर्वी आणखी ९ एकर क्षेत्रात लागवड केली आहे.

बागेत मुख्यतः आंबिया बहार धरला जातो. आतापर्यंत जुन्या डाळिंब लागवडीतून दोन बहार घेतले आहेत. त्यातून एकरी सरासरी १० टनापर्यंत उत्पादन मिळाले आहे. या हंगामात संपूर्ण १५ एकरातून सर्वाधिक २०० टनांपर्यंत उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा विश्वजित यांना आहे. डाळिंब बागेच्या व्यवस्थापनामध्ये तानाजी गाडे, कल्याणराव डोंगरे यांचे मार्गदर्शन मिळते.

आंबिया बहराचे नियोजन

बहार नियोजनानुुसार ऑक्टोबर महिन्यापासून पूर्वतयारी सुरू होते. १५ ऑक्टोबर ते १५ जानेवारीपर्यंत बागेला विश्रांती दिली जाते.

विश्रांतीच्या काळात डिसेंबरमध्ये एकरी दोन ट्रॉली प्रमाणे शेणखत तसेच रासायनिक खतांचे बेसल डोस प्रति झाड अर्धा किलो प्रमाणे दिले.

झाड सशक्त होण्यासाठी आणि काडीची वाढ चांगली व्हावी, यासाठी डिसेंबरपासून जानेवारी महिन्यात छाटणी करेपर्यंत दर दहा दिवसांच्या अंतराने ०ः५२ः३४, १३ः०ः४५, १८ः४६ः०, सल्फर, बोरॅान, कॅल्शिअम यांच्या आलटून-पालटून फवारण्या घेतल्या आहेत.

त्यानंतर १५ जानेवारीला बागेची बहार छाटणी करून घेतली. छाटणी केल्यानंतर पुन्हा

रासायनिक खतांचे बेसल डोस दिले.

१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत साधारण दर आठ दिवसांनी ठिबकद्वारे विद्राव्य खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये आलटून पालटून दिली.

त्यानंतर ०ः५२ः३४, १३ः०ः४५, ०ः६०ः२० ही खते दर १० दिवसांनी एकरी २ ते ३ किलो प्रमाणे दिली.

साधारण १५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान बागेची स्वच्छता केली. याच काळात बागेतील अतिरिक्त फुटी काढून घेतल्या. आणि झाडांना योग्य आकार दिला.

कळी निघण्याची अवस्था सुरु झाल्याने रोगप्रतिबंधक उपाय म्हणून कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या.

आगामी नियोजन

सध्या बागेमध्ये कळीची चांगली सेटिंग झालेली दिसून येत आहे. साधारण जून ते जुलै महिन्यात बागेत प्रत्यक्ष काढणीस सुरवात होईल.

पुढील आठवड्यात झिंक, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फेरस यांचा प्रत्येकी दोन किलो प्रति एकर याप्रमाणे डोस देणार आहे.

कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या हलक्या फवारण्या १० ते १५ दिवसांच्या अंतराने घेतल्या जातील. ही कार्यवाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केली जाईल.

सेटिंग अवस्थेतील बागेमध्ये मधमाश्यांचे प्रमाण वाढण्यासाठी गूळ, ताक आणि विलायची यांच्या मिश्रणाची एक फवारणी या आधी घेतली आहे. पुढील आठवड्यात आणखी एक फवारणी घेतली जाईल.

पुढील काळात तापमानात वाढ होईल. या काळात झाडांची पाण्याची गरज वाढते. त्यामुळे प्रतिदिन चार ते पाच तास सिंचन केले जाईल.

व्यवस्थापनातील बाबी

दोन ओळींत १२ फूट आणि दोन रोपांत ८ फूट अंतर ठेवत लागवड केली आहे.

वर्षांतून दोन वेळा प्रति झाड अर्धा किलो प्रमाणे शेणखताची मात्रा दिली जाते. तसेच डीएपी, पोटॅश, निंबोळी पेंड प्रत्येकी १ पोते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो प्रमाणे बेसल डोस दिला जातो.

बागेत कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेचे नियमित निरिक्षण केले जाते. दर १० ते १५ दिवसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक फवारणी घेतली जाते.

बागेतील वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जातो.

विश्वजित भोसले, ९८२२९२१७५५

(शब्दांकन : सुदर्शन सुतार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT