Pomegranate Farming : ‘डॉलर अर्नर’ला वाचवा

Article by Vijay Sukalkar : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या डाळिंबाच्या बागा वाचवून त्यास गत वैभव प्राप्त करून द्यावे लागेल, यातच सर्वांचे हित आहे.
Pomegranate Fruit
Pomegranate FruitAgrowon
Published on
Updated on

Pomegranate Cultivation : महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात डाळिंब हे फळपीक चांगले रुजले. अत्यंत कमी पाण्यावर डाळिंब बागांच्या काटेकोर व्यवस्थापनातून शेतकऱ्यांनी चांगले उत्पादनही घेतले. सुरुवातीच्या काळात डाळिंबाला दरही चांगला मिळत गेला. निर्यातीतूनही शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले. त्यामुळे डाळिंबास ‘डॉलर अर्नर’ संबोधले जाऊ लागले.

परंतु कोरोनाच्या आधी पाच-सहा वर्षे डाळिंबाला अपेक्षित दर मिळाले नाही. डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या बागा तोट्यात गेल्या. रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि कमी दर यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढूनही टाकल्या आहेत. कोरोना काळात सर्व शेतीमालासह डाळिंबालाही फटका बसला.

परंतु कोरोनानंतर डाळिंबाचे देशांतर्गत आणि जागतिक बाजारातील दर टिकून आहेत. परंतु आता हवामान बदलाचा फटका डाळिंब भागांनाही बसतोय. हवामानात अचानक होणाऱ्या बदलांनी बहर धरणे, तो टिकविणे डाळिंब उत्पादकांना अडचणीचे जात आहे. मागील मॉन्सूनमधील कमी पाऊसमानामुळे आता पाणीटंचाईही वाढू लागली आहे. पाणीटंचाईचा फटकाही डाळिंबाच्या हस्त आणि आंबे बहरला बसतोय.

डाळिंबाला कमी पाणी लागत असले तरी तेवढेही पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी बहर धरण्यास धजावत नाहीत. ज्यांनी बहर धरला त्यांच्या डाळिंबाची फळे रात्रीचे कमी आणि दिवसाच्या अधिक तापमानाने तडकत आहेत. हे सर्व कमी की काय तेलकट डाग रोगाबरोबरच आता मररोग आणि पिन होल बोररचा प्रादुर्भाव वाढल्याने बागेतील उभी झाडे वाळून जात आहेत. जुन्या बागांबरोबर नवीन लागवड केलेली डाळिंबाची झाडेही मररोग आणि पिन होल बोररच्या तावडीतून सुटताना दिसत नाहीत.

Pomegranate Fruit
Pomegranate Export : अमेरिकेला डाळिंबाची निर्यात सुरू

त्यामुळे डाळिंबाचे उत्पादन घटत चालले आहे. उत्पादन घटल्याने सध्या देशांतर्गत बाजारपेठेत सरासरी १०० रुपये, तर निर्यातक्षम डाळिंबाला १२५ रुपये प्रतिकिलो असा चांगला दर मिळतोय. वाढत्या रोगकिडीच्या प्रादुर्भावाने निर्यातक्षम गुणवत्ता टिकविण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. तसेच देशांतर्गत बाजारात मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे निर्यातीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत नाही. परिणामी मागील दोन वर्षांपासून निर्यातीत कमालीची घट होत गेली आहे.

२०२१-२२ मध्ये ९९ हजार टनावर असलेली डाळिंब आणि त्यांच्या दाण्याची निर्यात २०२२-२३ मध्ये ६२ हजार टनांवर, तर २०२३-२४ (नोव्हेंबरपर्यंत) ३८ हजार टनांवर येऊन पोहोचली आहे. आता पाणीटंचाईमुळे आंबिया बहराचे उत्पादनही अपेक्षित प्रमाणात मिळणार नसल्याने येथून पुढे निर्यातीत फारशी वाढ होणार नाही. अधिक गंभीर बाब म्हणजे डाळिंब उत्पादक रेसिड्यू फ्री (रासायनिक अवशेषमुक्त) उत्पादन घेण्यासाठी आता पुढे येत नाहीत.

Pomegranate Fruit
Pomegranate Export : देशातून डाळिंबासह दाण्यांची निर्यात रोडावली

कारण हवामान बदलाच्या काळात रेसिड्यू फ्री उत्पादन घेणे कठीण जात आहे. हे कृषी शास्त्रज्ञांपुढील मोठे आव्हानच म्हणावे लागेल. डाळिंबाच्या तेलकट डाग रोगाबरोबरच आता मररोग तसेच पिन होल बोररचे प्रभावी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय शेतकऱ्यांना द्यावे लागतील.

बदलत्या हवामानानुसार बहर नियोजनातही वेळोवेळी करावयाचे बदल शेतकऱ्यांना सांगावे लागतील. पाणीटंचाईमुळे बहर धरणे शक्य झाले नसले तरी उत्पादकांनी डाळिंब बागा तोडून टाकण्यापेक्षा ते जोपासण्याचे काम करायला हवे. महत्त्वाचे म्हणजे डाळिंबाचे उत्पादन देशांतर्गत बाजारपेठेसाठी असो, की निर्यातक्षम रसायन अवशेषमुक्त उत्पादनावर भर द्यायला हवा.

यासाठी सुद्धा तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. आपल्या डाळिंबाला युरोप तसेच आखाती देशात मोठी मागणी आहे. यापूर्वी डाळिंबाची निर्यातीत आपण जगभर चांगले नावे कमवले आहे. अशावेळी डाळिंब निर्यातीतही सातत्याने वाढ झाली पाहिजेत.

रसायन अवशेषमुक्त डाळिंब उत्पादन ही शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी अशी सर्वांचीच जबाबदारी आहे. यांस अपेडासह केंद्र-राज्य सरकारचे पाठबळ मिळाले की डाळिंब निर्यात वाढीस वेळ लागणार नाही. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या डाळिंबाच्या बागा वाचवून त्यास गत वैभव प्राप्त करून द्यावे लागेल, यातच सर्वांचे हित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com