Mushroom Production Agrowon
ॲग्रो विशेष

Mushroom Production : अळंबी उत्पादनातून मिळाली आर्थिक स्थिरता

Team Agrowon

वासुदेव चांदुरकर

Mushroom Business : पाळोदी (ता. दारव्हा, जि. यवतमाळ) येथील सौ. कविता परमेश्‍वर येवले यांनी शेतीला अळिंबी उत्पादनाची जोड दिली आहे. कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे) येथे रीतसर प्रशिक्षण घेऊन त्यांनी तीन वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने अळिंबी उत्पादनास सुरुवात केली. ताजी अळिंबी वाळविलेल्या अळिंबीची पावडर तसेच चॉकलेट निर्मिती करून बाजारपेठेत स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.

पाळोदी (ता. दारव्हा, जि. यवतमाळ) येथील सौ. कविता परमेश्‍वर येवले यांच्या कुटुंबाची साडेतीन एकर जमीन. यामध्ये दोन एकर कोरडवाहू आणि एक एकर बागायती क्षेत्र आहे. कुटुंबामध्ये सहा जण आहेत.

शेतीमध्ये कापूस, तूर आणि सोयाबीन लागवड असते. परंतु शेतीला लागून नाला असल्याने अति पावसामुळे शेतीमधील पिके वाहून जातात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थिरता येण्यासाठी शेतीसोबत पूरक व्यवसायाच्या दृष्टीने कविताताईंनी विचार सुरू केला.

पाळोदी गावात प्रक्रिया उद्योग व्यवसायासाठी अनुकूल स्थिती नसल्याने सात वर्षांपूर्वी कविताताई कुटुंबासह दारव्हा या तालुक्याच्या गावी राहण्यासाठी आल्या. कविताताईंचे पती अर्थार्जनासाठी रिक्षा चालवतात. कुटुंबाने राहण्यासाठी भाड्याचे घर घेतले. हळूहळू आर्थिक बचत करत त्यांनी स्वतःचे घरदेखील बांधले.

या दरम्यान कविताताई ‘उमेद’अंतर्गत सुरू असलेल्या महिला बचत गटात सहभागी झाल्या. त्यातून त्यांना पूरक उद्योगाची माहिती मिळाली. शेतीत होणारी नापिकी, बांधलेल्या घराचे कर्ज, शिक्षणावर होणाऱ्या खर्चामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने त्यांनी घरगुती स्तरावर पूरक उद्योग सुरू करण्याचे ठरविले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अळिंबी उत्पादनाला सुरुवात ः
उमेदअंतर्गत असलेल्या बचत गटातील सदस्या सविता काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार कविताताईंनी कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे) येथील गृहविज्ञान शाखेतील तज्ज्ञ कु. नम्रता राजस यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार कविताताईंनी अळंबी उत्पादनाच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्या.

कृषी विज्ञान केंद्रामध्ये तीन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करून अळंबी उत्पादनाचा निर्णय घेतला. त्यानंतर मौजा मोझार (ता. नेर) येथील अळंबी उत्पादन केंद्राला भेट दिली. त्यांचे अर्थकारण समजून घेतले. त्यानंतर स्वतःच्या घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये २०२० मध्ये अळंबी उत्पादनाला सुरुवात केली.

कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रथम रेषीय प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून कविताताईंना स्पॉन देण्यात आले. पहिल्या वर्षी त्यांनी ७० अळिंबी बेड भरले. त्यानंतर प्रत्येक वर्षी १०० ते २०० बेड याप्रमाणे वाढ करत गेल्या. सध्या त्यांच्याकडे अळिंबी उत्पादनासाठी १०० बेड आहेत.

अळिंबी उत्पादनासाठी शेडमध्ये आर्द्रतायुक्त वातावरण तयार केले. बेड ठेवण्यासाठी त्यांनी कमी खर्चामध्ये दोरीचे शिंकाळे तयार केले. अळिंबी उत्पादनासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये निर्जंतुक केलेले सोयाबीन कुटार भरले जाते. प्रत्येक थरानंतर अळंबीचे स्पॉन टाकले जाते. त्यानंतर बॅगचे तोंड बांधून टाचणीच्या साह्याने छिद्रे पाडून शिंकाळ्यामध्ये लटकवून ठेवण्यात येते.

शेडमध्ये आर्द्रता ८० टक्के आणि तापमान २० ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवले जाते. तापमान नियंत्रणाकरिता शेडच्या पत्र्यावर शेडनेट लावले आहे. शेडच्या आतमध्ये फॉगर बसविलेले आहेत. साधारणपणे २० ते २२ दिवसांनंतर प्लॅस्टिक पिशवीला असलेल्या छिद्रातून अंकुर बाहेर येण्यास सुरुवात होते.

साधारणपणे दीड महिन्यात अळिंबीची पाच ते सात वेळा काढणी होते. एका बेडपासून एक किलो उत्पादन मिळते. तयार झालेली अळंबी पिशवीत पॅक केली जाते. अळिंबी उत्पादनानंतर बेड फेकून न देता गांडूळ खत निर्मितीसाठी वापरण्यात येतात. सध्या गांडूळ खत युनिटमधून व्हर्मिवॉश निर्मिती होत आहे. पन्नास रुपये प्रति लिटर या दराने परिसरातील शेतकऱ्यांना व्हर्मिवॉश विक्री होते. येत्या तीन, चार महिन्यांत गांडूळ खताची विक्री सुरू होणार आहे.

पावडर, चॉकलेट उत्पादन ः
केवळ ताज्या अळिंबीच्या उत्पादनावर न थांबता कविताताईंनी पावडर निर्मितीला सुरुवात केली. एकूण उत्पादनापैकी ३० टक्के अळिंबी ताज्या स्वरूपात पॅकिंग करून विकली जाते. उर्वरित ७० टक्के अळिंबी वाळवून त्यापासून पावडर तयार केली जाते.

ही पावडर चॉकलेट निर्मितीसाठी वापरली जाते. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ताजी अळंबी, अळंबी पावडर आणि चॉकलेट उत्पादनांची एफएसएसएआयमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. येत्या काळात अळिंबी पावडरचा वापर करून बिस्किटे निर्मितीचे नियोजन त्यांनी केले आहे.
ताज्या अळंबीला ३०० रुपये प्रति किलो आणि वाळविलेल्या अळंबीला साधारणपणे १२०० रुपये प्रति किलो दर मिळतो.

ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन वाळविलेल्या अळिंबीचे ५० ग्रॅम पॅकिंग १०० रुपये या दराने विकले जाते. बाजारपेठेत अळिंबी चॉकलेटची पाच रुपये प्रति नग या दराने विक्री होते. एका वर्षात कविताताईंनी अळंबी तसेच मूल्यवर्धित पदार्थांच्या विक्रीतून पन्नास हजारांची उलाढाल केली आहे.

प्रदर्शन, दुकानदारांना अळिंबी विक्री ः
कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे) येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कविताताईंनी दारव्हा, वाशीम, अकोला, यवतमाळ येथील प्रदर्शनामध्ये सहभागी होत ताजी अळिंबी, पावडर तसेच चॉकलेट विक्रीस सुरुवात केली. याचबरोबरीने व्हॉट्‍सअॅप ग्रुपवरून देखील उत्पादनांची विक्री केली जाते. सध्या दारव्हा, नेर आणि यवतमाळ शहरातील हॉटेल, किराणा दुकान, पान टपरी, फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांना ताज्या अळंबीचा पुरवठा केला जातो.
----------------------------------------------
संपर्क ः - कविता येवले, ९३०७७४८४५९
- वासुदेव चांदूरकर, ७९७२१६२९६७
(विषय विषयज्ञ, विस्तार शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), ता. दारव्हा, जि. यवतमाळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT