Care Of Cow Calf In Monsoon  Agrowon
ॲग्रो विशेष

Calf Management : नवजात वासरांचे आहार व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. महेश जावळे,ऋषिकेश नाकोड,ओम जुनारे

Calf Diet Management :
लहानपणापासूनच वासरांच्या आहाराचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्यांची निकोप वाढ होऊन ते उत्पादनक्षम होऊ शकतात. कारण आजची वासरे पुढील उत्पादन देणारी गाय किंवा उच्च प्रतीचा वळू होऊन पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास नक्कीच मदत होते.

वासरू मातेच्या गर्भाशयात वाढत असते, त्यावेळेपासूनच त्याची योग्य निगा राखल्यास भरपूर आर्थिक फायदा मिळविता येतो. वासरू जन्मल्यानंतर सुरवातीचा जवळपास ३ ते ४ महिन्याचा कालावधी हा वासरांसाठी संक्रमणाचा काळ असतो. दुभत्या पशूंचे वासरू प्रथम एकेरी पोटाचे असते. वय वाढत जाईल तसे एकेरी पोटाचे रूपांतर चार भागांत होण्यास सुरवात होते. यास जवळपास ३ ते ४ महिन्याचा कालावधी लागतो. वासरांसाठी हा संक्रमणाचा काळ असतो. सुरवातीच्या पहिल्या तीन महिन्यात वासरांमध्ये मरतुकीचे प्रमाण ५० ते ६० टक्के असते. त्यामुळे सुरवातीच्या पहिल्या तीन महिन्यात वासरांचे आहार व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. नवीन जन्मलेल्या वासरांवर पुढील पिढी अवलंबून असते. अनेक पिढ्यांच्या नियोजनबद्ध प्रजननानंतर जातिवंत गायींची पैदास शक्य होत असते. त्यामुळे जन्मापासूनच वासरांचे पोषण आणि व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

वासरू संगोपनात चिकाचे महत्त्व ः
१) गाय व्यायल्यानंतर पहिले २ ते ३ दिवस घट्ट व पोषक दूध देते त्याला चीक असे म्हणतात.
२) दुभत्या जनावरांच्या वासरांमध्ये सुरवातीचे १८ ते २१ दिवस कोणत्याही प्रकारची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती नसते. 
३) वासरू जन्मल्यानंतर सुरवातीच्या ४ ते ६ तासांत आतड्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक आहे तसे मोठ्या प्रमाणात शोषले जातात. त्यामुळे त्या काळात पुरेशा प्रमाणात चीक पाजणे गरजेचे आहे.
४) चिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण (साधारणपणे १५ टक्के) साध्या दुधापेक्षा खूप जास्त असते. या प्रथिनांमध्ये मुख्यत्वेकरून ग्लोब्युलिन असते, चिकात असलेले अँटीबॉडीज वासराला गाईकडून मिळालेली तयार रोगप्रतिकारशक्ती देतात. नवजात वासरांच्या शरीरात ही तत्त्व नसतात, त्यामुळे त्यांना चीक पाजलाच पाहिजे.
५) वासराच्या वाढीला लागणारे जीवनसत्वे आणि खनिजे चिकात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.
६) वासराच्या आतड्याच जमा झालेली विष्टा व चिकट पदार्थ बाहेर काढण्यासाठी व पोट साफ करण्यासाठी चीक मदत करते.

चीक पाजण्याचे प्रमाण ः
१) वासरू जन्मल्यानंतर पहिल्या तासात दीड-दोन लिटर चीक पाजणे आवश्यक आहे व पुढील चार ते पाच तासांनी पुन्हा एक ते दीड लिटर चीक पाजावा. सुरवातीच्या २४ तासात वासराच्या वजनाच्या १० टक्के चीक पाजावा.
२) चिकयुक्त दूध जास्त प्रमाणात पाजू नये, कारण त्यामुळे अपचन होऊन अतिसार होण्याचा धोका संभवतो.
३) बहुतांश शेतकऱ्यांचा असा समज आहे की, वार पडेपर्यंत चीक पाजणे चुकीचे आहे परंतु असे न करता वासरू उभे राहिले की लगेच चीक पाजावा.
४) पारंपारिक पद्धतीनुसार चीक गायीच्या कासेला पाजले जाते. वासरू जर सरळ कासेतून चीक पीत असेल तर गाईस पहिला माज येण्यास उशीर होतो म्हणून शक्यतोवर चीक निप्पल असलेल्या बाटलीने पाजावा.
बाटलीने चीक पाजत असताना चिकाचे तापमान शरीराइतके असले पाहिजे.त्यामुळे चीक काढल्यानंतर लगेच वासरांना पाजावा.

कृत्रिम चीक ः
१) जर गाय आजारी असेल, विताना दगावली असेल, गाईस कासदाह असेल तर वासराला नैसर्गिक चीक मिळू शकत नाही.अशावेळी आपण त्याच वेळेस त्याच गोठ्यातील विलेल्या दुसऱ्या गाईचा चीक किंवा कृत्रिम चीक तयार करून पाजावा.
घटक ः

१) एक लिटर उकळून थंड केलेले दूध.
२) एक संपूर्ण अंडे.
३) ३ते ५ मिलि एरंडेल तेल.
४) १००० आययू जीवनसत्त्व अ.
५) २५० मि.ग्रॅ. शिफारशीत ॲन्टीबीओटीक, प्रोबायोटिक किंवा प्रीबायोटिक
सर्व घटक एका स्वच्छ भांड्यात एकजीव करून लगेच वासराला पाजावेत.पशुआहार तज्ञ किंवा पशुवैद्यकाच्या सल्यानुसार कृत्रिम चीक बनवावा.


आहार व्यवस्थापन ः
चांगली वाढ आणि अधिक प्रतिकारशक्ती येण्यासाठी दूध आणि खुराक यांचा वासरांच्या आहारात समावेश अत्यंत गरजेचे असते. वजन लवकर वाढण्यासाठी रवंथ प्रक्रिया लवकर सुरू होणे आवश्यक आहे.

दुधाचे फायदे ः
१) वासराची सुरवातीची वाढ चांगली होण्यासाठी योग्य प्रमाणात दूध पाजणे गरजेचे आहे. सुरवातीच्या दिवसात वासरामध्ये चारा किंवा इतर आहार पचवण्याची क्षमता नसते. सुरवातीच्या दिवसात वासराच्या पोटाची रचना ही खास दूध पचवण्यासाठी बनवलेली असते.
२) वासराच्या शारीरिक वाढीसाठी लागणारे सर्व घटक दुधामध्ये योग्य प्रमाणात असतात.
३) सुरवातीचे २१ दिवस वासराच्या वजनाच्या १० टक्के दूध दिवसातून २ ते ३ वेळा विभागून पाजले गेले पाहिजे. बाविसाव्या दिवसापासून दुधाचे प्रमाण वासराच्या वजनाच्या १/१५ करून १०० ग्रॅम काल्फ स्टार्टर आणि थोड्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा सुका चारा द्यावा. पस्तिसाव्या दिवसापासून २ महिन्यापर्यंत वासराच्या वजनाच्या १/२० (५ टक्के) दूध आणि २५० ग्राम काल्फ स्टार्टर आणि खाईल तेवढा सुका चारा द्यावा.
४) वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून दूध हळूहळू कमी करून ३ महिने होईपर्यंत बंद करावे. याच काळात काल्फ स्टार्टर वाढवून ५०० ग्राम एवढे करावे. सुका चारा मुबलक प्रमाणात द्यावा.

५) पारंपारिक पद्धतीनुसार दूध गायीच्या कासेला पाजले जाते. परंतु, दुग्धव्यवसायात असे करणे शक्य नसल्यामुळे अशा वेळेस दूध रबरी निप्पल असलेल्या बाटलीने पाजावे. कासेला दूध पाजल्यास नैसर्गिक भावना जागृत होऊन वासराच्या तोंडात भरपूर प्रमाणात लाळ तयार होते. दूध सरळ पोटाच्या चौथ्या कप्प्यात जाते. परंतु, या पद्धतीत वासराला दूध मोजून देता येत नाही व गाईला वासराची सवय लागते.
६) रबरी निप्पल असलेल्या बाटलीने दूध पाजल्यास दूध सरळ चौथ्या कप्प्यामध्ये जाते. वासराला नैसर्गिकरित्या दूध पिल्याची जाणीव होते. या पद्धतीत दूध मोजून पाजता येते, गाईला व वासराला एकमेकांची सवय होत नाही.
७) जमिनीवरून बादलीने किंवा टोपल्याने दूध पाजल्यास ते पोटाच्या पहिल्या कप्प्यात (रूमेन) मध्ये जाते व दुधाचे योग्य पचन होत नाही म्हणून दूध निप्पल असलेल्या बाटलीनेच तोंडा एवढ्या उंचीवरून पाजल्यास ते पोटाच्या चौथ्या कप्प्यामध्ये जाते,तेथे त्याचे योग्य पचन होते.


पाण्याचे नियोजन ः
१) बरेचसे पशुपालक वासरांना पहिले २ ते ३ महिने पाणी पाजत नाहीत. वासरांच्या वाढीसाठी आणि कोठी पोटातील किण्वन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी पाचव्या दिवसापासून पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
२) पाणी व दूध हे वासराला वेगवेगळ्या भांड्यातूनच पाजावे जेणेकरून वासराला पाणी व दूध यामधील फरक कळेल, वासरू गरजेपेक्षा जास्त पाणी पिणार नाही.
३) वासरांना स्वच्छ पाणी नेहमी उपलब्ध असल्यास काल्फ स्टार्टर सेवन वाढते. वजन वाढीवर अनुकूल परिणाम दिसून येतो.
४) दूध पाजण्याअगोदर एक तास पाणी देऊ नये. दूध पाजल्यानंतर पाणी दोन तासांनी द्यावे.
५) पाण्याचे तापमान हे वासराच्या शरीराच्या तापमानाएवढेच असावे. त्यासाठी हिवाळ्यात पाणी थोडे कोमट करून द्यावे. उन्हाळ्यात थंड पाणी द्यावे.
६) पाणी आणि पिण्याचे भांडे दोन्हीही स्वच्छ असावे, जेणेकरून घाण वासराच्या पोटात जाणार नाही. वासराला आजार होणार नाही.

मिल्क रिप्लेसर ः
१) वासराला पिण्यासाठी दुधाला पर्याय म्हणून किंवा काही प्रमाणात दुधाची मात्रा कमी करून दुधाऐवजी दूध भुकटी आणि इतर अन्नघटक एकत्रित करून तयार केलेल्या कोरड्या व पावडर स्वरूपातील मिश्रणाला मिल्क रिप्लेसर असे म्हणतात.
२) मिल्क रिप्लेसर पाण्यात मिसळून वासरांना दिले जाते. मिल्क रिप्लेसर दुधासारखेच पौष्टिक असते.
वासरांच्या पचनसंस्थेची भौतिक व शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी मिल्क रिप्लेसर उत्तम असते. मिल्क रिप्लेसर दुधाच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्यामुळे दुधाची बाजारात विक्री करून पशुपालकास आर्थिक फायदा होतो.

काफ स्टार्टर ः
१) काफ स्टार्टर हे वासरांचा बालआहार असून दूध किंवा इतर पातळ पदार्थांवर वाढणाऱ्या वासरांसाठी पूरक पोषकद्रव्ये यांचे घन स्वरूपातील मिश्रण आहे.
२) यामध्ये मुख्यतः मका किंवा ओट्ससारखी धान्ये, तेलबिया आणि इतर धान्यापासून बनवलेले तसेच जीवनसत्वे, खनिजे, प्रतिजैविके यांचे मिश्रण असते.
३) दर्जेदार मिश्रखाद्यात ७५ ते ८० टक्के एकूण पचनीय घटक आणि २२ ते २५ टक्के प्रथिने असावे. वासरांना काफ स्टार्टर वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते चार महिने वयापर्यंत द्यावे. यामुळे वासरांचे कोठीपोट लवकर कार्यान्वित होण्यास मदत होते आणि रवंथ प्रक्रिया लवकर सुरू होण्यास मदत होते.
४) काफ स्टार्टरची सुरवात १०० ग्रॅमपासून करून हळूहळू प्रमाणात वाढ करून चौथ्या महिन्यापासून वासरांना प्रती दिन दोन किलोपर्यंत काफ स्टार्टर देता येते.


सुका चारा ः
१) वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून वासरांना सुका चारा दररोज देण्यास सुरवात करावी. हळूहळू चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
२) सुक्या चाऱ्यात तंतुमय पदार्थ अधिक असल्याने पचनासाठी कोठीपोटातील स्नायूंची कार्यक्षमता वाढून रवंथ प्रक्रिया लवकर सुरू होण्यास मदत होते.
३) सुका चारा हा उच्च प्रतीचा, रंग व चव चांगली असलेला असावा. त्यात धूळ, काळेपणा किंवा बुरशी नसावी व लुसलुशीत काड्या असाव्यात.
४) वासरांना मेथीघास, बरसीम सारखा गवताचा सुका चारा वासरे आवडीने खातात.

हिरवा चारा ः
१) वासरांना वयाच्या तिसऱ्या आठवड्यापासून थोडा हिरवा चारा देण्यास सुरवात करावी. वयानुसार हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
२) सहाव्या महिन्यात प्रती दिन ५ ते १० किलो हिरवा चारा देता येईल. चांगल्या प्रतीचा एकदल आणि द्विदल चारा द्यावा, जेणेकरून वासरांची वाढ जोमाने होईल.

आरोग्य व्यवस्थापन ः
१) गोचीड निर्मूलन आणि वासरांचा थंडी व वाऱ्यापासून बचाव या सोबतच पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वासरांना लिव्हर टॉनिक, जीवनसत्त्व टॉनिक, जंतनाशक औषधे द्यावीत. तसेच गोठ्यात खनिज मिश्रणांच्या चाटण विटा वापराव्यात, जेणेकरून त्यांचे आरोग्य निरोगी राहील.
२) वासरांच्या वजनाची नियमित नोंद घ्यावी.
--------------
संपर्क ः डॉ. महेश जावळे, ९२७३७३००१५
(सहाय्यक प्राध्यापक पशुपोषण शास्त्र विभाग,नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT