Dairy Farming Success Story : ग्राहकांच्या विश्‍वासाच्या बळावर दुग्धव्यवसायात यश

Dairy Business : पुणे शहरातील उपनगर असलेल्या उंड्री येथील दीपक बांदल यांनी दुग्धोत्पादन व प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीतून या व्यवसायाची वृद्धी केली आहे.
Dairy Farming
Dairy FarmingAgrowon
Published on
Updated on

संदीप नवले

Pune News : पुणे शहरातील उपनगर असलेल्या उंड्री येथील दीपक बांदल यांनी दुग्धोत्पादन व प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीतून या व्यवसायाची वृद्धी केली आहे. सुमारे शंभर म्हशी व २५ गायींच्या सुसज्ज गोठ्यात सर्व पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. ग्राहकांमध्ये तयार केलेल्या विश्‍वासाच्या बळावर व्यवसायातून महिन्याला सुमारे १२ लाखांची उलाढाल ते करू लागले आहेत.

पुणे शहरातील उपनगर म्हणून उंड्री हा भाग अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. उंड्री गावात दीपक निवृत्ती बांदल यांचे घर आहे. त्यांची सात ते आठ एकर शेती आहे. परंतु केवळ शेतीवर अवलंबून न राहाता व्यवसायाचे विविध मार्ग शोधून उत्पन्नाचे स्रोत या कुटुंबाने वाढवले आहेत. दीपक यांचा ‘स्टोन क्रशिंग’ चा देखील व्यवसाय आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या दुग्ध व्यवसायात देखील त्यांनी चांगले पाय रोवले आहेत. वडील पूर्वी दहा ते बारा म्हशींचे संगोपन करायचे. त्यावेळी घरगुती पद्धतीने दुधाची विक्री व्हायची. ग्राहकांचा चांगला विश्वास त्यांनी कमावला. त्यानंतर व्यवसायात वृद्धी करण्याचे ठरवले. टप्प्याटप्प्याने म्हशींच्या संख्येत वाढ करीत आजमितीला त्यांची संख्या १०० पर्यंत (मुऱ्हा व जाफराबादी) आहे. सुमारे २५ गायी देखील आहेत.

Dairy Farming
Mango Cashew Crop Insurance : आंबा, काजू बागायतदारांना विम्याच्या ८३ कोटींची प्रतीक्षा

गोठा व्यवस्थापन

सध्या पाऊण एकरात गोठा आहे. दुभत्या, कमी दुधाच्या व भाकड म्हशी अशा तीन शेडसमध्ये गोठ्याचे वर्गीकरण केले आहेत. जनावरांची नोंद ठेवण्यासाठी त्यांच्या कानाला बॅचेस लावले आहेत. पारड्यांना गोठ्याच्या मध्यभागी ठेवले जाते. पहाटेपासून कामास सुरवात होते. गोठा साफ करणे, खाद्य- कुट्टी नियोजन अशी कामे होतात. सकाळच्या टप्प्यात दुधाची काढणी झाल्यानंतर त्याचे संकलन व पुढील प्रक्रिया होते. सकाळी सात ते १० वाजेपर्यंत जनावरांना पाणी पाजून गोठा पाण्याने स्वच्छ धुऊन घेतला जातो. त्याचवेळी म्हशीही धुतल्या जातात.

पुन्हा दुपारी तीननंतर दुसऱ्या सत्रातील कामास सुरवात होते. संध्याकाळी चारनंतर दुधाची काढणी होते. जवळपास अडीच तासांमध्ये दूध काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. ऊस, मका, सोयाबीन भुसा, ज्वारी कडबा अशा विविध चाऱ्याचा वापर होतो. दररोज सुमारे चार टन चाऱ्याची गरज भासते. गरजेनुसार तो विकतही घेण्यात येतो.

गोठ्यात सुरक्षिततेसाठी १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. गोठा धुतल्यानंतर हे पाणी सिमेंटच्या टॅंकमध्ये साठवले जाते. मोटरच्या साहाय्याने ते शेताला देण्याची व्यवस्था केली आहे. प्रक्रिया व्यवसायाच्या जबाबदारीसह गोठा व्यवस्थापन देखील दीपकच पाहतात. मात्र तेथील दैनंदिन कामांसाठी उत्तर प्रदेश, बिहार आणि कोल्हापूर येथून सुमारे १५ कामगार तैनात केले आहेत. त्यांची राहण्याची सोय गोठ्याजवळच केली आहे.

Dairy Farming
Solapur-Tuljapur Highway : सोलापूर-तुळजापूर मार्गावरील वाहतूक मार्गात बदल

गुणवत्तेच्या जोरावर वाढवली उलाढाल

दूध पुरवठ्यातील सातत्य, पदार्थांची उत्तम गुणवत्ता आणि नैसर्गिक चव या बळावर बांदल यांच्या ‘गुरूकृपा डेअरी’ ने आज महिन्याला साडे ११ लाख ते १२ लाखांच्या उलाढालीपर्यंत मजल मारली आहे. आई- वडिलांसह परिवारातील सर्वांची मोलाची साथ त्यांना लाभत आहे.

प्रक्रिया व्यवसायात मजूर, वाहतूक खर्च, पॅकेजिंग मटेरिअल, वीज, कच्चा माल, चारा या बाबीवर मोठा खर्च होतो. महिन्याला सुमारे ४० ते ४५ ट्रेलर शेणखत मिळते. ते चांगल्या प्रकारे वाळवल्यानंतरच जवळपास वर्षाने त्याची विक्री प्रति ट्रेलर तीन हजार रुपये दराने केली जाते. महिन्याला एकूण व्यवसायातून २० टक्के नफा मिळतो.

प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती

सुरवातीच्या काळात दुधाची थेट विक्री केली जायची. परंतु वाढते शहरीकरण व ग्राहकांची गरज लक्षात घेऊन प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचे ठरविले. सध्या दररोजचे एकूण दूध संकलन ७०० ते ८०० लिटरपर्यत आहे. पाचशे लिटरपर्यंत दुधाची विक्री होते. सकाळी व संध्याकाळी दूध थंड केले जाते. त्यासाठी ५०० लिटर क्षमतेचा फ्रिज घेतला आहे.

उर्वरित दुधापासून लस्सी, दही, पनीर, बासुंदी, खवा, श्रीखंड, आम्रखंड, पेढे, मोदक आदी पदार्थांची निर्मिती होते. दर महिन्याला ढोबळमानाने सांगायचे तर श्रीखंड १२० किलो, आम्रखंड ११०, बासुंदी १५० किलो, तूप २५० किलो, पेढे ७० किलो, दही १००० किलो, ताक २०० लिटर, खवा १५० किलो, मलई बर्फी २०० किलो, पनीर ४५० किलो एवढे उत्पादन होते. पदार्थाचा प्रकार व पॅकिंगनुसार प्रति किलो २० रुपयांपासून ६४० रुपयांपर्यंत दराने त्यांची विक्री होते.

ग्राहकांमध्ये या पदार्थांविषयी विश्वासार्हता निर्माण झाली आहे. सध्या दूध थंड करणे, खवा तसेच लस्सी निर्मिती व त्याचे कप पॅकिंग, तूपनिर्मितीसाठी क्रीम सेपरेटर, त्याचे पॅकिंग आदींसाठी यंत्रे आहेत. वाहतुकीसाठी एक वाहन देखील आहे. उंड्री येथेच ‘आऊटलेट’ तयार केले आहे. त्यामाध्यमातून थेट ग्राहकांनाच विक्री केली जाते. दूध ७४ रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. कोजागरीच्या काळात दुधाला अधिक व काही प्रमाणात खव्याला मागणी असते. मात्र त्यासाठी बाहेरून ते न घेता दोन दिवस आधी पदार्थांची निर्मिती थांबवून त्या दुधाचा पुरवठा ग्राहकांना केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com