Amarvel Agrowon
ॲग्रो विशेष

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Team Agrowon

डॉ. व्ही. व्ही. गौड

Integrated Management Practices : अमरवेल हे कंदमुळे वर्गातील, पर्णहीन पिवळसर रंगाचे तण आहे. या तणाच्या सुमारे १७० प्रजाती आहेत. हे तण पूर्ण परोपजीवी असून, द्विदल तणांवर, वनस्पतींवर अवलंबून राहते. परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकासोबत द्विदल तणावर जसे की तरोटा, रेशीमकाटा, गोखुरू, हजारदानी, बावची इ.वर देखील स्वतःचे जीवनचक्र पूर्ण करते.

विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येतो. याशिवाय मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो. दरवर्षी सोयाबीन पिकाखालील लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. सोयाबीन पिकातील विविध तणांच्या व्यवस्थापनासाठी तणनाशकांचा वापर प्रभावी ठरत आहे. मात्र मागील काही वर्षांत अमरवेल किंवा अधरवेल या परोपजीवी तणाचा प्रादुर्भाव द्विदलवर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

बाल्यावस्थेत हा वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिटकतो व जमिनीपासून वेगळा होतो. त्यानंतर सूक्ष्म दातासारख्या तंतूंच्या मदतीने त्या वनस्पतीमधील अन्नरस शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त वनस्पतीची वाढ खुंटत जाते. परिणामी, उत्पादनात मोठी घट येते. तणाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त भागात सामूहिकरीत्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

ओळख

अमरवेलाचे बी २० वर्षांहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते. त्यामुळे बीजोत्पादन अवस्थेपूर्वी त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

या तणांच्या बीला उगवणीसाठी अनुकूल १५ ते ३८ अंश सेल्सियस तापमान मिळताच त्याची उगवण होते.

बी आकाराने १ ते १.५ सें.मी. इतके असते. वेल पूर्णतः मूळरहित असून पिवळसर, नारिंगी व पानेरहित दोऱ्यासारखा दिसतो.

मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून २.५ ते ५.० सें.मी. दूरवरील द्विदल वनस्पतीवर चिकटतो. परंतु परिसरात द्विदल वनस्पती नसेल तरी त्याचे रोप ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही.

एक अमरवेल प्रतिदिन साधारण ७ सेंमीपर्यंत वाढून जवळपास ३ चौ.मी. क्षेत्र व्यापते.

साधारणतः ६० व्या दिवसापासून वेलाला बी लागण्याची क्रिया सुरू होते.

या तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे १०० टक्के देखील नुकसान होऊ शकते. मूग व उडीद पिकाचे ३१ ते ३४ टक्के, टोमॅटो ७२ टक्के, हरभरा ८५.७ टक्के व मिरची पिकामध्ये ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट आढळून आली आहे.

व्यवस्थापन

अमरवेल या तणाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सामूहिकरीत्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक, निवारणात्मक उपाय तसेच रासायनिक पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो.

प्रतिबंधात्मक उपाय

पेरणीसाठी प्रमाणित किंवा तणविरहित बियाण्यांचा वापर करावा.

पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.

विशेषतः शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून गाडून किंवा जाळून नष्ट करावे. कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहते.

प्रादुर्भावग्रस्त शेतातील अवजारे स्वच्छ केल्यानंतरच त्यांचा पुन्हा वापर करावा.

निवारणात्मक उपाय

मशागतीय पद्धती

जमिनीची खोल नांगरणी करावी. बियांच्या अंकुराची लांबी कमी असल्याने ८ सें.मी. पलीकडे अमरवेलीची उगवण होत नाही.

जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे. नियमित डवरणी व निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.

पिकांची फेरपालट करावी, प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी.

अमरवेल ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ यजमान झाडाशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे यजमान पिकांची लागवड तणनियंत्रण पद्धतींचा अवलंब केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी करावी.

रासायनिक व्यवस्थापन

सोयाबीन, भुईमूग, कपाशी, तूर, कांदा, मिरची या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक,

पेंन्डीमिथॅलीन (३८.७ टक्के सी.एस.) ३० ते ३५ मिलि प्रति १० लिटर पाणी (एकरी ७०० मिलि प्रति २०० लिटर पाणी) याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी करावी. (लेबलक्लेम आहेत.)

डॉ. व्ही. व्ही. गौड, ८६३७७ ०७६४५

(अखिल भारतीय समन्वित तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT