Aquatic Ecosystem : कांदळवने : एक महत्त्वाची जलीय परिसंस्था

Sea Ecosystem : सागर किनारा ही निसर्गाची एक अजब व सुंदर देणगी आहे. त्यातही सागर आणि नदी यांचा संगमाची जागा निसर्गाची अद्‍भुत रूपे, सौंदर्य प्रतिकृती, जीवसृष्टीची अजब कौशल्ये यांनी परिपूर्ण आणि मोहक असते. नदी जिथे समुद्राला मिळते, तिथे खाड्या असतात. या खाड्यात उभी राहिली आहेत ती कांदळवने!
Aquatic Ecosystem
Aquatic EcosystemAgrowon

सतीश खाडे

Water Ecosystem : भरती, ओहोटीच्या चक्रामध्ये सागरी किनारा नेहमीच अस्थिर असतो. त्यातही सर्वांत जास्त अस्थिर भाग हा कांदळवन न् खाड्यांचा असतो. समुद्रातून भूमीवर आदळणाऱ्या भरतीच्या लाटा फार पुढेपर्यंत मुसंडी मारतात, पुन्हा मागे सरकतात. प्रत्येक लाटेची सीमारेषा वेगळी, सतत बदलणारी असते. खाड्यातील अस्थिरता तर याही पुढे असते. कारण ओहोटीच्या वेळी नदीतून गोड पाणी समुद्राकडे धावते आणि भरतीला समुद्राचे खारेपाणी नदीत शिरते.

म्हणजे येथील पाण्याचा गोडेपणा व खारेपणा सतत बदलत राहतो, इतकी ही अस्थिरता! या अस्थिरतेतही प्रकृती व निसर्ग विविध रूपांनी फुलतो. येथील जिवांनी या अस्थिरतेला तोंड देण्यासाठी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्राप्त केलेली विविध कौशल्ये आणि कसबाने आपण आश्‍चर्याने थक्क होऊन जातो. यात एक वरदान समजावी अशी बाब खाड्यांच्या मुखाशी घडते, ती म्हणजे कांदळवनाची निर्मिती आणि त्यांचे फोफावणे!

नदी पर्वतांवर उगम पावल्यानंतर जमिनीवरील सपाटीवरून वाहताना विविध सेंद्रिय पदार्थ, सजीव आणि त्यांचे अवशेष खाडीत येते. हा सारा बायोमास खाडीत साचतो. तोच सारख्या खाडीतील परिसंस्थेलाच नव्हे, तर खोल समुद्रातील जलचरांसाठीही अन्न म्हणून उपयोगी ठरतो. कांदळवनातील परिसंस्था खूपच समृद्ध असते. या परिसंस्थेला खारफुटीची जंगलांची परिसंस्था असेही म्हणतात. ही परिसंस्था एकपेशीय प्लवंगापासून ते वाघ -सिंहासारख्या अंतिम भक्षकापर्यंतची अन्न मनोरा पूर्ण करते. म्हणूनच तिला सर्वाधिक उत्पादक परिसंस्थेपैकी एक परिसंस्था मानले जाते.

कांदळवनातील वनस्पती व त्यांचे वैभव

कांदळवनातील वनस्पती आणि त्यांचे सर्वच अवयव वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मुळात दलदलीत आणि खाऱ्या जमिनीत ही झाडे उगवतात, वाढतात, फळतात. समुद्राचे मीठ पचवून ही परिसंस्था सर्व जिवांना गोड, उपयुक्त व पोषक उत्पादन उपलब्ध करून देतात. कांदळवनातील झाडांची मुळे दलदलीत व त्या खालील पाण्यात असली तरी ती वादळातही

उद्ध्वस्त होत नाहीत की लाटांच्या माऱ्याने वाहूनही जात नाहीत. कारण सर्व झाडांची मुळे एकमेकांत मिसळून जाळी तयार करतात. एकमेकांच्या आधाराने भक्कमपणे उभी असतात. म्हणूनच त्यांना ‘तरंगती जंगले’ असेही म्हणतात. दलदलीत मुळांना श्‍वास घेता येत नाही, म्हणून त्यांच्या मुळांची टोके जमिनीतून वर आकाशाच्या दिशेने काही उंचीपर्यंत वाढतात. त्यावरच्या छिद्रांद्वारे श्‍वसन करतात. खारफुटी झाडांच्या पानावरील क्षारग्रंथीद्वारे मुळांनी शोषलेल्या पाण्यात असलेले जास्तीचे मीठ बाहेर टाकतात.

Aquatic Ecosystem
Agriculture Ecosystem : शेती ही मानवनिर्मित परिसर संस्था

यामुळेच या पानांवर कायम मिठाच्या स्फटिकांचे पांढरे थर दिसतात. या बहुतेक झाडांची फळे ही झाडावरच रुजतात. त्यातील बियांना झाडावरच अंकुर फुटतात. हे अंकुर बरेच महिने आहे त्या अवस्थेत राहू शकतात. खाडीतील पाण्याची क्षारता कमी झाल्यावरच झाड स्वतःहून हे अंकुरलेले बीज स्वतः फळापासून अलग करते आणि खाली टाकते. या अंकुरातूनच पुढे रोप तयार होते. त्याचे झाड होते.

खारफुटीच्या वनस्पतीच्या एकूण १९ प्रजाती असून ३३४ प्रकारच्या वनस्पती असतात. या परिसंस्थेत आजवर नोंदल्या गेलेल्या शेवाळांचे १६५ प्रकार असून, १३ प्रकारचे ऑर्किडही आहेत. अनेक वैशिष्ट्यपूर्ण झाडांबरोबरच मोरिंडा नावाची ही झाडे असतात. ही फळे बटाट्याच्या आकाराची अन् दुधी रंगाची असून, दिसायलाही वैशिष्ट्यपूर्ण असतात. याला भारतीय तुती, बीच मलबेरी, बालतोंडी, चीजफळ अशी विविध नावे आहेत. अशाच अनेक झाडांची पाने, फळे, फुले हे विविध प्राण्यांचे आवडते खाद्य असल्याने कीटकांपासून ते हरिण, वाघापर्यंत सर्व प्रकारचे प्राणी या कांदळवनात आढळतात. पश्‍चिम बंगालमधील सुंदरबन हे कांदळवन अशा जैवविविधतेसाठी आणि विशेषतः पट्टेरी बंगाली वाघांबाबत

जगप्रसिद्ध आहे. उत्तम पोषणमूल्य असलेला कांदळवनाचा गाळ हा एकपेशीय प्लवंगापासून शेकडो जातीच्या माशांपर्यंत आणि कालवं शिंपल्यांपासून खेकड्यांपर्यंत, इतकेच काय मगरी आणि सुसरीपर्यंत अनेक प्रकारच्या जलचरांचे जन्मस्थान आणि संगोपन स्थळ आहे. इथे येऊन हे जलचर अंडी घालतात. बाहेर पडणाऱ्या पिलांसाठी खूप अन्न इथे मिळते. या प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणीही कांदळवनात वावरतात. झाडांची फळे, खाडीच्या पाण्यातील

मासे व जलचर अशी बरीच मेजवानी असल्याने कांदळवनात पक्ष्यांचीही संख्या खूप असते. शेकडो प्रजातींच्या स्थानिक पक्ष्यांबरोबरच स्थलांतरित पक्ष्यांसाठी ही कांदळवने खूप मोठ्या प्रमाणात आश्रयस्थानाची भूमिका बजावतात. म्हणून कांदळवन ही परिसंस्था वर्गीकरणामध्ये अतिउत्पादक या सदरामध्ये येते.

Aquatic Ecosystem
River Ecosystem : समजून घेऊ नदीची परिसंस्था

कांदळवनांचे निसर्गाला फायदे

कांदळवनांमुळे किनारपट्टी परिसराचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होते. सर्वप्रथम म्हणजे जमिनीची धूप होऊन गाळ समुद्रात जाण्यापासून वाचतो. समुद्रकिनाऱ्यावर आदळणाऱ्या वादळांना अंगावर झेलून वाऱ्याची शक्ती व वेग कमी करण्याचे काम कांदळवने करतात. या सर्व बाबींचा अनुभव गेली शेकडो वर्ष येत आहे. त्सुनामी व तत्सम आपत्तीमध्ये समुद्रात उठलेल्या महाप्रचंड लाटांपासूनही कांदळवनांमुळेच किनारपट्टीचे रक्षण होते.

या इतकेच महत्त्वाचे म्हणजे पाण्याबरोबर वाहून आलेल्या सर्व सेंद्रिय पदार्थांचे अगदी जटिल सेंद्रिय पदार्थांचे पूर्ण विघटन होऊन पुन्हा निसर्गात मिसळण्याची प्रक्रिया इथेच होते. याच अर्थाने समुद्रासाठी ती मोठी गाळणी ही आहे. याहीपेक्षा महत्त्वाची मदत कांदळवने करतात, ती कार्बन स्थिरीकरणाची. हवेतील कर्ब वायू शोषून कार्बन जमिनीत स्थिर करण्याची कांदळवनांची क्षमता जमिनीवरील वनांच्या १० पट जास्त आहे.

या सर्वांबरोबरच लेखात वर उल्लेखल्याप्रमाणे जैवविविधतेची समृद्धता ही इथे खूप मोठी जमेची बाजू आहे. संशोधकांच्या मते कांदळवन परिसंस्थेने पुरवलेल्या पर्यावरणीय सेवेची किंमत पैशांमध्ये काढायचे ठरवले तरी ती दर हेक्टरी १.९४ लाख डॉलर (म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये एक कोटी ६१ लाख रुपये) इतकी होते.

कांदळवनांचे माणसाला फायदे

किनारपट्टीवर येणारे वादळ लाटा व जमिनीची धूप यांच्यापासून संरक्षण मिळते. यामुळे होणारी मनुष्यहानी टळते. मालमत्तेचे संरक्षण होते. या जंगलातून इंधनासाठी लाकूड व जहाज बांधणीसाठीचे लाकूड मिळते. येथील झाडांमध्ये असलेली नैसर्गिक रसायने ही त्वचा विकार, पचन संस्थांचे विकार या कर्करोग व उच्च रक्तदाब रोखण्यामध्ये महत्त्वाची ठरतात. त्यामुळे औषधे निर्मितीमध्ये त्यांचा वापर होतो. खाडीतील विविध कालव, खेकडे, मासे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. भारतातील ४० टक्क्यांपेक्षाही अधिक लोकांचे अन्न हे सागरी जीवनावर अवलंबून आहे. जवळ जवळ सर्व सागरी जिवांचे जन्म व संगोपन स्थान हे कांदळवन आहे.

भारतातील किनारपट्टीच्या गुजरात ते केरळ आणि तमिळनाडू ते ओडिशापर्यंतच्या सात राज्यांत किनारपट्टीवरील कांदळवनांचे एकूण क्षेत्र ४९७५ चौ. किलोमीटर आहे. या वनांचा समावेश कायद्याने राखीव वनामध्ये केला आहे. अनेक ठिकाणी कांदळवनांना इजा न पोहोचवता उत्पन्नाचे साधन म्हणून विकसित केले जात आहे. लोकसहभागातून कांदळवनांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे सगळे खरे असले तरीपण शहरांच्या वाढत्या हद्दी कांदळवनांचा वेगाने ऱ्हास करत आहेत, हे दुर्दैव!

सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com