Kajwa Agrowon
ॲग्रो विशेष

Kajwa Mahotsav : काजव्यांना नष्ट करणारा महोत्सव

Nature Condition : निसर्गामध्ये मानवी मन प्रफुल्लित होते. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनाच्या निमित्ताने लाखो लोक बाहेर पडताहेत. पर्यटकांच्या अति उत्साहाने निसर्गातील जैवविविधतेला धोका पोहोचून एकंदरीत पर्यावरण धोक्यात येत आहे.

Team Agrowon

डॉ. चंद्रशेखर पवार डॉ. सतीश पाटील

पूर्वार्ध

Threat to Biodiversity in Nature : पावसाळा सुरू झाला की निसर्गामध्ये विस्मयकारक बदल घडून येतात. हा बदल अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी ते जून-जुलै या महिन्यांमध्ये राज्यातील बहुतांश धरणांच्या साठवण क्षेत्रात (बॅक वॉटर) काजवा महोत्सव साजरा केला जातो. शास्त्रीयदृष्ट्या अति पर्यटन हे निसर्गाच्या साखळ्यांवरती वेगाने परिणाम करत आहे. निसर्गाच्या साखळ्या वेगाने नष्ट होत आहेत. काही दिवसांपूर्वी भंडारदरा धरणालगत असणाऱ्या सांधण व्हॅलीमध्ये पायी चालणाऱ्या पर्यटकांच्या अति उपस्थितीमुळे ट्रॅफिक जाम झाल्याचा फोटो वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होता. यावरूनच येथील नियंत्रणाबाहेर गेलेल्या पर्यटनाचा अंदाज येतो.

पर्यावरणीय संवेदनशील अभयारण्य

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कळसुबाई, हरिश्‍चंद्रगड, रतनगड वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ३७६.७१ स्क्वेअर किलोमीटर इतके विस्तारले आहे. हे वन्यजीव क्षेत्र बिबट्या, शेकरू, रानडुक्कर, खवल्या मांजर, तरस, काळा ससा इ. स्थानिक वन्यजीवांनी समृद्ध केले आहे. जवळपास अशाच १३० पक्ष्यांच्या प्रजाती, ९३ सरपटणारे वन्यजीव, २१ प्रकारच्या सस्तन प्राण्यांची नोंदणी येथे केली गेली आहे.

नुकत्याच पालीच्या प्रदेशानिष्ट दोन नवीन प्रजाती नोंदविल्या आहेत. या संशोधनात अक्षय खांडेकर, प्रा. डॉ. सुनील गायकवाड, तेजस ठाकरे, ईशान अगरवाल, सत्पाल गंगलमाले आणि सौरभ किनिंगे यांचा सहभाग आहे. नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजातींचा समावेश ‘निमास्पिस’ या कुळामधे केला आहे. गोल बुबुळे हे निमास्पिस या कुळातील शोधलेल्या पालीचे नामकरण ‘निमास्पिस बेसाल्टीकोला’ असे करण्यात आले आहे. पर्यटकांच्या अति उत्साहाने अशा अनेक दुर्मीळ प्रजाती धोक्यात येण्याची शक्यता वाढते आहे.

या वन्यजीव अभयारण्यामध्ये हिरडा, जांभूळ, चांदवा, बहावा, कुंभळ, गुळचावी, कुडल, शिरस, खारवेल, करप, अवळी, अशिंड, लोखंडी, बेहडा ई महत्त्वाच्या वनस्पती आढळतात. याशिवाय मंदार, कढीपत्ता, घाणेरी, चिलार, पार, जांभूळ, कारवी, करवंद, बोर, धायटी, रामेथा ई देशी- विदेशी झाडांची दाटीवाटी दिसून येते. आजूबाजूच्या परिसरातील अकोले, जुन्नर या तालुक्यांमध्ये असणारी भात व कांदा शेती यामुळे वन्यजीव हे रतनगड, हरिश्‍चंद्रगड आणि कळसूबाईच्या डोंगरांमध्ये स्थिरावतात.

भंडारदरा धरणातील पाणीसाठा या वन्यजिवांसाठी महत्त्वाचा ठरतो याशिवाय या पाणीसाठ्यामुळे अनेक अन्न साखळ्या या परिसरात कार्यरत आहेत. विशेषतः भंडारदरा परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांचा कल हा रात्री मुक्कामी येण्याचा असतो. याशिवाय रात्री उशिरापर्यंत नाचगाण्यांचा कार्यक्रम, तंबूत राहणे, शेकोटी करणे, मद्यपान आदी गोष्टी राजरोसपणे सुरू आहेत. वन्यजीव शक्यतो रात्रीचे बाहेर पडत असल्याने या वन्यजीवांना या पर्यटकांचा भला मोठा त्रास सहन करावा लागतो. याशिवाय या परिसरात अनेक अशा दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, मात्र त्या व्यवस्थित झाकल्या जातात. हे पर्यटन निश्चितपणाने विघातक स्वरूपाचे आहे.

काजवा महोत्सव

भंडारदरा परिसरातील पुरुषवाडी, रतनवाडी, घाटघर, उंडावणे, पांजरे, मुरशेत, मुदखेल, कोळटेंभे, भंडारदरा, चिंचोडी आदी गावांमध्ये दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये काजवा महोत्सवासाठी लाखो पर्यटक भेट देतात. यामध्ये मुंबईसह राज्यातील अनेक भागांतील पर्यटक हा उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी येतात. हेमंत घाटे या पर्यावरणवाद्याने येथील काजव्याच्या प्रजातीचे नामकरण केले आहे. त्यास प्राणी शास्त्रीय वर्गीकरणानुसार अब्स्कॉनडेटा स्पेशिज असे म्हणतात. एक जून २०००, २३ ते २८ मे २०२१ आणि १४ मे ते १९ मे २०२१ या अनुक्रमे निसर्ग, यास आणि तोक्ते या अरबी समुद्रातील वादळांमुळे प्रचंड नुकसान झाले. तीनही वादळांच्या तारखा पहिल्या, तर या सर्वसाधारण काजव्यांच्या मीलन काळात घडलेल्या दिसतात. नैसर्गिक चक्रांबरोबर, मानवी हस्तक्षेप हा काजव्यांच्या विनाशाबाबत महत्त्वाचा ठरत आहे.

नैसर्गिक आधिवास अन् निसर्ग सहसाखळी

मी २०२१ या वर्षी या परिसरातील काजव्यांच्या प्रजातींवरती संरक्षणाच्या अनुषंगाने संशोधन सुरू केले. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांसोबत काही महत्त्वाच्या चर्चा करण्यात आल्या. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, काजव्यांची जास्तीत जास्त संख्या (दाटीवाटी) बोंडरा, हिरडा, सादडा (ऐन), जांभूळ, आंबा, बिचकुट (बहावा), कुरपा या क्रमांकाने आढळते. हा झाडांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांसोबत १ व २ जून २०२१ या दिवसाच्या दोन रात्री सर्वेक्षण करण्यात आले होते.

भंडारदरा धरण क्षेत्राच्या पाणलोटामध्ये असणाऱ्या पाणथळ जागा, खेकड्यांची बिळे, आर्द्रता असणाऱ्या गवताळ जागा या काजव्यांना अंडी घालण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. काजव्यांमध्ये प्रजातीनिहाय जीवनसाखळी ही एक ते दोन वर्षे राहते. भंडारदरा परिसरातील काजव्यांचे जीवनचक्र सात ते आठ महिने राहते. विशेष म्हणजे काजवे हे उपरोक्त नमूद झाडांवरील गोगलगायी मोठ्या प्रमाणामध्ये खातात. निसर्गाने काजव्यांना नरभक्षकाची भूमिका दिली आहे. मॉन्सूनपूर्व काळात बहुतांशी झाडांवर या गोगलगायींची वाढलेली संख्या कदाचित या वनस्पतींना घातक ठरत असेल म्हणूनच की काय, निसर्गाने काजव्यांची निर्मिती केली आहे.

अन्नसाखळी व अन्नजाळीचा हा महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय काजव्यांच्या मादी वैशिष्ट्यपूर्ण अशा पाण्यांच्या डबक्यात अंडी घालतात, ज्यामध्ये खेकडे किंवा मासे यांचे अस्तित्व नसते. ज्यामुळे काजव्यांच्या अंड्यास वर्षभर संरक्षण मिळते. या संकल्पनेस ‘व्हर्णाल पूल’ (Vernal pool) असे म्हणतात. काजव्यांच्या मीलनाच्या काळात काजव्यांच्या शेपटीतून पडणारा शीतल प्रकाश महत्त्वाचा ठरतो. काजवे आपल्या शरीरामध्ये रासायनिक अभिक्रिया सुरू करतात, ज्यामुळे त्यांना प्रकाशित होण्यामध्ये मदत होते.

या परिणामास बायोल्युमिनन्स असे देखील संबोधले जाते. कॅल्शिअम, एडीनोसिन ट्रायफॉस्फेट आणि लुसेफेरीन, (लुसीफेरस या रसायनाच्या संपर्कात) ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया होऊन शीतल प्रकाश तयार होतो. काजवे चमकण्याची प्रक्रिया ही अतिशय क्लिष्ट स्वरूपाची आहे. अलीकडच्या काळातील संशोधनान्वये नायट्रिक ऑक्साइड गॅस हा ---------पासून---------- निर्माण होणाऱ्या प्रकाशाच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो हे सिद्ध झाले आहे.

(संदर्भ - काजवे का व कसे चमकतात- मार्क ब्रानहाम, फ्लोरिडा)

काजव्यांमधील शीतल प्रकाशाच्या तीव्रतेवर नर-मादीचे मिलन ठरते. अशा अधिवासामध्ये म्हणजेच भंडारदरा परिसरात लाखो पर्यटक काजवा महोत्सव पाहण्यासाठी आपल्या वाहनांसोबत प्रवेश करतात. याशिवाय चमकलेले काजवे पाहण्यासाठी व फोटोग्राफीसाठी आपल्या वाहनांच्या लाइट्स सुरू ठेवतात. यामुळे काजव्यांची नैसर्गिक मिलनाची प्रक्रिया खंडित होते. याशिवाय धरण परिसरातील बऱ्याच गावांमध्ये विजेची गरज महाराष्ट्र शासनाच्या वतीने भागविण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस हा दिव्यांचा प्रकाश व घरातील लाइट्स काजव्यांना आकर्षित करतात. त्यामुळे बऱ्याचशा काजव्यांचा मृत्यू होतो, हा आमचा तिथला अनुभव आहे. काजव्यांचा अधिवास हा ऑक्सिजनयुक्त क्षेत्र हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. साहजिकच भंडारदरा धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात असणारी वनराई व काजव्यांमुळे ‘ऑक्सिजन क्षेत्र’ म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित करणे गरजेचे आहे.

(डॉ. चंद्रशेखर पवार हे इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे येथे पर्यावरणशास्त्राचे अधिव्याख्याता तर डॉ. सतीश पाटील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथे पर्यावरणशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT