International Biodiversity Day : पर्यावरण संवर्धनासह जैवविविधतेत समृद्धी

Biodiversity Prosperity : ‘नेचर काँझर्व्हेशन सोसायटी ऑफ नाशिक’ या संस्थेने पुढाकार घेत वन विभाग, भारतीय वायू सेना व काही कंपन्यांच्या माध्यमातून येथे काम हाती घेतले. त्यातून सुमारे ३५० एकर क्षेत्रावर विस्तीर्ण वनसंपदा उभी राहिली आहे. यामध्ये वनस्पती, पशू, पक्ष्यांचा अधिवास वाढला आहे. जैवविविधतामुळे बोरगड येथील वन परिसराला राज्यातील पहिला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
Biodiversity Prosperity
Biodiversity ProsperityAgrowon

Environmental Conservation : मूळचे पश्‍चिम बंगाल येथील असलेले आणि आता नाशिककर झालेले निसर्गप्रेमी विश्‍वरूप राहा यांनी १९९४ मध्ये निसर्ग संवर्धनाची चळवळ नाशिकमध्ये सुरू केली. त्यातून पुढे ‘नेचर काँझर्व्हेशन सोसायटी ऑफ नाशिक’ संस्थेची स्थापना झाली. संस्थेने २००५ मध्ये वन विभाग, तुंगलदारा येथील आदिवासी बांधवांचा सक्रिय सहभाग व सामाजिक दातृत्वातून महाराष्ट्रातील पहिले राखीव संवर्धन क्षेत्र तयार करण्याचे हाती घेतले.

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे आर्थिक साह्य मिळाले. त्यातून काही वर्षांत दीड लाख देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड संस्थेने केली. त्यातील ८० टक्के झाडे जगविण्यात यश आले आहे. सन २००८ पासून ‘प्रोजेक्ट हरियाली' अंतर्गत सुमारे दीड लाख स्थानिक झाडांची लागवड झाली. त्यात शिवण, जांभूळ, महुआ, कांचन, आपटा, सादडा, पांगारा, काटेसावर, पळस आदींचा समावेश आहे.

Biodiversity Prosperity
Biodiversity Conservation : जैवविविधतेचे संवर्धन आवश्‍यक

जैवविविधतेने नटला परिसर

सन २००८ मध्ये या जंगलाला राज्यातील पहिला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाला. मोर, गवताळ प्रदेशातील पक्षी, शृंगी घुबड, गरुड, देव ससाणा, सातभाई, नारंगी डोक्याचा कस्तूर, पांढऱ्या पोटाचा अंगारक, काळटोप कस्तूर, मोठ्या चोचींचा पर्ण वटवट्या तसेच त्याचे विविध प्रकार आढळतात. स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येथे येतात. बिबट्या, कोल्हा, लांडगा, तरस, रान मांजर, उदमांजर, ससा, वानर, मुंगूस, विविध प्रकारचे सर्प आढळतात.

शेजारी असलेल्या रामशेज किल्ल्याच्या कड्यांमध्ये वस्ती करून राहणारा गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर होता. हे वनक्षेत्र विकसित झाल्यानंतर त्यांचाही अढळ दिसू लागला आहे. सवान रातवा या पक्षाचे जोडपे प्रजनन करताना आढळते. उंच उडणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमधील अमूर ससाणा इथून जाताना आढळतो. येतो. जगातील सर्वात मोठा ‘अ‍ॅटलास मॉथ’ (पतंग) तसेच फुलपाखरांचा येथे अढळ आहे.

परिसरातील शेती झाली समृद्ध

पूर्वी जंगलतोड मोठ्या प्रमाणावर व्हायची. मात्र येथील आदिवासी बांधवांचे प्रबोधन करीत संस्थेने त्यांना मुख्य प्रवाहात आणले. येथील फळे, फुले व औषधी वनस्पतीवर त्यांचा अधिकार आहे. मात्र कुऱ्हाडबंदी व चराई बंदी आहे. मृद्‍संवर्धन व जलसंधारण येथे झाले. त्यामुळे भूजलपातळीसह पाण्याचे स्रोत वाढले.

जिरायती शेतीचे रूपांतर बागायती शेतीत झाले. जवळपासच्या गावाला त्याचा लक्षणीय फायदा झाला. परिसरात उन्हाळी पिके घेणे शक्य झाले. दीर्घकालीन संवर्धनातून अशा प्रकारे ओसाड प्रदेशाचे रूपांतर जैवविविधताने समृद्ध अशा जंगलात झाले. मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने निसर्ग येथे खऱ्या अर्थाने बहरला आहे.

Biodiversity Prosperity
Environmental Science : आपण सारे एकमेकांशी जोडलेले...

सुयोग्य पद्धतीचे नियोजन

रिठा, खैर, आवळा, साग, जांभूळ, पळस आदी सुमारे ७६ प्रकारच्या वनस्पती येते आढळतात. विविध ऋतूंत फुलणाऱ्या ४२ प्रकारच्या फुलांचा ताटवा इथे बहरलेला असतो. बोरगड हे भोरकडा या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले वनक्षेत्र आहे. पायथ्याशी तुंगलदरा
ही दिंडोरी तालुक्यात येणारी वाडी आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीअंतर्गत येथे कुऱ्हाडबंदी, चराईबंदीच निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून वनसंरक्षक दलही सज्ज करण्यात आले आहे. स्थानिक लोक देखभाल करतात.

बोरगड डोंगरावर भारतीय हवाईदलाचे प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने माथ्यावर जाण्यास मनाई आहे. मात्र पायथ्याशी असलेल्या तुंगलदरा वाडीपासून खाली पसरलेल्या विस्तृत अशा या बोरगड राखीव संवर्धन प्रकल्पाला भेट देता येते. ऋतुचक्रानुसार निसर्गाच्या विविध रंगांच्या छटा व हिरवे आच्छादन येथे पाहण्यास मिळते. कायमस्वरूपी देखरेख करण्यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती केली असून, त्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. गावातील लोकांना इलेक्ट्रिक चुली, अनुदानित गॅस मिळाल्याने वृक्षतोड कमी झाली आहे.

संस्थेची महत्त्वाची कामे व सुविधा

जैवविविधता समृद्ध अधिवास असलेल्या पाणथळ जागा आणि गवताळ प्रदेश वनक्षेत्रांचे संवर्धन.

जिल्ह्यातील वनक्षेत्र गिधाडांच्या घरट्याचे संरक्षण

निवडक वन्यजीव अधिवासामध्ये आणि परिसरात संरक्षण शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम.

बोरगड आणि अन्य मोकळ्या जागेवर वनीकरण कार्यक्रम, वृक्ष लागवड व संवर्धन

वन संरक्षण नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि गुन्ह्यांची प्रकरणे शोधून तपासण्यात मदत करण्यासाठी वन विभाग आणि अन्य संस्थांशी समन्वय.

आदिवासी क्षेत्र, पेठ तालुक्यात गलोलबंदी करण्यासह विद्यार्थी व तरुण वर्गात जनजागृती, यासह चित्रकला स्पर्धा आयोजन.

वन्यप्राण्यांसाठी पाणवठे.

वन विभागाकडून जंगलांना वणवे लागू नयेत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना.

संपर्क : राजेश कुरूप, ७४९९२९२३८२ व्यवस्थापक

अनफल खान, ७७४१९०७७३१ (क्षेत्रीय समन्वयक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com