Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Stock : रायगडमध्ये २४ धरणांनी गाठला तळ

Team Agrowon

Alibaug News : रायगड जिल्ह्यातील लहानमोठ्या २४ लघु पाटबंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्‍ह्यात लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या २८ धरणांपैकी फक्त चारच धरणांमध्ये मॉन्सून येईपर्यंत पाणीसाठा आहे. मात्र उर्वरित २४ धरणांची पातळी खालावली असून त्‍यापैकी १२ धरणांमध्ये फक्त आठ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.

रायगड जिल्ह्यात मोठा सिंचन प्रकल्प नाही, त्यामुळे लघु पाटबंधाऱ्यांवरच येथील सिंचन, जलजीवनच्या योजना कार्यान्वित आहे. मुरूड, तळा, रोहा, पेण, अलिबाग, उरण या सहा तालुक्यातील प्रत्येकी एक तसेच सुधागडमधील पाच, श्रीवर्धनमधील तीन, म्हसळ्यातील दोन, महाडमधील चार,

कर्जतमधील दोन, खालापूरमधील तीन, पनवेलमधील तीन अशा एकूण २८ धरणांद्वारे रायगडसह अन्य जिल्ह्यातील गावे, वाड्या, कंपन्या व शहरी भागात पाणीपुरवठा केला जातो. सध्या तापमान प्रचंड वाढले असून उन्हाचे चटके असह्य होत आहेत. धरणांची पातळीदेखील कमी झाल्‍याने ग्रामीण भागासह शहरातही तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.

तालुक्यातील उमटे धरणातील गाळ ४६ वर्षांपासून काढलेला नाही. यामुळे ८७ दशलक्ष घनफूट असलेली धरणाची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफुटावर आली असून तालुक्यातील ४७ गावे व ३३ वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाली आहे.

उमटे धरणाच्या भिंती जीर्ण झाल्‍या असून दगड निखळले आहेत. मातीच्या बंधाऱ्याला जवळजवळ ५० हून अधिक ठिकाणी भगदाड पडले आहेत. गाळामुळे धरणाची साठवण क्षमता निम्‍मी झाली असून पाच ते सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

चार धरणांत ५० टक्‍के साठा

जिल्ह्यातील फणसाड, श्रीगाव, कोथुर्डे, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, उन्हेरे, अवसरे, कवेळे, रानीवली, कलोते- मोकाशी, डोणवत, या बारा धरणांमध्ये केवळ सहा ते आठ दिवस पुरेल इतका साठा आहे.

सुतारवाडी, आंबेघर, कार्ले, पाभरे, वरंध, खिंडवाडी, खैरे, साळोखे, भिलवले, मोरबे, बामणोली, पुनाडे या १२ धरणांमध्ये २९ ते ४९ टक्के तर आंबेघर, कुडकी, संदेरी उसरण या चार धरणांमध्ये ५९ ते ७१ टक्के पाणी शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

रायगडसह नवी मुंबईला काही धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची पातळी कमी झाल्‍याने पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी योजनांची कामे निकृष्‍ट झाल्‍याने गळतीची समस्‍या उद्‌भवत आहे.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन :

धरणांमधील साठा कमी झाला असून काही धरणांमध्ये सहा ते पंधरा दिवस पुरेल इतकाच साठा आहे. अनेक ठिकाणी कपात करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी पुरवायचे असल्‍याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय टाळावा, असे आवाहन लघुपाटबंधारे विभागाने केले आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सर्व धरणांची पातळी दरवर्षीप्रमाणे होती. बाष्पीभवनाचे प्रमाण यंदा जास्त आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्‍यात ३० टक्के वाढ झाली आहे. त्‍यामुळे तलाव, नद्यांचे पाणी आटले असून धरणांनी तळ गाठला आहे.
मिलिंद पवार, कार्यकारी अभियंता, कोलाड पाटबंधारे विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT