Political Dominance: निवडणूक बिहारमध्ये असली, तरी महाराष्ट्रातील भाजपला (भारतीय जनता पक्ष) तेथील विजयाने आणखी अवसान आले तर आश्चर्य वाटायला नको. निवडणुकांवर बारकाईने काम करणारा, किंबहुना बूथ लेव्हलवर काम करणारा भाजप हा पक्ष पूर्णपणे व्यावहारिक पातळीवर काम करतो. जिंकले की धोरणांमुळे आणि विरोधकांच्या नाकर्तेपणामुळे जिंकलो आणि हरलो की आम्ही हरलो, तरी मतांची टक्केवारी वाढली हे भाजप याआधीही सांगत होते आणि आताही सांगते. .आता भाजप सगळीकडेच जिंकत असल्याने टक्केवारीचा विचार करण्याची गरज नाही. शतप्रतिशत भाजप आता जोमात असून, भाजपला कुणाच्या कुबड्यांची खरच गरज नाही अशी अवस्था आहे. एखाद्या राज्याची निवडणूक महाराष्ट्रावर प्रभाव कशी काय पाडू शकते असा प्रश्न पडू शकतो. पण समाजमाध्यमांच्या जगात खऱ्या अर्थाने जग हे खेडे झाले आहे. त्यात बिहार तर भारतातील एक राज्य आहे. गावोगावच्या गोठ्यांमध्येही बिहारमधील तरुण काम करत आहेत. गावखेड्यातील कोपऱ्यावरील चहाच्या टपरीवरही हिंदीत चहा मागावा लागतो इतकी सरमिसळ असल्याने बिहार निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडला नाही तर नवल!.बिहारमधील विजयाने महाराष्ट्र भाजपला अवसान येण्याचे कारण काय, असे काही जण विचारू शकतात. त्याचे उत्तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आहे. दिल्लीपासून गल्लीवर आपले राज्य असावे हे काही केवळ भाजपचे स्वप्न नाही, ते प्रत्येकच राजकीय पक्षांचे असते. याआधी काँग्रेस जिंकत होती आणि आता भाजप जिंकत आहे इतकेच! गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत..Maharashtra Politics: निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात.मुंबईसारख्या देशाच्या राजधानीचा कारभार नोकरशहाकडे आहे आणि या शहराचे बकालपण दिवसेंदिवस वाढत आहे. गर्भश्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी मोडून आता गंगाजळीला हात घातला जात आहे. तिथे राज्यातील महानगरपलिका, जिल्हा परिषदा आणि अन्य संस्थांची चर्चा न केलेली बरी! बरं, या निधीची काय वासलात लावली याचा लेखाजोखा मांडला जाईल पण त्याचे फलित काय?.शहरात पायी चालण्यासारखी स्थिती नाही, पायाभूत सुविधांची पुरती वाट लागून गेली असताना निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीला मागील तीन चार वर्षांपूर्वीच्या राजकीय घटनांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेत्यांना मोठी धास्ती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या हातातून पक्षच हिसकावून घेतला..वर्षानुवर्षे पक्षात असलेल्या नेत्यांनी साथ तोडत नवा खेळ सुरू केला. या खेळात शहराशहरांत आणि गावागावांत कार्यकर्त्यांनी सोय पाहत त्या त्या नेत्यांची साथ दिली आहे. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र असे कधी काळी म्हटले जात होते. मात्र गायपट्ट्यातील राजकारण इतक्या वेगाने घुसेल हे मात्र कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. त्यामुळे फाटाफुटीची व्हावी तितकी चर्चा होत नाही. रातोरात अनेक कार्यकर्ते घाऊक पद्धतीने पक्ष बदलत आहेत..मागील दोन आठवडे धामधुमीचे असल्याने मंत्र्यांना मतदारसंघात जाता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यातही अजित पवार यांच्या जवळच्या एका मंत्र्यांनाही मुंबई आणि पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात अडकून पडावे लागले. त्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ झाले. आपला मतदारसंघ कुणी उचलून नेईल की काय, अशी भीतीच ते व्यक्त करत होते. ना कामात लक्ष ना मुंबईत. ही अस्वस्थता मतदारसंघाच्या काळजीपेक्षा फाटाफुटीची जास्त आहे ही कबुलीसुद्धा त्यांनी दिली. आम्हीच असे फुटलो तर कार्यकर्त्यांना कुठल्या तोंडाने पक्ष सोडू नका असे सांगणार असा त्यांचा सवाल होता. त्यांचा हा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय विकृतीकरण किती खाली झिरपले याचे प्रातिनिधिक उदाहरण होय..Indian Politics: मौनं सर्वार्थ साधनम् !.भाजप नको हेच भाजपच्या पथ्यावरसध्या सर्वच पक्षांना भाजपची धास्ती आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष झाला हा अनपेक्षित निकाल असल्याची टीका आजही होते. मात्र त्यानंतर भाजप आता कुबड्या फेकून देण्याची भाषा करत आहे. त्यामुळे साहजिकच महायुतीतील पक्ष अस्वस्थ असू शकतील. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नेतृत्व संधीच्या शोधात होते. ती संधी चालून आली असताना भाजप ही संधी सोडणार नाही. भाजपमध्ये पक्षप्रवेश हा एक लहानसा मुद्दा ठरला आहे. त्यापलीकडे जाऊन निवडणुका लढण्याचे तंत्र भाजपने अवगत केले आहे..हे तंत्र ना विरोधी पक्षांना अवगत झाले ना सहयोगी पक्षांना! त्यात एकनाथ शिंदे अपवाद ठरू शकतील. भाजपची महाकाय शक्ती सर्व पक्षांच्या मनात धडकी भरवत आहे. त्यामुळे भाजप वगळून निवडणुका लढण्याचे निश्चित केले आहे. कोकणात काही ठिकाणी दोन शिवसेना एकत्र येत आहेत, तर दोन राष्ट्रवादी कोल्हापुरातील एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे..काँग्रेसने मात्र आम्ही महायुतीतील घटक पक्षांशी आघाडी करणार नाही म्हणून स्पष्ट सांगत आपली ओळख स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हाडवैर असलेल्या पक्षांनी हातमिळवणी करणे हे भाजपच्या भीतीपोटी घडत असलेली कृती आहे. हीच कृती भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. विधानसभेत बहुमतात असलेल्या भाजपला आता घटकपक्ष ओझे वाटू लागले आहेत. हे ओझे कुठेतरी उतरायचेच आहे. ते स्थानिक स्वराज्य संस्थेत उतरत असेल तर भाजपला हवेच आहे..कृषी विभाग अस्वस्थएक रुपयातील पीक विमा योजना रद्द करून शेतकऱ्यांच्या हिश्शातून हप्ता भरणारी जुनी योजना सरकारने आणली. एक रुपयातील पीक विमा योजनेत मोठा भ्रष्टाचार होता अशी उपरती सरकारला झाली. कृषी विभागातील अधिकारी कामाला लावून ही योजना बंद करणे कसे चांगले आहे हे पटवून दिले गेले. अर्थात, हे केवळ सरकारला पटले. अंमलबजावणीच्या पातळीवर सरकारने योग्य काळजी घेतली असती तर या योजनेत काहीही अडचण नव्हती. मात्र वेड घेऊन पेडगावला जाणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना कात्रजचा घाट दाखवला आहे. एक रुपयातील पीक विमा हप्त्यापोटी कंपन्यांना द्यावी लागणारी रक्कम वाचवून त्यातून कृषी समृद्धी योजना राबवू असे सांगितले..मात्र या योजनेलाही सरकारने ठेंगा दाखवला आहे. शिवाय वर्षानुवर्षे थेट लाभ हस्तांतर प्रणालीत विविध योजनांसाठी अर्ज पडून होते. ते आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या धोरणानुसार निकाली काढले आहेत. मात्र या निकाली काढलेल्या अर्जांपोटीचे दायित्व सरकारवर आहे. हिवाळी अधिवेशनाकडे कृषी विभाग आशेने पाहत असताना वित्त विभाग या विभागाच्या फाइलसमोर लाल शाईची पेन घेऊन बसले आहे. एकीकडे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे कृषी विभागाला पळवायला बघत आहेत, पण दुसरीकडे वित्त विभाग ठेंगा दाखवून कृषी विभागाला जागेवरच बसवत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.