Drought Condition : दुष्काळाच्या जखमा ठेवून संपला पावसाळा

Maharashtra Drought Update : सात ते आठ तालुक्यांत दुष्काळाच्या जखमा ठेवूनच पावसाने यंदा अलविदा केल्याने येणाऱ्या आठ ते दहा महिन्यांची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
Drought
Drought Agrowon

Nashik News : अर्धा जिल्हा पावसाच्या माहेरघराचा तर अर्धा मात्र अवर्षणप्रवण दुष्काळी...ब्रिटीश काळापासून हा शिक्का लागलेल्या जिल्ह्यात या वर्षी वरुणराजाने शेवटपर्यंत पाणी-पाणी करण्याची वेळ आणली.

अनेक तालुक्यांत पाणजंजाळ करून संपणारा पावसाळा यंदा मात्र जिल्हा कोरडा ठेवूनच संपला. किंबहुना, सात ते आठ तालुक्यांत दुष्काळाच्या जखमा ठेवूनच पावसाने यंदा अलविदा केल्याने येणाऱ्या आठ ते दहा महिन्यांची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्यादेखील उशिरा झाल्या होत्या. झालेली पेरणी पावसाच्या सरीवर तग धरून असताना धोंड्याचा महिना पूर्ण कोरडा गेला आणि शेतातील उभी पिके करपायला सुरुवात झाली. जूनची जिल्ह्याची वार्षिक सरासरी १७४ मिलिमीटर असताना फक्त ९२ मिलिमीटर पाऊस पडला होता. जुलैची सरासरी ३०८ मिमी असताना केवळ २३० मिमी पाऊस पडल्याने पेरण्यांना चालना मिळाली होती.

Drought
Rabbi Sowing : पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्यांना सुरुवात ; ६३ हजार ३७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड

या दोन्ही महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत केवळ ६७ टक्केच पाऊस पडला. ऑगस्टची सरासरी २६६ मिमी असताना केवळ ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने सरासरी पाऊस झाल्याचे समाधान दिले. तर ऑक्टोबरदेखील यावर्षी पावलाच नाही. त्यामुळे जून ते ऑक्टोबरपर्यंतची ९४५ मिमी सरासरी असताना अवघा ६४५ मिमी पाऊस पडला. चारही महिने वरुणराजाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला.

पावसाळा संपल्यावर पेठ व सुरगाणा तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या केवळ ७१ टक्के, त्रंबकेश्वरमध्ये ७२ तर इगतपुरीत अवघा ५२ टक्के पाऊस झाला. १५ पैकी एकमेव दिंडोरी तालुक्यानेच सरासरीची शंभरी गाठली असून येथे १०७ मिमी पावसाची नोंद झाली. याउलट दुष्काळी मालेगावमध्ये फक्त ६३, सटाण्यात ६७, येवल्यात ७८, देवळात ६१, सिन्नरमध्ये ५९ व नांदगावमध्ये ५५ टक्के, चांदवडमध्ये ६४, नाशिक ६८ टक्के पाऊस नोंदला आहे.

Drought
Crop Insurance : पीकविम्याचा १७०० कोटींचा ‘अग्रिम’ मंजूर

१०० मंडले तहानलेलीच

जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत फक्त ११ महसूल मंडलांनी सरासरीचे शतक गाठले. कळवाडी, मुल्हेर, दळवट, अभोना, उमराळे, ननाशी, कोशिंबे, कसबे वणी, पांढुर्ली, नायगाव आणि अंदरसुल या मंडलांतच यावर्षी सरासरीची शंभरी ओलांडली. याव्यतिरिक्त १०० मंडलांत मात्र ५० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान पाऊस पडला. १५ मंडलांत तर ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडल्याने आताच येथे पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुले आता मंडले दुष्काळी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

मागील वर्षापेक्षा निम्माच पाऊस

२०२२ मध्ये जिल्ह्यात इगतपुरी तालुका वगळता सर्व १४ तालुक्यांनी सरासरीची शंभरी गाठली होती. विशेष म्हणजे दिंडोरीत २४४, चांदवडमध्ये २११, निफाडमध्ये १७७ असा दीडशे मिमीपेक्षा जास्त पाऊस सर्वदूर पडला अन् सरासरी १३६ टक्के पाऊस नोंदला गेला होता. यावर्षी चित्र उलटे असून अवघा ६३ टक्केच पाऊस पडल्याने जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता सहजपणे लक्षात येते.

कमीच पाऊस...तरीही दुष्काळ का नाही

सद्यःस्थितीत शासनाने मालेगाव, येवला व सिन्नर या तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र या खालोखाल नांदगाव, इगतपुरी, चांदवड, देवळा, बागलाण या तालुक्यांची आकडेवारी व परिस्थितीदेखील गंभीर आहे. असे असतानाही शासनाने येथे दुष्काळ का जाहीर केला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. मुळात या तालुक्यांतील धरणात पाणी आहे किंवा एखाद्या दोन मंडलांत जास्त पाऊस आहे म्हणून तालुका दुष्काळी जाहीर न करणे हा अन्याय असल्याने मंडलांमध्ये देखील पावसाच्या प्रमाणानुसार दुष्काळ जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावर्षी तालुकानिहाय पडलेला पाऊस (मिमीमध्ये...)

(आकडेवारी आजपर्यंतची...)

तालुका वार्षिक पर्जन्यमान पडलेला पाऊस टक्के

नाशिक ७८१ ५३७ ६८

इगतपुरी ३१६८ १६७५ ५२

दिंडोरी ७६२ ८२० १०७

पेठ २१२४ १५१२ ७१

त्रंबकेश्वर २२४४ १६२४ ७२

मालेगाव ५३८ ३३९ ६३

नांदगाव ५८३ ३२१ ५५

चांदवड ६०९ ३९४ ६४

कळवण ७३६ ६३५ ८६

बागलाण ५६६ ३८० ६७

सुरगाणा १९९२ १५०६ ७५

देवळा ५०९ ३०६ ६०

निफाड ५४६ ३६० ६५

सिन्नर ६३० ३७२ ५९

येवला ५४४ ४२५ ७८

जिल्हा सरासरी १०२३ ६५१ ६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com