
येडशी (ता. मंगरूळपीर, जि. वाशीम) येथील राजेंद्र नरहरी बारड यांना काही वर्षांपूर्वी स्थापन केलेली दुग्ध संस्था तांत्रिक कारणांमुळे बंद करावी लागली. मात्र अत्यंत हिमतीने, चिकाटी, सातत्य व परिश्रमातून त्यांनी शेलूबाजार येथे स्वतःचा दुग्ध व प्रक्रिया व्यवसाय थाटला. परिसरांमधील गावांमधील दुग्धोत्पादकांचे नेटवर्क उभारत दूध संकलन, दर्जेदार पदार्थ निर्मितीतून आपला उद्योग भरभराटीला आणला आहे. कौटुंबिक, आर्थिक समृद्धीही प्राप्त केली आहे.
येडशी (ता. मंगरूळपीर, जि. वाशीम) येथील राजेंद्र नरहरी बारड यांनी अनेक वर्षांच्या अथक वाटचालीतून आपला दुग्ध व्यवसाय चांगल्या प्रकारे आकारास आणला आहे. त्यांची हा यशस्वी प्रवास प्रेरणादायी आहे. सन १९९२ मध्ये वडिलांचे निधन झाले. घरातील जबाबदाऱ्या राजेंद्र यांच्या खांद्यावर आल्या.
एमए बीपीएडपर्यंत शिक्षण पूर्ण करून ते गावी परतले. नोकरीसाठी प्रयत्न केले. पण देणगी देण्याच्या कुप्रथेमुळे नोकरीचे स्वप्न बाजूला ठेवावे लागले. परंतु हार मानणे राजेंद्र यांच्या स्वभावात नव्हते. अरविंद आणि दिनू या दोन्ही बंधूंना सोबत घेऊन स्वतःचा उद्योग करायचे ठरवले.
दुग्ध व्यवसायाची पहिली पायरी
राजेंद्र यांनी दोन म्हशी घेत दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. तो काळ त्यांच्यासाठी अवघड होता. दुधाचा पुरवठा, चारा-पाणी, बाजारपेठांचा अभाव, असमाधानकारक दर अशा कितीतरी अडचणी भेडसावत होत्या. पण आता कोणत्याही कारणाने माघार घ्यायची नाही हे पक्के केले होते. हळूहळू ८ ते १० म्हशी आणि पाच संकरित गाई घेण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली.
पाहता पाहता व्यवसायाने वेग पकडला. त्यांच्या या यशाने गावातील अन्य युवकांनाही प्रेरणा दिली. आणखी पाच- सहा युवकांनी देखील दुग्ध व्यवसाय सुरू केला. राजेंद्र यांचा हा व्यवसाय म्हणजे केवळ कौटुंबिक उत्पन्नाचे साधन नव्हते तर गावात चळवळ उभी करण्यासाठी प्रेरक बाब ठरली.
सहकारी दूध संस्थेची स्थापना
व्यवसायाचा पुढील टप्पा म्हणजे बाजारपेठ हस्तगत करणे होते. कारण दूध उत्पादन सुरू झाले होते, पण विक्रीसाठी योग्य व्यवस्था नव्हती. हे लक्षात घेऊन राजेंद्र आणि अन्य ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात लोकनेते स्वर्गीय तुकारामजी पाटील येडशीकर दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन केली. पारदर्शक कारभारामुळे ही संस्था लवकरच पंचक्रोशी पोहोचली. सन २००३-०४ पर्यंत संस्थेतील दररोजचे दूध संकलन ३०० ते ४०० लिटरपर्यंत पोहोचले.
शासकीय डेअरीला दुधाचा पुरवठा होत होता. त्यातून गावातील दुग्ध उत्पादकांना देखील हक्काची बाजारपेठ मिळू लागले. परंतु २००४ नंतर शासनाने वाशीम व अकोला जिल्ह्यांतील दूध संकलन केंद्रे बंद केली. सोबतच राजेंद्र यांच्या संस्थेवरही अडचणींचे सावट तयार झाले. नाइलाजाने संस्थेचे कामकाज थांबवावे लागले.
स्वतःचा थाटला व्यवसाय
संस्था संकटात आली तरी राजेंद्र थांबले नाहीत. त्यांनी दूध उत्पादकांचा बचत गट तयार करून नवी दिशा ठरवली. शेलूबाजार येथे दूधसंकलन सुरू ठेवले. याच ठिकाणी प्रक्रिया युनिट सुरू करून मूल्यवर्धनाद्वारे विविध पदार्थ तयार करण्यास सुरवात केली. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती बाळगलेल्या राजेंद्र यांनी मग एकेक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकण्यास सुरवात केली.
पूर्वी जी संस्था स्थापन केली होती त्या काळापासून त्यांनी परिसरातील गावांमधील दुग्धोत्पादकांना जपले. आज सुमारे १६० दुग्धोत्पादकांचे त्यांचे ‘नेटवर्क’ आहे. तथापि सुमारे ६० च्या दरम्यान दुग्धोत्पादक वर्षभर दूध पुरवठा करतात. वर्षभराची सरासरी लक्षात धेतली तर ६०० ते ७०० लिटर दुधाचे दररोज संकलन होते.
हंगामात कमाल ते एकहजार लिटरपर्यंतही पोचले आहे. निम्म्या दुधाची याच युनिटमधील आऊटलेटवरून थेट विक्री होते. तर उर्वरित निम्या दुधावर प्रक्रिया होते. त्यातील १०० लिटर दुधापासून पेढा, सुमारे १०० ते १२० लिटर दुधापासून पनीर, ७० लिटर दही असे विविध पदार्थ तयार होतात. आपल्या दुधाची गुणवत्ता जपल्याने दर्जेदार खवा तयार होतो. त्यामुळे आपला पेढा व बासुंदी अत्यंत लोकप्रिय असल्याचे राजेंद्र सांगतात.
दर बुधवारी गावात मोठा आठवडी बाजार भरतो. त्यावेळी ४० ते ५० किलो पेढ्याचा खप होतो. खात्रीशीर दर्जेदार दूध, पदार्थ मिळत असल्याने शेलूबाजारच नव्हे तर परिसरातील गावांतील ग्राहकही या ठिकाणी पदार्थ खरेदीसाठी येतात. राजेंद्र यांना गावातील हिम्मतराव पाटील- बारड, भगवानराव पाटील आरू, सिंचन विभागातील उपअभियंता नारायणराव बारड यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
भावांची एकी ठरली मोलाची
तिघे बारड बंधू एकत्रित शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळतात. सकाळी सहा वाजता सुरू झालेला दिवस रात्री दहा वाजताच संपतो. प्रत्येक भावाने आपापली जबाबदारी वाटून घेतली आहे. एक भाऊ सकाळी, एक दुपारी आणि तिघेही सायंकाळी एकत्रित काम करतात.
या व्यवसायासोबतच राजेंद्र यांनी सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. ब दर्जाची दोन वाचनालये ते चालवतात. येडशी व शेलूबाजार या ठिकाणी दोन अभ्यासिका सुरू केल्या आहेत. त्यात शंभरावर विद्यार्थी अभ्यास करतात.
व्यवसायातून प्रगती
दुग्ध व्यवसाय व जोडीला शेती यातून बारड कुटुंबाने भरीव आर्थिक प्रगती साधली आहे. तीन भावांची तीन स्वतंत्र सुसज्ज घरे आहेत. भविष्यात व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने शेलूबाजारमध्ये एक दुकान जागाही घेतली आहे. कुटुंबाची २४ एकर शेती आहे. पूर्वी सिंचनाची सोय नसल्याने पावसाच्या पाण्यावर पिके घेत.
आता सिंचनाची सुविधा झाल्याने बारमाही पिकांचे नियोजन केले आहे. राजेंद्र यांना दोन मुली असून, मोठी मुलगी ऋतुजा एमएबीड व पीएचडी झाली असून ती विवाहित आहे. धाकटी मुलगी वृषाली स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. बारड हे केवळ यशस्वी दुग्ध व्यावसायिक राहिलेले नसून गावासाठी मार्गदर्शक व नव्या पिढीचे आदर्श बनले आहेत.
राजेंद्र बारड ९७६३२७४८७५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.