
Nagpur News : मुरादपूर उपसा सिंचन योजना लोकांच्या सेवेत अर्पण करण्यात आली आहे. सौर ऊर्जेवरील ही उपसा सिंचन योजना या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
उमरेड तालुक्यातील वडगाव जलाशयावर (वेणा नदीवरील) सौर ऊर्जेवर संचालित मुरादपूर उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार संजय मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे, सरपंच दुर्गा आलाम, उपसरपंच गजानन गाडगे, आदिवासी विभागाचे उपसंचालक श्री. चव्हाण, मानस उद्योग समूहाचे उपाध्यक्ष जयकुमार वर्मा, उपाध्यक्ष आनंदराव राऊत आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
श्री. गडकरी म्हणाले, ‘बऱ्याच दिवसांपासून या भागात अशा प्रकल्पासाठी आम्ही प्रयत्नरत होतो. सौर ऊर्जेमुळे जे पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार आहे, त्यातून शेतकऱ्यांना दोन ते तीन पिके घेता येणार आहेत. या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. ऊस, मका, भातासारखे नगदी पीक लावून नफा मिळविण्यासाठी जनकल्याण समितीने लक्ष घालण्याची गरज आहे.
शेतकऱ्याला उत्तम भाव मिळाला पाहिजे. त्याच्या उत्पादनांची गुणवत्ता चांगली असायला पाहिजे. त्यातून त्याचा विकास साधता आला पाहिजे, हाच यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे, आता फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करावी, असे आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली तर उत्पादन वाढेल आणि नफाही वाढेल, असेही ते म्हणाले.
मुरादपूर उपसा सिंचन योजनेची वैशिष्ट्ये
रामा डॅमच्या जलाशयात तरंगते सोलर पॅनल्स
प्रत्येकाच्या क्षेत्रात ठिबक सिंचनाची सोय
एका कंट्रोल रूममधून संपूर्ण क्षेत्रात पाणीवाटप
संपूर्ण प्रकल्पावर पाणीवापर संस्थेचे नियंत्रण
सोलर पॅनलद्वारे वीजनिर्मिती होईल व ते एमएसईबीला जोडले जाणार असल्यामुळे योजनेवरील वीजबिलाचा भार कमी राहणार
मुरादपूर प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाद्वारे शेतीकरिता पाणी वापरता येणार आहे.
स्मार्ट व्हिलेज लवकरच
शंभर कोटी रुपयांमध्ये दहा एकर जागेवर स्मार्ट व्हिलेज बांधायला घेतले आहे. लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. ४०० लोकांनी घरांसाठी नोंदणी केली आहे. यात एक हजार लोकांना घरे देणार आहोत. ४५० चौरस फुटांचे घर, सिमेंटचे रस्ते, आयुष्यभर पाणी आणि वीज मोफत देण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी खेळाचे मैदान आणि उद्यानही असेल, अशी माहिती श्री. गडकरी यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.