
Improved Tur Farming : सोलापूरपासून ३५ ते ४० किलोमीटरवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी हे द्राक्षे, बेदाणा, ऊस, कांदा या पिकांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. तूर, सोयाबीन या पिकांमध्ये प्रयोगशीलता दाखवणारे शेतकरी गावात आहेत. पदवीधर असलेले गंगाधर बिराजदार हे त्यापैकीच एक लोकप्रिय नाव आहे.
वास्तविक ते मूळचे द्राक्ष बागायतदार, बेदाणा उत्पादक. मात्र द्राक्षशेतीबरोबरच तूर उत्पादनातही त्यांचा मोठा हातखंडा आहे. पूर्वी त्यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने तूर व्हायची. मात्र मागील सुमारे आठ वर्षापासून त्यांनी सुधारित तंत्रज्ञान पद्धतीने तूर घेण्यास सुरवात करून शास्त्रीय अभ्यास व ज्ञानातून व्यवस्थापनात सुधारणा केली आहे.
त्यासाठी सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), कृषी विभाग यांचे मार्गदर्शन घेत विविध प्रयोग केले. केव्हीकेचे प्रमुख डॅा. लालासाहेब तांबडे, अमोल शास्त्री, कृषी सहायक अशोक राठोड यांचे साह्य नियमित मिळाले. या सर्व प्रयत्नांमधूनच तुरीची उत्पादकता व गुणवत्ता वाढवली आहे.
अशी आहे तुरीची सुधारित तंत्राची शेती
गंगाधर यांची ४० एकर शेती आहे. पैकी सहा एकरांत द्राक्षबाग आहे. बागायती व कोरडवाहू व खरीप व रब्बी अशी दोन्ही हंगामात ते पिके घेतात. तुरीचे दरवर्षी सात ते आठ एकर क्षेत्र असते. काटेकोर सिंचनासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होतो.
दोन ट्रॅक्टर्सच्या साह्याने शेतीत यांत्रिकीकरणाचा अवलंब केला आहे. त्याशिवाय गांडूळखत युनिट उभारले आहे. तुरीसाठी त्यांनी गोदावरी या सुधारित वाणाची निवड केली आहे. लागवड तंत्रात लागवडीचे ठेवलेले योग्य अंतर, लागवडीनंतर पहिल्या दीड महिन्यातील शेंडाखुडणी, किडरोगाला प्रतिबंधात्मक फवारण्या आणि पाण्याचे योग्य नियोजन यामुळे त्यांना उत्पादकतावाढ मिळते आहे. दरवर्षी ते एकरी सर्वाधिक १६ क्विंटलपर्यंतचे उत्पादन घेतात.
त्यांच्या दरवर्षीच्या व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी सांगायच्या तर उन्हाळ्यात ट्रॅक्टरद्वारे खोल नांगरणी करून घेतली जाते. त्यानंतर एक वर्षाआड प्रति एकरी चार ट्रॅाली शेणखताचा वापर करून ते कुळवून घेतले जाते. ट्रॅक्टरद्वारे सरी सोडून घेतली जाते. जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन ओळीत सात फूट आणि दोन रोपांमध्ये दीड फूट अंतरावर टोकण पद्धतीने लागवड होते.
मागील वर्षी बीडीएन-२०१३-४१ (गोदावरी) या सुधारित वाणाची निवड केली. एकरी साधारण दोन किलो बियाणे लागले. लागवडीनंतर २५ दिवसांनी एकरी दोन बॅग डीएपी, एक बॅग एमओपी, प्रत्येकी १० किलो फेरस सल्फेट, झिंक सल्फेट व गंधक अशी मात्रा ते देतात. फवारणीद्वारे वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार अन्य सूक्ष्मअअन्नद्रव्यांचा वापर तसेच फुलोरा अवस्थेत झिंक आणि बोरॅानची फवारणी करतात.
पीक मुख्यतः तणविरहित ठेवण्याकडे कल असतो. शिवाय ट्रॅक्टरद्वारे आंतरमशागत केली जाते. फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत घाटेअळी, पिसारी पतंग, काळी माशी या किडीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होण्याचा धोका असतो. या किडीच्या नियंत्रणासाठी वातावरण पाहून तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी घेतली जाते.
लागवडीनंतर पहिल्या पंधरवड्यात एक पाणी व त्यानंतर शेंगा भऱण्याच्या अवस्थेत आणि त्या पक्व होण्याच्या अवस्थेत असताना पाणी दिले जाते. ३५ ते ४५ दिवसानंतर शेंडा खुडणी केली जाते. त्यामुळे तुरीची वाढ एकसारखी आणि चांगली होते. शेंगाही भरपूर लागतात.
उत्पादनात झाली वाढ
पारंपरिक पद्धतीत गंगाधर यांना एकरी चार, पाच ते सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. सुधारित पध्दतीचा अवलंब करू लागल्यापासून एकरी १२ पासून ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादकता गाठली आहे. मागील वर्षी गोदावरी वाणाचे एकरी सर्वाधिक १६ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. एकरी खर्च सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत येतो. तुरीला क्विंटलला सहाहजारांपासून ते ११ हजारांपर्यंत दर मिळतो. मागील वर्षी ९००० रुपये दराने त्यांनी तुरीची विक्री केली.
बियाणे हाताहोत खपले
तुरी बाजारात नेऊन विक्री करण्याऐवजी गंगाधर यांनी गुणवत्तापूर्ण बियाणे शेतकऱ्यांना मिळावे तसेच आपल्यालाही चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी मूल्यवर्धन केले. गोदावरी तुरीचे बियाणे असे ब्रँडिंग करत यंदाच्या एप्रिलपासून शेतकऱ्यांना प्रति किलो १८० ते २०० रुपये दराने विक्री केली सुरु केली. त्यासाठी सोशल मीडिचाही आधार घेतला. विदर्भ, हैदराबाद आणि राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत विक्री झाली असून बियाणे हातोहात खपल्याचे गंगाधर म्हणाले.
देशपातळीवर झाला सन्मान
अभ्यासपूर्ण व प्रयोगशील शेतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गंगाधर यांना मागील वर्षी पुसा येथे भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत (आयसीएआर) देशपातळीवर मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात ले आहे. ॲस्पी फाउंडेशनचाही त्यांचा यापूर्वी महाराष्ट्र विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
पुणे येथे कृषी विभागाच्या प्रदर्शनातही त्यांची गुणवत्तापूर्ण तूर सादर झाली होती. त्यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक करून गौरवही केला होता. आई वनमाला, पत्नी सौ.माहेश्वरी यांची त्यांना शेतीत मोठी मदत होते. लहान भाऊ स्वप्नील आणि भावजय सौ. आरती पुणे येथे नोकरीस असतात.
प्रयोगशील शेतीत कमावले नाव
गावात युवा शेतकरी गटाची स्थापना करून गंगाधर यांनी अन्य शेतकऱ्यांनाही प्रयोगशील शेतीत आपल्यासोबत अन्य शेतकऱ्यांना घेतले आहे. गटाची कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. गटाच्यामाध्यमातून शेतकरी सामूहिकरीत्या खते, कीडनाशके आदींची खरेदी एकत्रित करतात. त्यामुळे वेळ, पैसा यांची बचत होते. द्राक्षातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च प्रतीचा बेदाणा तयार करण्यामध्ये गंगाधर यांचे चांगले नाव आहे. पाच-सहा वर्षांपासून सोलापूर व तासगावच्या बेदाणा बाजारपेठेत त्यांचा बेदाणा सर्वाधिक दराने विकला जातो.
गंगाधर बिराजदार ९७६४०७५००५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.