Success Story: कष्टाच्या तोरणाखाली रवी आणि अर्चना

Ravi Gaikwad and Archana Gaikwad Story: रवी शेती, नोकरी व सार्वजनिक कामे सांभाळत असताना इकडे अर्चना संसाराचे खंबीर नेतृत्व करते. घरकाम सांभाळून शेती करते. रवीच्या अनुपस्थितीत तोरणाकाठच्या जंगलात जनावरे चरायला घेऊन जाते.
Ravi Gaikwad and Archana Gaikwad
Ravi Gaikwad and Archana Gaikwad Agrowon
Published on
Updated on

Farming Life Social Service: दुर्गराज तोरणा म्हणजे शिवरायांच्या स्वराज्याचे तोरण. तोरणाच्या पायथ्याशी वेल्हे गावाच्या घेऱ्यात दुर्गम भागात मला एक भली मोठी विहीर आणि चांगली फुललेली शेती दिसली. त्यामुळे उत्सुकतेने शोध घेता मी पोहोचलो ते शेतकरी रविराज गायकवाड आणि त्याची अर्धांगिनी सौ. अर्चना या जोडीकडे. शिवरायांच्या काळात तोरणाचे नाईक म्हणून गायकवाड परिवाराची शिबंदी लागत असे.

ब्रिटिशांच्या काळात तोरणा पंतसचिवांच्या संस्थानात आला. त्यावेळी गायकवाड परिवार महसूल दप्तर सांभाळण्याचं काम करू लागला. त्यामुळे तोरणा दुर्गाला गायकवाड परिवार एखाद्या कुलदैवताप्रमाणे पुजतो. याच परिवारातली रवी व अर्चना ही जोडी. रवीचे वडील दिनकरअण्णा हे हाडाचे शेतकरी आणि पंचक्रोशीचे जणू काही डॉक्टरच. ते आरोग्य खात्यात साधे कर्मचारी होते. मात्र, त्यांचे कार्य शेतकऱ्यांसाठी महान. तोरणापासून ते कोकण दिवा आणि राजगडापासून ते मढेघाट या सर्व दुर्गम भागातील गावपाड्यांवर आरोग्य सर्वेक्षण करीत गरीब शेतकऱ्यांना गोळ्या, औषधे देण्याचे काम रवीच्या वडिलांनी ३६ वर्षे पायी फिरून केलं.

Ravi Gaikwad and Archana Gaikwad
Agriculture Success Story: पालकरांकडील आंब्याला मिळालेय जागेवरच मार्केट

रवीची आई हिराबाई या शेतकरीकन्या. आयुष्यभर त्यांनीही शेतीला वाहून घेतलं. त्यामुळे रवीवर घरातूनच शेती आणि समाजसेवेचे संस्कार आले. आईवडिलांचे कष्ट पाहून रवीचा भाऊ युवराजआबा याने पाचवीत औत धरला, तर रवीने आठवीपासूनच शेतीत झोकून दिले; पुढे तो पदवीधरदेखील झाला. शेती परवडत नाही म्हणून रवी पुण्याला कामाला लागला. मात्र, शेतीवरचे प्रेम कमी होऊ दिले नाही. आठवडाभर पुण्यात काम करून सुट्टीच्या दिवशी जनावरे घेऊन जंगलात जायचं, असा त्याचा नित्यक्रम होता.

एक दिवस तोरणाकाठच्या रविराजचे लग्न राजगडाकाठची शेतकरीकन्या अर्चना चंद्रकांत माने यांच्यासोबत लागले. अर्चनाने रवीच्या संसाराला कष्टाने फुलवले. रवी सांगतो, ‘अर्चना घरात आली ती जणू काही माझ्या आई-वडिलांची मुलगी बनूनच. घरकाम, शेतीकाम मुलाबाळांचा सांभाळ यात अर्चनाने कुठेच कसूर केला नाही. त्यामुळे आयुष्याच्या वाटचालीत शेती असो की नोकरी; मी कधी निराश झालो नाही.’

पुण्यात सिमेंटच्या जंगलामध्ये रवी मात्र रमला नाही. तोरणा त्याला सतत खुणावत होता. त्याने शहर सोडलं आणि पुन्हा शेतीत लक्ष घातले. पुढे गावच्या महसूल मंडल अधिकारी कार्यालयात सहाय्यक म्हणून रवी काम करू लागला. या कामाने रवीला त्याच्या वडिलांसारखीच गरीब शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळवून दिली. दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शिधापत्रिका, जातीचे दाखले,

Ravi Gaikwad and Archana Gaikwad
Agriculture Success Story: पारंपरिक शेतीला फळबाग, पशुपालनाची जोड

सातबारा उतारे, फेरफार नोंदी काढून देणे अशी कामे तो करू लागला. अनेक शेतकरी कुटुंबांना त्याने संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे लाभ मिळवून दिले. दुसऱ्या बाजूला रवी व त्याचा भाऊ आबा यांनी शेतीत मोठी विहीर खणली आणि २०० आंब्यांची बागदेखील लावली. परंतु, एके दिवशी बाग वणव्यात जळाली; विहिरीला मात्र कायमचे पाणी लागले. त्यामुळे रवीची शेती बहरली.

आता रवी नोकरी सांभाळून शेती करतोच. शिवाय रोज आठ-दहा जनावरांना घेऊन तोरणाकाठच्या जंगलात फिरत असतो. त्याला निसर्ग आवडतो. दुसऱ्या बाजूला रवीने संतोष खुळे व इतर जिवलग मित्रांच्या मदतीने तोरणाकाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू केला आहे. रवी स्वतः शेती, नोकरी व सार्वजनिक काम सांभाळत असताना इकडे अर्चनाने संसाराचे खंबीर नेतृत्व केले. तिने सासूसासरे, दीर-जाऊ-नणंद यांना अंतर दिले नाही. आजही अर्चना घरकाम सांभाळून शेती करते आणि रवीच्या अनुपस्थितीत तोरणाकाठच्या जंगलात जनावरे चरायला घेऊन जाते.

अर्चना सांगते, ‘लग्नानंतर मी सासरी आले. पण, माहेर सोडल्याची जाणीव मला कधीच झाली नाही. पती आणि सासरच्या सगळ्याच मंडळींनी मला जीव लावला. त्यामुळे घर आणि शेती सोडून मला बाहेर कधी कुठे फिरायला जावे, असेही वाटले नाही. १७ वर्षांचा संसारात आमच्यात एकदाही दुरावा आलेला नाही.’ रवी आणि अर्चनाच्या या गोड संसाराला तीन फळे आली. त्यांची मोठी मुलगी वैभवी नववीत शिकते, प्रज्ञा सातवीत; तर लहान मुलगा सिद्धांत हा पाचव्या इयत्तेत आहे.

मधल्या काळात रवीच्या आई देवाघरी गेल्या. पण गायकवाड परिवारातील कर्तृत्ववान महिलेची घरातील जागा आता अर्चनाने घेतली आहे. दोघांचे एक स्वप्न होतं, की एक टुमदार घर असावं. त्यासाठी रवीने वडील व भावाच्या मदतीने पैसा साचवून छान घर बांधले; पण केवळ स्वतःसाठी नव्हे, तर या सामाईक घरात भावालाही घेतले. रवीचे बंधुप्रेम आता इतर शेतकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय ठरले आहे.

- रविराज दिनकर गायकवाड,

७९७२०२७८२७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com