Agriculture Technology: कंपोस्ट खते देण्यासाठी साइड ट्रेंचर, कंपोस्ट ॲप्लिकेटर

Compost Applicator: पिकांच्या मुळांपर्यंत योग्य प्रमाणात कंपोस्ट खते पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टरचलित साइड ट्रेंचर आणि FYM ॲप्लिकेटर हे आधुनिक यंत्र अत्यंत फायदेशीर ठरले आहे. या यंत्राच्या मदतीने कमी वेळात, कमी श्रमात आणि अधिक अचूकतेने खताचे वितरण शक्य होते.
Farm Equipment
Farm EquipmentAgrowon
Published on
Updated on

डॉ. अभिजित खडतकर, डॉ. चेतनकुमार सावंत, डॉ. अजित मगर

Agriculture Innovation: पिकांच्या वाढीसाठी सेंद्रिय खतांचा वापर हा रासायनिक खतांइतकाच, किंबहुना त्याहून अधिक गरजेचा आहे. पिकांची वाढ आणि प्रतिकारकता या दोन्हीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. द्राक्षासारख्या विविध निर्यातक्षम फळबागांमध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्याच प्रमाणे बागेमध्ये शेणखत आणि कंपोस्ट खत (एफवायएम) वापरले जाते. विशेषतः फळधारणेच्या कालावधीत द्राक्ष आणि संत्री अशा बागायती पिकांसाठी कंपोस्ट खत आवश्यक आहे.

हे खत पिकाच्या मुळांजवळ देण्याची आवश्यकता असते. त्यासाठी विशेषतः द्राक्ष बागेत प्रत्येक ओळीच्या जवळ एक सलग चर खोदून त्यामध्ये खत दिले जाते. त्यानंतर हा चर पुन्हा मातीने भरला जातो. हा चर तयार करणे आणि पुन्हा भरणे, हे एक महत्त्वाचे काम असते. त्यातून फळझाडांच्या मुळांच्या परिसरामधील माती भुसभुशीत, सच्छिद्र आणि अधिक जलसंचयासाठी योग्य बनते.

त्याच वेळी मुळांना योग्य प्रमाणात हवेचा पुरवठा होतो. यामुळे खथ शोषणाऱ्या पांढऱ्या मुळांची वाढ होते. जुनी मुळे अधिक खोल जाऊ शकतात. ही प्रक्रिया सामान्यत: हाताने स्थानिक फावडे व कुदळसारख्या अवजाराने पार पाडली जाते. काही वेळा त्यासाठी बैलचलित किंवा लहान ट्रॅक्टरचलित नांगर किंवा डिचरचा वापर केला जातो. अर्थात, मनुष्यबळाच्या साह्याने हाताने खोदकाम करणे हे कष्टदायक आणि श्रमप्रधान काम आहे. या सर्व कामांसाठी अंदाजे ३३.५ मनुष्य-दिवस प्रति हेक्टर मजुरांची आवश्यकता भासते.

Farm Equipment
Agriculture Technology: रोबोटिक फवारणी यंत्रांचा विकास

ही कामे करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थामध्ये खास ट्रॅक्टरचलित साइड ट्रेंचर आणि फार्मयार्ड खत ॲप्लिकेटर विकसित केले आहे. त्यामुळे द्राक्षाच्या वेलीच्या दोन्ही बाजूंनी चर खोदून योग्य प्रमाणात शेणखत आणि कंपोस्ट खते मुळांजवळ टाकणे शक्य होते. त्यानंतर तो चर ताबडतोब भरून घेतला जातो. ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या एका फेरीमध्ये पूर्ण होतात. या कामांसाठी यंत्राच्या कार्यक्षमतेचे मइल्यांकन करण्यात आले आहे.

या यंत्रामध्ये ट्रॅक्टरचलित साइड ट्रेंचर आणि फार्मयार्ड खत ॲप्लिकेटर हे दोन मुख्य घटक आहेत. ते वेगवेगळे किंवा एकत्र काम करू शकतात. साइड ट्रेंचर हे द्राक्ष व इतर बागायती पिकांमध्ये झाडांच्या ओळींच्या दोन्ही बाजूंना चर तयार करते. या उपकरणात दोन नांगराचे फाळ (मोल्ड-बोर्ड प्लाऊ बॉटम्स), एक टेलिस्कोपिक साइड फ्रेम आणि एक मुख्य फ्रेम आहे. ट्रेंचरची एकूण लांबी विस्तारित स्थितीत सुमारे २.७ मीटर आहे. हे यंत्र ३४ किलोवॉट (४५ HP) किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरने कार्यान्वित करता येते. त्यात विविध बागायती पिकांतील ओळींच्या अंतरानुसार चर खोदण्याची खोली आणि रुंदी बदलता येते. नांगराचे फाळ सुनियोजित अंतरावर ठेवलेले असून, त्यामुळे त्या कामासाठी कमी शक्ती लागते. वेगवेगळ्या खोलीवर काम करताना कार्यक्षमता टिकवून ठेवता येते.

हे यंत्र द्राक्ष बागांमध्ये ३ मीटर अंतराच्या ओळींसाठी ०.५५ मीटर प्रति सेकंद गतीने चालवून पाहण्यात आले. त्यातून प्रत्यक्ष क्षेत्र क्षमता ०.२ हेक्टर प्रति तास आणि कार्यक्षमता ७१ टक्के एवढी मिळाली. या उपकरणाचे वजन सुमारे २६५ किलो असून, त्याची किंमत अंदाजे ५० हजार रुपये आहे. साइड ट्रेंचरचा उपयोग केल्यामुळे चराचे खोदकाम अधिक अचूक, कार्यक्षम आणि वेळेवर करता येते. मानवी श्रमात मोठी बचत होते.

Farm Equipment
Agriculture Technology: भाजीपाला पुनर्लागवडीसाठी स्वयंचलित यंत्रांचा विकास

FYM अ‍ॅप्लिकेटर हे कंपोस्ट खत पिकांच्या ओळींच्या दोन्ही बाजूंना सातत्याने वितरित करते. या यंत्रणेमध्ये एक मिश्रण कक्ष, हायड्रॉलिक मोटर, फ्लो कंट्रोल व्हॉल्व्ह, फार्मयार्ड खत वितरित करण्यासाठी जोडलेली ऑगर आणि कन्व्हेअर-प्रकाराची साइड डिस्पेन्सिंग युनिट असते. समलंब चौकोनी (ट्रॅपिझॉइडल) आकाराचा मिश्रण कक्ष वरून खाली कमी आकाराचा होत जातो. त्यातून खत सहजपणे खाली वाहते. मिश्रण कक्षाच्या मध्य शाफ्टवर आडल्या बारने (क्रॉस बार) कंपोस्ट खताचे समान मिश्रण केले जाते.

फ्लो कंट्रोल व्हाल्व्ह व ट्रॅक्टरच्या इंजिनच्या गतीद्वारे खाली सोडल्या जाणाऱ्या खताचे प्रमाणाचे नियंत्रित करता येते. हा अ‍ॅप्लिकेटर हायड्रॉलिक मोटरवर चालतो. याची रुंदी २.३ ते २.६ मीटर असून ती २.५ ते ३.० मीटर अंतराच्या द्राक्ष ओळींसाठी योग्य आहे. हे उपकरण १००० फेरे प्रति मिनिट (आरपीएम) इंजिन वेगावर प्रत्येक आउटलेटमधून ७.८ किलो प्रति मिनिटप्रमाणे खत वितरित करते. या अ‍ॅप्लिकेटरची क्षेत्र क्षमता ०.२ हेक्टर प्रति तास आणि कार्यक्षमता ७१ टक्के आहे. उपकरणाचे वजन सुमारे ७६५ किलो असून. त्याची अंदाजे किंमत १.५० लाख रुपये आहे.

परंपरागत पद्धतीच्या तुलनेत फायदे

कार्यक्षमता ८८ टक्के अधिक.

श्रमात ९८ टक्के बचत, तर वेळेत ८० टक्के बचत

कंपोस्ट खताचे एकसमान वितरण शक्य.

मानवी कष्ट कमी करून, कार्यप्रणाली समायोजन करतो.

तुलनत्मक किंमत आणि अर्थशास्त्र

हाताने चर खोदणे व खते देण्याचे काम करण्यामध्ये होणारे श्रम

मनुष्य -दिवस प्रति हेक्टर आवश्यक (३३.५*३) = १००.५०

कामाचे शुल्क, रु./हेक्टर (दिवसाला ३०० रुपये वेतनानुसार) = ३०,१५० रुपये

विकसित यंत्राने आवश्यक श्रम

मनुष्य-दिवस प्रति हेक्टर आवश्यक = २

ऑपरेशन खर्च, रु. प्रति हेक्टर (८६८.८०/०.२) = ४,३४४ रुपये

श्रमाच्या खर्चात निव्वळ बचत = २५,८०६ रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com