Agriculture Technology: शेतजमिनीच्या प्रभावी विकासासाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Development: शेतजमिनीचा विकास म्हणजे केवळ नांगरणी नव्हे, तर मातीची सुपीकता, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन यांचा समावेश असलेली व्यापक प्रक्रिया आहे. पारंपरिक शेतकरी असो किंवा नवतारुण्याने प्रेरित युवा, सर्वांसाठी ही दिशादर्शक माहिती उपयुक्त ठरू शकते.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

डॉ. सचिन नलावडे

Agriculture Machinery: शेतजमिनीचा विकास म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर केवळ मशागत येते. मात्र. या संकल्पनेमध्ये मातीची गुणवत्ता, पाण्याची उपलब्धता या दोन्ही बाबींवर लक्ष केंद्रित करून शेती अधिकाअधिक शाश्‍वततेकडे नेणे इतका दीर्घ विचार समाविष्ट आहे.

विविध कृषी उपक्रमासाठी जमीन तयार करताना जमिनीची उत्पादकता वाढवून अंतिमतः शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. हा लेख तरुण आणि आधुनिक पद्धतीने शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जितका आहे, तितकाच पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही उपयुक्त असू शकेल.

जमीन विकासात समाविष्ट उपक्रम

शेत जमिनीचे सर्व्हेक्षण व त्याचे फायदे

बहुतांश शेतकऱ्यांना आपल्या बांधांची माहिती असते. अगदी नवीन खरेदी केल्यानंतरही जमिनीची मोजणी करून ताबा घेतला जातो. अशा स्थितीमध्ये जमिनीच्या सर्व्हेक्षणाचे काय कौतुक, असे अनेकांना वाटू शकते.

पण जमिनीचे चार बांध समजणे म्हणजे शेती समजणे नव्हे! आपल्या जमिनीतील माती, तिचे वेगवेगळे प्रकार, त्यातील अन्नद्रव्यांनुसार एकूण आरोग्य, जमिनीचा उंच-सखलपणा, जमिनीवरील पाणी वाहण्याची दिशा, पाण्याचे विविध स्रोत (ओढे, नाले, तलाव, विहिरी, नदी इ.), भूजल पातळी यासोबतच तिथे असलेली नैसर्गिक झाडेझुडपे आणि विविध हंगामात उगवणाऱ्या तणांचे प्रकार समजण्यासाठी शेत जमिनीचे सातत्याने सर्व्हेक्षण करण्याची आवश्यकता असते.

Agriculture Technology
Soil Fertility: जमिनीची सुपीकता हाच शेतीचा पाया

प्रत्यक्ष जमिनीची मोजणी आणि प्रत्येक बाबींची पडताळणी करून नोंदी करणे गरजेचे असते. या नोंदी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. कृत्रिम उपग्रह व ड्रोनच्या सहाय्याने जमिनीचे सर्व्हेक्षण करणे हे सोपे झाले आहे. उपग्रह सर्व्हेक्षणाचा आवाका व प्रमाण मोठे असल्यामुळे हे प्रामुख्याने शासनातर्फे केले जाते. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे अशा पद्धतीचे सर्व्हेक्षण आता केले जात आहे.

जमिनीवरील दृश्य स्वरूपात असणाऱ्या सर्व बाबींची, जसे शेताचा आकार, उतार, झाडेझुडपे आणि नदी-नाले तसेच विहिरी याबाबतची माहिती अशा सर्व्हेक्षणातून माहिती अचूकपणे आपणास मिळू शकते. आपल्या छोट्या शेतांच्या नियोजनासाठी अशा सर्व्हेक्षणाचा फारसा उपयोग होत नाही. मात्र अलीकडे विविध खासगी कंपन्यांमार्फत यासाठी सेवा पुरवल्या जात आहेत. आपल्या शेतांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो. त्याला जोड म्हणून प्रत्यक्ष माती परीक्षण करणे, इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे भूजल सर्व्हेक्षण करून घेणे असे पर्याय उपयोगी ठरू शकतात.

जमिनीच्या सर्व्हेक्षणातून जमिनीचा उंचसखलपणा समजतो. या एकाच माहितीमुळे जमीन समतल करावी की नाही? कोणती जलसिंचन पद्धती अवलंबायची याचाही निर्णय घेता येतो. आजूबाजूला असलेल्या पाण्याच्या स्रोतापासून जलसिंचनासाठी किती अंतर पडेल? पर्यावरण, पाण्याची सोय आणि जमिनीची सुपीकता यानुसार कोणते पीक घेणे योग्य राहिल, याचा अंदाज मिळू शकतो.

गावपातळीवर शेतीचे नियोजन केल्यानंतर संपूर्ण गावांसाठी बियाणे, खते आणि पाणी यांचे नियोजन शासकीय अधिकारी करू शकतील. अलीकडे काही खासगी कंपन्या शेती विकास आणि व्यवस्थापनासाठी इंटरनेट आणि मोबाइल ॲपद्वारे माहिती सल्ला देतात.

जमिनीचे सर्व्हेक्षण झाल्यावर उंच सखल जमीन समतल करण्यासाठी प्रत्यक्ष स्वयंचलित यंत्रांना सूचना देता येतात. त्याद्वारे जमीन समतल करून शेतातील जलसिंचन व्यवस्था तयार करणे शक्य होते. यामुळे अवर्षणप्रवण भागात पाणी वाचवणे आणि त्याचा प्रभावीपणे पुनर्वापर करणे शक्य होते.

जमिनीच्या निचरा सुधारण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम तयार करणे शक्य होते. त्यामुळे खारवट, चोपण किंवा पाणथळ जमिनीतील निचऱ्याची समस्या सोडवून शेतीसाठी अयोग्य असलेली जमीन सुधारणे गरजेचे आहे.

Agriculture Technology
Soil Health: ओलावा टिकविण्यासाठी मातीच्या कणरचनेत सुधारणा

अवर्षणग्रस्त क्षेत्रातील पाणलोट विकास आणि पावसाळी क्षेत्रांसाठी पाणी व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यामध्ये उपयोगी ठरते. यातून कोरडवाहू शेती पद्धती सुधारणे, जल व मृदा संधारण करणे, मातीची धूप रोखणे, जमिनीची सुपीकता जपणे ही कामे साधली जातात.

बीजोत्पादनाच्या कार्यक्रमामध्ये बियाण्याची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारण्यासाठी या तंत्राचा फायदा होऊ शकतो.

खराब झालेल्या किंवा वापरात नसलेल्या जमिनीची उत्पादकता सुधारणे शक्य होईल.

कृषी जमीन विकासातील आव्हाने

विद्यमान शेती जमीन आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याच्या गरजेसह जमीन विकासाच्या गरजा संतुलित करणे.

बदलत्या बाजारपेठेच्या मागण्या, हवामान बदल आणि विकसित होत असलेल्या शेती तंत्रांशी जुळवून घेणे.

विकासाचे नकारात्मक पर्यावरणीय परिणाम उदा. जंगलतोड, जल प्रदूषण आणि मातीचा ऱ्हास यासारख्या बाबी कमी करणे.

शेती विकास करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि त्या बाबतीत लागणारे प्रशिक्षण याबाबतची माहिती सहज उपलब्ध नसणे.

शेत जमिनीची तयारी आणि आवश्यक यंत्र सामग्री

पिकांच्या उत्पादनासाठी जमीन हे महत्त्वाचे माध्यम आहे. तिची मशागत व अन्य उपाययोजना योग्य प्रकारे केल्यास माती आरोग्यासह पीक उत्पादनासाठी फायदा होतो. ही बाब प्रगत यंत्रसामग्रीवर अवलंबून असते. जमीन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सहा प्रमुख यंत्रांवर आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेऊ.

सर्व्हेक्षण ड्रोन : पूर्वी जमिनीच्या उंचसखलपणांच्या मापनासाठी डंपी लेव्हल, स्वयंचलित सर्व्हे यंत्र आणि जीपीएस यंत्रणांचा वापर केला जात असे. रस्ते, इमारत किंवा धरण बांधताना या यंत्रणा आपण पाहिलेल्या असतात. त्यात प्रत्यक्ष मोजपट्टी घेऊन जमिनीचे मोजमाप केले जाई. अर्थाय, या कष्टदायक आणि वेळखाऊ यंत्रणा आहेत. त्या ऐवजी सर्व्हेक्षण ड्रोन हे सर्वांत आधुनिक आणि वेगवान तंत्रज्ञान ठरत आहे. एका लहान आकाराच्या ड्रोनद्वारे शेकडो एकर जमिनीचे सर्व्हेक्षण दिवसभरात पूर्ण करता येते.

सर्व्हे करण्यापूर्वी जमिनीवर काही माहितीच्या खूणा करून ठेवतात. मग ड्रोनच्या साह्याने अनेक छायाचित्रे घेतली जातात. प्रत्येक छायाचित्र अक्षांश व रेखांश नोंद केलेले (जिओ टॅगिंग) असते. संगणक प्रणालीच्या माध्यमातून ही सर्व छायाचित्रे एकत्र करून त्याचे एक मोठे छायाचित्र बनविले जाते. जी.आय.एस. प्रणालीच्या साह्याने जमिनीचे मोजमाप केले जाते. विविध प्रकारच्या संगणक प्रणालीचा वापर करून झाडे, विहिरी, पाणी यांचे स्थान निश्‍चित करण्यात येते. या मिळालेल्या सर्व माहितीचे विश्‍लेषण केले जाते.

बॅक हो आणि लोडर : हे उच्च अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या पुढील भागाला जोडले जाणारे कृषी अवजार आहे. मृदा व जलसंधारणाची कामे, पाइपलाइनसाठी चर काढणे, शेततळे तयार करणे, खंदक, खड्डे, खोदण्यासाठी वापरले जाते. त्याचा वापर एका ठिकाणाहून दुसरीकडे किंवा दुसऱ्या उपकरणात धान्य/माती हलविण्यासाठी करता येतो. स्वयंचलित बॅक हो आणि लोडर ही यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. ही यंत्रे अनेक कंपन्या बनवत असल्या तरी या यंत्राना सामान्यजन एकाच कंपनीच्या नावावरून (जेसीबी) ओळखतात. ही यंत्रे हायड्रॉलिक यंत्रणेवर चालत असून लिव्हरद्वारे नियंत्रित केली जातात. यामुळे वेळ आणि ऊर्जा वाचते. अशी यंत्रे भाडेतत्त्वावरही उपलब्ध असतात.

लेसर लेव्हलर : ही लेसर सुसज्ज यंत्रणा ड्रॅग बकेटच्या मदतीने जमिनीचा पृष्ठभाग त्याच्या सरासरी उंचीपासून ± २ सेंमी पर्यंत सपाट करते. यामध्ये लेसर बीम मार्गदर्शनासह लेव्हलिंग करताना अपेक्षित तितका ० ते ०.२ टक्के स्थिर उतार तयार ठेवणे शक्य असते. त्यामुळे जमीन आणि पाणी व्यवस्थापन सुलभ होते.

नांगर : जमिनी भुसभुशीत करण्यासाठी नांगरणीचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. यात विविध यंत्रे उपलब्ध झाली असून, माती मोकळी करून ती पलटी करणे हे काम केले जाते. यात केवळ पिकांचे अवशेष झाकले जात नाहीत, तर मातीमध्ये भर घातली जाते, ओलाव्याचे प्रमाण वाढवते आणि पोषक तत्त्वांचे शोषण वाढवते. नांगर विविध प्रकारांमध्ये येतात. उदा. फाळाचा (मोल्डबोर्ड-एमबी), तव्याचा (डिस्क) आणि छिन्नी (चिझेल) अशा नांगरांचा समावेश आहे. मोल्डबोर्ड नांगर माती फिरवतात आणि तणे आणि पिकांचे अवशेष गाडतात. डिस्क नांगर कठीण परिस्थितीसाठी वापरला जातो. छिन्नी नांगर जमीन उलटी-पलटी न करता तिथल्या तिथेच फोडतात. त्यामुळे मातीची रचना कायम राहते. धूप कमी होते.

कुळव (हॅरो) : नांगरणीनंतर मातीची ढेकळे आणखी तोडण्यासाठी आणि जमीन भुसभुशीत करण्यासाठी हॅरोचा वापर केला जातो. ते वेगवेगळ्या स्वरूपात येतात. उदा. डिस्क हॅरो जमीन कापतात आणि तिरक्या तव्यामुळे माती उचलून फेकली जाते. दातेरी कुळव (टाइन हॅरो) माती समतल करण्यासाठी आणि मोठी ढेकळे किंवा ढिगारे फोडण्यासाठी प्रभावी आहेत. कुळव मातीचा पोत सुधारून बारीक सीडबेड तयार करण्यास मदत करतात. कॉम्पॅक्ट डिस्क हॅरो माउंटेड आणि ट्रेल्ड अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यात उच्च-गुणवत्तेचे बेअरिंग आणि हब असल्यामुळे ट्रॅक्टरचा भार कमी राहून, कामे सुरळीत होतात.

कल्टिव्हेटर :मातीची सुपीकतेसाठी शेतीमध्ये कल्टिव्हेटर महत्त्वाचे काम करतात. ते ट्रॅक्टरवर बसवता येते किंवा स्वतंत्र युनिट म्हणूनही चालवता येतात.या स्प्रिंग लोडेड आणि रिजिड कल्टिव्हेटर उपलब्ध आहेत. ते ओलावा टिकवून ठेवणे, तणे नष्ट करणे, मातीची गुणवत्ता सुधारणे, खतांचे वितरण योग्यपणे करणे, मातीमध्ये वायुविजन सुधारणे या कामांसाठी उपयुक्त ठरतात.

रोटरी टिलर : रोटरी टिलर किंवा रोटाव्हेटर हे बागेतील प्लॉट किंवा लहान शेतांत मातीचा बारीक पोत तयार करण्यासाठी आदर्श आहे. ते मातीची रचना सुधारण्यास, मातीची धूप कमी करण्यास, ओलावा संवर्धन आणि तण नियंत्रणात मदत करते. यात एका शाफ्टवर बसवलेले अनेक ब्लेड फिरून जमीन नांगरण्यांचे किंवा माती भुसभुशीत करण्याचे काम होते. रोटाव्हेटर ओल्या किंवा कोरड्या मातीमध्येही उच्च-कार्यक्षमतेने मशागत प्रदान करत असल्यामुळे शेतीमध्ये सर्वांत जास्त वापरले जाते. अलीकडे डिजिटली सक्षम रोटाव्हेटरही बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्या वेगाबद्दलची माहिती मोबाइलवर पाठवली जाते. त्यामुळे इंधनाची बचत साधतानाच कामामध्ये उच्च कार्यक्षमता मिळण्यास मदत होते.

- डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९, (प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com