
Soil Conservation: मातीच्या गुणधर्मामध्ये भौतिक गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामध्ये मातीच्या कणांची संरचना आणि सच्छिद्रता मोलाची असते. विविध कारणामुळे शेतातील मातीची कणरचना पूर्वीसारखी भुसभुसीत किंवा सच्छिद्र राहिलेली नाही. अनेक ठिकाणी ती घट्ट, चिवट झाली असून, त्यातून पाणी खाली पाझरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. सच्छिद्रता कमी होण्यामागे मातीत वाढलेले क्षारांचे प्रमाण कारणीभूत आहे. जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत.
सेंद्रिय खते अल्प किंवा अजिबात न देता केवळ रासायनिक खतांवर पिके घेण्याचा प्रयत्न. उत्पादनाच्या अपेक्षेने शिफारशीपेक्षा खतांचा अधिक वापर करणे.
सिंचनासाठी खोल बोअरवेलच्या क्षारयुक्त भूजलाचा वापर करणे. यामुळे जितक्या खोलीवरून पाणी आपण उपसून काढतो, तितके त्यामध्ये अधिक क्षार विरघळलेले असू शकतात. असे क्षारयुक्त पाणी जमिनीवर उपसून पिकांना दिले जाते. पाण्याचे बाष्पीभवन होऊन गेल्यानंतरही त्यातील क्षार जमिनीत तसेच राहतात.
या व अशा बाबींमुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जवळजवळ संपुष्टात येते. यात भर पडते ती दर हंगामाला दिल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या भडीमाराची. त्यामुळे जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढतच राहते. जमीन अधिकाधिक घट्ट होत जाते.
या समस्येमुळे पुढील अडचणींना सामोरे जावे लागते.
जमिनीच्या मशागतीला अधिक कष्ट पडतात. त्यामुळे अधिक वेळ व खर्च होतो.
पाण्याच्या पाळ्यांचे प्रमाण वाढते. म्हणजेच अधिक पाणी द्यावे लागते.
अधिक पाळ्यांतून जर पुन्हा क्षारयुक्त पाणी दिले गेले तर जमिनीतील क्षारांचे प्रमाण आणखी वाढते.
जिरायती शेतीत तर दोन पावसामध्ये थोडे जरी अधिक अंतर पडले तरी पिकांना ताण जाणवतो. त्यातून पिके मरतात किंवा उत्पादनावर परिणाम होतो.
अतिवृष्टी वा जास्त पावसाच्या स्थितीमध्ये शेतात पाणी जिरण्याऐवजी ते वाहून जाते. जाताना सोबत पिके, जमिनीचा सुपीक थर वाहून जातो. जिथे पाणी वाहून जाणे शक्य होत नाही, तिथे पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यामुळे पिके पिवळी पडतात. पिकाचे मोठे नुकसान होते.
मातीची चांगली कणरचना कशी असते?
शेतीमध्ये मातीची चांगली रचना म्हणजे पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त होय. पिकांच्या वाढीसाठी माती भुसभुशीत व मोकळी गरजेची असते. ती सच्छिद्र असावी. त्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता योग्य प्रमाणात असावी. अशी जमीन अधिक काळ ओलावा धरून ठेवते. अशा जमिनीला पाणी कमी द्यावे लागते. दोन पावसादरम्यान असलेल्या खंड काळातही पिके तग धरून राहतात. त्याचप्रमाणे सच्छिद्रतेमुळे उत्तम निचराक्षमता असल्यामुळे पाणी खोलवर मुरतेही. त्यामुळे भूजल वाढण्यास मदत होते. या जमिनीमध्ये अति पावसातही जास्त पाणी साचून राहत नसल्यामुळे पिकांना फारशी हानी पोहोचत नाही.
कणरचनेसाठी सेंद्रिय कर्ब महत्त्वाचे...
माती भुसभुशीत असण्यासाठी तिची कणरचना कारणीभूत ठरते. ही अनुकूल कणरचना मुख्यतः मातीतील सेंद्रिय कर्बावर ( ऑरगॅनिक कार्बन) अवलंबून असते. त्याच प्रमाणे हेच सेंद्रिय कर्ब हे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे अन्न आहे. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढल्यास त्यासोबतच सूक्ष्मजीवांच्या जैवविविधतेत आणि संख्येतही मोठी वाढ होते. परिणामी पिकाचे उत्पादन वाढते. उत्पादनाचा दर्जाही चांगला राहतो.
भुसभुशीत मातीचे इतर ही अनेक महत्त्वाचे फायदे आहेत. विशेषतः पिकाच्या व झाडांच्या मुळांभोवती हवा खेळती राहते. मुळांच्या परिसरात ऑक्सिजनचा पुरवठा उत्तम झाल्याने मुळांची वाढ चांगली होते. याचमुळे मुळाभोवतीच्या सूक्ष्मजीवांची वाढ होते. प्राणवायूवर अवलंबून असलेल्या सूक्ष्मजीवांना ‘एरोबिक मायक्रोब्ज’ म्हाणतात. या एरोबिक मायक्रोब्जमुळे पदार्थांचे विघटन होत असतानाही दुर्गंधी येत नाही. या प्रक्रियेत तयार होणारे उपपदार्थही वनस्पतींसाठी उपयुक्त असतात.
आता भुसभुशीत जमीन मिळवायची तर त्यातील सेंद्रिय जैवभार वाढला पाहिजे. तो कसा वाढवायचा? जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी आपण शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळतो. आपल्याकडे शेणखत हाच सेंद्रिय खताचा प्रमुख स्रोत आहे. सोबतच शेतातच तयार आणि उपलब्ध होणारा सर्व प्रकारच्या पिकांचे विविध अवशेष, काडीकचरा, काड, भुस्कट, मळणीनंतर शिल्लक राहणारे फोलपट, त्या प्रमाणे बांधावर वाढणारी गवते, वाळलेली झाडे झुडपे यातूनही सेंद्रिय कर्बाची पूर्तता होऊ शकते. मात्र बहुतांश शेतकरी पीक काढणीनंतर मागील पिकांचे अवशेष जाळण्याची गडबड करतात. त्याऐवजी हे घटक बारीक करून मातीमध्ये योग्य प्रकारे मिसळावेत. शक्य तिथे त्यांचा आच्छादन करावे. त्यामुळे ओलावा टिकून राहण्यासोबतच सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.
मित्र जिवाणू, बुरशी कशा काम करतात?
यात शेणखतातून सेंद्रिय कर्ब वाढविताना त्यात सर्वांत मुख्य भूमिका आहे ती मातीतील मित्र सूक्ष्मजीवांची - जिवाणू, बुरशींची. आजवर बहुतांश कृषी शास्त्रज्ञ शेताला संपूर्ण कुजलेल्या शेणखत देण्याची शिफारस करत आले आहेत. शेणखताच्या कुजण्याची प्रक्रिया हीच मुळी सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. या कुजण्याच्या प्रक्रियेत प्रामुख्याने जिवाणू, बुरशी, ॲक्टिनोमायसेट्स यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. बुरशीजन्य व जिवाणूजन्य विघटनाची तुलना केल्यास, बुरशी सेंद्रिय पदार्थांचे विघटन करते, त्या वेळी सेंद्रिय कर्बात वाढ होते.
मात्र जिवाणू सेंद्रिय पदार्थांचे विघटन करत असताना त्यातून नायट्रोजन वाढतो. याला कारण शरीरशास्त्रीय पातळीवर विचार केला असता बुरश्यांना कार्बनची गरज अधिक असते. म्हणूनच ते शेणातल्या कर्बाचा अन्न म्हणून वापर करतात. त्याची साठवण करतात. हाच कर्ब पुढे मातीत राहून त्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांना उपलब्ध होतो. जिवाणूंना बुरशीच्या तुलनेत अधिक नायट्रोजनची गरज असते, हे लक्षात ठेवले तर जमिनीतील कर्बाच्या वाढीसाठी बुरशीजन्य विघटन अधिक फायद्याचे ठरू शकते.
शेतकऱ्यांना ट्रायकोडर्मा, माइकोरायझा या सारख्या मित्र बुरशी बऱ्यापैकी माहिती आहेत. शेणखत शेतीमध्ये मिसळण्यापूर्वी अशा उपयुक्त बुरशी मिसळून त्यांची वाढ करावी. त्यांच्याद्वारे शेणखत चांगल्या प्रकारे कुजवून घेतल्यास विघटनांच्या प्रक्रियेमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले. ते जमिनीत मिसळले गेल्यानंतर अन्य अन्नघटकांच्या वाढीलाही चालना देतात. अशा प्रक्रियेतून आपल्या शेतामध्ये बुरशी तीन भाग व जिवाणू एक भाग वजनाच्या तुलनेत असल्यास पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगल्या प्रकारे होत राहील. मग पिकांना बाहेरून कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांची फारशी गरजच पडणार नाही.
बुरशींचा अजून एक महत्त्वाचा फायदा असा आहे की तिचे जाळे शेतात लांब पर्यंत पसरते. (प्रामुख्याने मायकोरायझा बुरशी) हे जाळे अगदी पूर्ण शेती व त्या पलीकडचेही शक्य तितके क्षेत्र व्यापते. या बुरशीचे तंतू झाडांची मुळाच्या कक्षेबाहेर असलेले अन्नद्रव्य आणून झाडांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. एक प्रकारे झाडांची त्या अन्नवाहिन्यांप्रमाणेच काम करतात.
आता खताचे पूर्ण विघटन झाल्यावर हे सूक्ष्मजीव-बुरशी कशावर जगतात?
तर झाडे आपल्या मुळाद्वारे काही अन्नघटक जमिनीत सोडून या उपयुक्त बुरशी व सूक्ष्मजीवांचे पालनपोषण करतात. त्यांचे एकमेकांवर अवलंबून असलेले एक जैविक चक्र आहे. झाडे प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्न तयार करतात. त्यातील स्वपोषणासाठी व भविष्यासाठी काही भागांची साठवण करतात. त्यानंतर सुमारे ४२ ते ७२% अन्नसाठा मुळांकडे पाठवला जातो. तिथून तो मुळांच्या परिसरात वाढणाऱ्या उपयुक्त सूक्ष्मजीव व बुरशींच्या पालन पोषण वापरला जातो. हे जीवनचक्र जेवढे सुदृढ, तेवढे झाड सुदृढ असते. म्हणूनच झाड सुदृढ झाले की त्याला खतेही अत्यल्पच लागतात. ती कीड-रोगांच्या प्रादुर्भावाला उत्तम प्रतिकार करतात. म्हणूनच कीडनाशकांच्या फवारणीची फारशी गरजच भासणार नाही, अशी स्थिती येते.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, तसे मातीची कणरचनाही बदलत जाते. उदा. मातीच्या दोन कणांतील अंतर, त्या कणांचे आकार, त्यांच्यामधील बंध या सर्वांमध्ये शेती व पिकाला अनुकूल असे बदल होतात. त्यातून त्या मातीची सच्छिद्रता वाढते. पाणी जमिनीत जिरवण्याची क्षमता तर खूपच वाढते. तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. यामुळे मातीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. आपल्याकडे विद्यापीठांसह खासगी कंपन्यांनी तयार केलेली जैविक खते व बुरश्या उपलब्ध होत आहेत. त्या शेणखतात व्यवस्थित मुरवून शेतीत दिल्यास चांगले परिणाम मिळतात. तेही रासायनिक खतांच्या किमतीच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात. पुन्हा पर्यावरणावर विपरीत परिणाम न करता.
मातीची कणांची संरचना बदलणारे बायोपाॅलिमर्स
जमिनीचा भुसभुशीतपणा वाढवणारे बायोपाॅलिमर्स बाजारामध्ये बारीक तुकड्यांच्या स्वरूपात उपलब्ध होत आहेत. हे पॉलिमर जमिनीतल्या कणांमध्ये मिसळले जाऊन मातीची कण रचना सुधारण्यास मदत करतात. त्यातून जमिनीची सुपीकता वाढते. ते जैविक पदार्थापासून बनविले असते. ते जैवविघटनशील असल्यामुळे विघटनाच्या प्रक्रियेत कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हेच कर्ब सूक्ष्मजीवांचे खाद्य असल्याने सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते. मातीचे आरोग्य खूप सुदृढ होते, त्यामुळेच पिकांचेही पोषण होते. हे बायोपॉलिमर संपूर्णणपणे पर्यावरणपूरक असतात, हा आणखी एक फायदा.
- सतीश खाडे, ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.