Soil Fertility: जमिनीची सुपीकता हाच शेतीचा पाया

Organic Farming: हरितक्रांतीपूर्वी संपूर्ण देशामध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती याच प्रणाली अस्तित्वात होत्या. आपल्याला इथून पुढे किमान रसायन अवशेषमुक्त शेतीचा आग्रह धरण्याची गरज आहे.
Soil Health
Soil Fertility Agrowon
Published on
Updated on

जयंत बर्वे

Natural Farming Methods: हरितक्रांतीपूर्वी संपूर्ण देशामध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती याच प्रणाली अस्तित्वात होत्या. आपल्याला इथून पुढे किमान रसायन अवशेषमुक्त शेतीचा आग्रह धरण्याची गरज आहे. त्यातूनच रसायन अवशेषमुक्त अन्न निर्मिती व सुदृढ समाज घडवणे शक्य आहे.

भारतीय शेतीला हजारो वर्षांची परंपरा आहे. आपले पूर्वज शेतीशास्त्राचा किती सखोल अभ्यास करत होते, याचे पुरावे कृषिपराशर, वृक्षायुर्वेद यांसारख्या प्राचीन ग्रंथांमधून दिसून येतात. गेल्या शंभर वर्षामध्ये शेतीपद्धतीत खूप बदल झाले. पिकांचे नवे प्रकार रुजले. त्यासाठी बियाण्यांच्या नव्या सुधारित व संकरित जाती, त्याला रासायनिक खतांची जोड मिळाल्याने शेतीचा कायापालटच झाला.

त्याला आपण हरितक्रांती म्हणून ओळखतो. याच काळात शोध लागलेल्या व शेतापर्यंत पोचलेल्या विविध रासायनिक खतांचे परिणाम व महत्त्व शेतकऱ्यांना उत्पादनवाढीतून स्पष्टपणे समजले. पण नंतरच्या काळात वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पादन काही हाती येईनासे झाले.

Soil Health
Soil Fertility : जमिनीच्या सुपीकतेसाठी गाळ लाभदायक

या शाश्‍वततेची पुनर्स्थापना करायची असेल, तर भारतीय शेती पद्धतीच्या मुळाशी जावे लागेल. आपली संस्कृती ही प्रामुख्याने गो-वंश आधारित शेतीची. ती आपल्याला जमिनीचे शोषण नाही, तर दोहन करायला शिकवते. एका गाईचे एका वर्षाचे संपूर्ण शेणखत एक एकर जमिनीची काळजी घेऊ शकते. हरितक्रांतीच्या सुरुवातीच्या काळात हेक्टरी ४० गाडी शेणखताला नव्या रासायनिक खतांची जोड दिल्याने मिळाले उत्तम परिणामही आपण पाहिलेले आहेत.

त्या काळी असलेली एकत्र कुटुंबे व त्यांची एकत्र शेती विभागली गेली. पशुधन सांभाळणे कठीण झाल्याने शेतीमधून शेणखत हद्दपार होत आहे. विकत घेऊन देणे परवडेनासे झाले आहे. शेणखताची जागा वाढीव रासायनिक खतांनी घ्यायचा प्रयत्न झाला. त्यातही स्वस्त नत्रयुक्त खतांचा वापर आणि अतिरेक वाढला. जमिनीचे संतुलन बिघडले. जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म बिघडले. जमिनीचा पिकांशी असलेला संवादच संपला, मग शेती कशी परवडणार?

वास्तविक एक ज्वारीचा दाणा पेरला तर हजारो दाणे उत्पन्न करण्याची क्षमता शेतीमध्ये आहे. एक रुपया शेतीमध्ये गुंतवला तर १०० टक्के (किमान वर्षाला एक रुपया) नफा देण्याची क्षमता शेतीमध्ये आहे. मग आज ती गेली कुठे? त्याचे उत्तर आहे, ते जमिनीतच! आपली जमीन श्रीमंत करायची असेल, त्यात भरपूर शेणखत, ते नसल्यास पर्यायी चांगले कुजलेले कंपोस्ट खत, हिरवळीची खते, गांडूळ खत, पिकांचे अवशेष (मल्चिंग) याचा वापर करावा लागेल.

Soil Health
Soil Fertility : टिकवा जमिनीची सुपीकता

त्यातूनच जमिनींच्या कणांची रचना बदलून जमिनीचा पोत सुधारेल. त्याच्या जोडीला नैसर्गिक जोरखत म्हणून हवीत विविध प्रकारची पेंडीयुक्त खते. त्यामुळे रासायनिक खतांच्या वापरात मोठी बचत होऊ शकते. विविध पेंडी, खनिज पदार्थ यासारखे न कुजलेले कसदार सेंद्रिय पदार्थ आणि त्याला जिवाणू खतांची जोड, शेण-मूत्राची स्लरी असे अनेकविध पर्याय आपल्याला जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी वापरावे लागतील.

त्सुनामीमुळे तमिळनाडूच्या किनारपट्टीलगतच्या शेतामध्ये पसरलेले समुद्राचे खाऱ्या पाण्याने तेथील जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण प्रचंड वाढवले. त्या पूर्वपदावर आणण्यासाठी अॅरोग्रीन (हिरवळीची खते) व त्यातून मिळवलेला बायोमास खत म्हणून गाडल्याचे फायदे सेंद्रिय अभ्यासकांनी आदर्श म्हणूनच डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत.

एकात्मिक व्यवस्थापन

हरितक्रांतीपूर्वी संपूर्ण देशामध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती याच प्रणाली अस्तित्वात होत्या. आपल्याला इथून पुढे किमान रसायन अवशेषमुक्त शेतीचा आग्रह धरण्याची गरज आहे. जास्तीत जास्त सेंद्रिय निविष्ठा, जिवाणू खते आणि गरजेप्रमाणे संतुलित प्रमाणात रासायनिक खते (एकात्मिक खत व्यवस्थापन) असा विचार करावा लागेल.

कीड नियंत्रणामध्येही वनस्पतीजन्य कीटक नाशके, जैविक कीटक नाशके, कामगंध सापळे, चिकट सापळे, सापळा पीक पद्धत या सर्व गोष्टींचा जास्तीत जास्त वापर केल्यानंतर अत्यावश्यक असेल तरच तेही पर्यावरणपूरक रासायनिक कीटकनाशके वापरायची, ही एकात्मिक कीड व्यवस्थापनाची पद्धत सार्वत्रिक करावी लागेल. नक्कीच ते सेंद्रिय शेतीकडे पडलेले पहिले पाऊल असेल.

शेतीची पत वाढवावी...

शेती सोडून शहराकडे होणारे स्थलांतर भीतीदायक पातळीवर पोचत आहे. आपल्या व्यवसायाची पत आपणच वाढवली पाहिजे. आपण शेतीमध्ये येणारे नवीन तंत्रज्ञान, हवामानाचे अंदाज, त्यानुसार करावयाची कामे, बाजारभावाच्या अंदाजाप्रमाणे पिक पद्धतीमधील नियोजन करावे लागेल. शेतीमालाचा दर ठरविण्याचा अधिकार आपल्याला नसला तरी शेतातील खर्च किमान पातळीवर राखण्याचा पर्याय आपल्या हाती नक्कीच आहे.

जमिनी सशक्त करत शाश्‍वत उत्पादन घेणे हीच आपल्या शेतीची दिशा असायला हवी. रासायनिक अंशविरहित किंवा सेंद्रिय अन्न स्वतः खायला आणि विकायलाही शिकावे लागेल. विकण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान व समाज माध्यमांनी ग्राहक आपल्या दरवाज्यापाशी आणला आहे. या स्वयंस्फुर्तीने निघालेल्या शेतकऱ्यांना खरी मदत करायची असेल, तर शासनाने सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीसाठी यंत्रणा राबवायला हवी. किमान तालुक्यात रासायनिक अंश नसल्याची खात्री व तपासणीच्या प्रयोगशाळांची उभारणी करावी लागेल.

- जयदेव बर्वे ९०११०१९९७६

(जयंत बर्वे हे नेचर केअर फर्टिलायझर्स या कंपनीचे अध्यक्ष, तर जयदेव बर्वे हे कार्यकारी संचालक आहेत.)

(शब्दांकन : अभिजित डाके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com