
Horticulture Innovation: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (अकोला) संत्रा पिकात इंडो- इस्राईल तंत्रज्ञान पद्धतीने संत्रा लागवड प्रकल्प विदर्भात राबवला. यामध्ये शास्त्रीय पद्धतीने नागपूर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रात तसेच शेतकऱ्यांकडे मॉडेल फार्म विकसित केले. त्यातून संत्र्याची उत्पादकता पारंपरिक हेक्टरी १० ते १२ टनांवरून ३० ते ३५ टनांपर्यंत पोहोचली आहे. गुणवत्तेतही वाढ झाली आहे.
स्वाद, चव आणि रंगाच्या बाबतीत नागपुरी संत्र्याने वेगळी ओळख जपली आहे. त्याची उत्पादकता हेक्टरी आठ टनांपासून ते १२ टनांपर्यंत आहे. गुणवत्तेसह उत्पादकतेत वाढ होण्याच्या दृष्टीने भारताने इस्राईल सोबत तंत्रज्ञान देवाणघेवाण संबंधी करार केला. त्यातूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत नागपूर कृषी महाविद्यालयात इंडो- इस्राईल, अर्थात संत्रा सुधार प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०१०-११ च्या काळात सेंटर ऑफ एक्स्लन्स केंद्र उभारण्यात आले.
कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई यांनी प्रकल्पाला त्या काळात चालना दिली. सध्या महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. विनोद राऊत यांच्याकडे प्रकल्पाची मुख्य जबाबदारी आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत नऊ राज्यांतील एक्सलन्स सेंटर्सच्या ‘क्लस्टर हेड’ची जबाबदारी देखील त्यांच्याकडेच आहे. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांचाही प्रकल्पात सहभाग आहे. मागील १५ वर्षांत इंडो इस्राईल तंत्रज्ञानानुसार विदर्भात ४० ते ४५ हजार हेक्टरवर संत्रा लागवड करण्यात आली असून, हेक्टरी उत्पादकतेतही भरीव वाढ नोंदवण्यात आली आहे.
रोपनिर्मिती टप्पा
महाविद्यालय प्रक्षेत्रासह विदर्भातील सात शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्येकी एक हेक्टरवर या तंत्रज्ञानाचे मॉडेल फार्म विकसित केले.
यात १२ बाय आठ इंचाच्या प्लॅस्टिक बॅगेत तयार केली जातात रोपे. त्यामुळे तंतूमुळे यंत्रणा चांगल्या प्रकारे होते विकसित. पुनर्लागवड करताना जगण्याचे प्रमाणही ९० ते १०० टक्के राहते.
यासाठी माती निर्जंतुक असावे लागते. त्यासाठी माती, रेती व शेणखत यांच्या मिश्रणाचा वापर करून सूर्यप्रकाशाद्वारे निर्जंतुकीकरण प्रक्रिया केली जाते.
विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात ऑक्टोबरमध्ये ट्रेमध्ये रोपेनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते. जुलैच्या सुमारास
रोपे तयार होऊन प्लॅस्टिक बॅगेत ठेवली जातात. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये जंबेरी वा रंगपूर वाणांवर आधारित कलमीकरण होते. पुढील जून-जुलैत रोपे विक्रीसाठी तयार होतात.
खरीप पिकांच्या काढणीनंतरही रोपांची लागवड होते शक्य.
काटोल (नागपूर), अकोला आणि अचलपूर (अमरावती) येथील प्रादेशिक संशोधन केंद्रांवर या तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका विकसित. याद्वारे पाच लाख रोपांची होते उपलब्धता.
कृषी विभागाच्या गौंडखेरी, सुसुंदरी रोपवाटिकेतही रोपे उपलब्ध. महाराष्ट्र फलोत्पादन मंडळाचे त्यासाठी आर्थिक सहकार्य.
पारंपरिक पद्धतीत मातीत रोपे तयार केली जातात. त्यामुळे मातीतील फायटोप्थोराच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचा शेतात होऊ शकतो प्रसार. रोपांचे स्थलांतर करताना मुळे तुटण्याचीही भीती राहते.
उत्पादकता, गुणवत्ता व फायटोप्थोरा नियंत्रणासाठी गादीवाफ्यावर लागवडीचा प्रयोग करण्यात आला.
तीन मीटर रुंद आणि ५० सेंमी उंच तसेच गादीवाफ्याची दिशा उत्तर-दक्षिण ठेवली.
सहा बाय सहा, सहा बाय तीन, सहा बाय चार, सहा बाय दोन फूट अशा विविध लागवड अंतरांचे प्रयोग केले. त्यातून सहा बाय तीन मीटर अंतराची झाली शिफारस.
यात हेक्टरी झाडाची संख्या ५५५ राहते. पारंपरिक पद्धतीत ती २७७ पर्यंत राहते.
झाडांची संख्या अधिक असलेले हेच इंडो-इस्राईल संत्रा लागवड तंत्रज्ञान म्हणून नावारूपास आले.
व्यवस्थापन बाबी
गादीवाफ्यावर लागवडीसह डबल लॅटरल ड्रीप. फर्टिगेशन, कॅनॉपी मॅनेजमेंट आणि छाटणी तंत्रज्ञान या घटकांचा अंतर्भाव.
या तंत्रज्ञानाद्वारे लागवडीनंतर चौथ्या वर्षांपासून उत्पादन घेता येते. याउलट पारंपरिक पद्धतीत सहाव्या वर्षी उत्पादन घेणे शक्य होते.
छाटणी तंत्र
छाटणीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राचा वापर, त्याद्वारे वरील व सभोवतालच्या बाजूसही छाटणी होते शक्य.
नागपूर, काटोल, अकोला आणि अचलपूर या ठिकाणी कृषी विद्यापीठाकडून यंत्राची उपलब्धता भाडेतत्त्वावर केली आहे.
झाड तीन फुटाचे झाड झाल्यानंतर पहिली छाटणी (टॉपिंग).
साडेचार फुटांवर दुसरे, सहा फुटांवर तिसरे तर आठ फुटांवर शेवटचे टॉपिंग.
त्यानंतर झाडाची उंची कायम दहा फूट ठेवावी.
पूर्वेकडील फांद्यांची विरळणी. त्यामुळे झाडाच्या आतील बाजूस सूर्यप्रकाश मिळतो. यातून आतील बाजूस फळधारणा होते.
छाटणीत सातत्य राखल्यास पानांची संख्या वाढते.
प्रत्येक झाडांवर ३० ते ४० हजार पानांची संख्या असावी असे शिफारशीत आहे.
दरवर्षी आंबिया बहरासाठी डिसेंबर-जानेवारीत छाटणी. जमिनीपासून दहा फूट उंचीवर
मृग बहरासाठी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसापूर्वी करावी छाटणी.
खत व्यवस्थापन
नत्रयुक्त खतांचा दर चार दिवसांच्या अंतराने वापर.
पोटॅश ४५ दिवसांच्या अंतराने विभागून दयावे
ठिबकद्वारे खते दिल्यास परिणामकारकता साधता येते.
कॅल्शिअम, झिंक, लोह यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची झाडाला गरज राहते.
जमिनीसह ड्रीप किंवा फवारणीद्वारेही अन्नद्रव्यांचा पुरवठा शक्य.
तण व्यवस्थापन
ब्रश कटरचा वापर करून तण व्यवस्थापन. गवत कापल्यानंतर त्याच ठिकाणी ठेवल्यास त्याचा जैविक खत म्हणून वापर करता येईल.
उत्पादन
डॉ. विनोद राऊत म्हणाले की पारंपरिक लागवड तंत्रज्ञानानुसार हेक्टरी १० ते १२ टनांपर्यंत संत्र्याची उत्पादकता मिळते. परंतु या प्रकल्पाद्वारे हेक्टरी ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादकता साध्य झाली आहे. गुणवत्ताही वाढली आहे. मॉडेल फार्म असलेल्या शेतकऱ्यांनी सहाव्या वर्षापासून तेवढे उत्पादन घेतले आहे. काही शेतकऱ्यांनी झाडाच्या वयानुसार ५० टनांचा पल्लाही गाठला आहे.
डॉ. विनोद राऊत, ९९७००७०९४६
(विभागप्रमुख, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, नागपूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.